06 August 2020

News Flash

३५५. कालातीत

जीवन नित्यनूतन आहे. वर्तमानातला क्षण भोगत असतानाच तो क्षणांत सरतो आणि भूतकाळजमा होतो

 

– चैतन्य प्रेम

जीवन नित्यनूतन आहे. वर्तमानातला क्षण भोगत असतानाच तो क्षणांत सरतो आणि भूतकाळजमा होतो. प्रत्येक क्षण नवा असतो, पण हे क्षणा—क्षणांचं सरणं इतकं वेगानं होतं की आपल्याला ते जाणवतही नाही. वेगानं वाहात असलेल्या नदीचं पाणी जसं क्षणोक्षणी नवं असतं, पण आपल्याला ते दिसत असूनही जाणवत नाही. तसं आहे हे. हे समस्त दृश्य जग काळाच्या आधीन आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती आणि वस्तुमात्रावर काळाची सत्ता असल्यानं घट, झीज आणि नाश हे नियम या सर्वाना लागू असतात. त्यामुळेच पू. बाबा (के. वि. बेलसरे) म्हणतात की, ‘एका आत्मस्वरूपावाचून विश्वामध्ये दृश्यपणे दिसणारे सर्व काही कालाच्या सत्तेखाली वावरते. काल अनंत आहे. आपला देह कालाधीन आहे हे ओळखून जो भगवंताचा आश्रय घेतो तोच फक्त कालाला ओलांडून जातो.’ भगवंत हा कालातीत आहे. अर्थात त्याच्यावर काळाचा कोणताही परिणाम होत नाही. जो या भगवंताचा होऊन जातो तोही मग भगवद्स्वरूपच होत असल्यानं त्याच्याहीवर काळाची सत्ता चालत नाही. तो कालातीत होतो. भगवंतांनी म्हटलं आहे की, ‘‘माझिये निजभक्तीचें सार। भक्त पावले जें साचार। त्यांचे सर्वही व्यापार। मदाकार होऊनि ठाकती।।२८३।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय १९). म्हणजे जे माझी अनन्य भक्ती करतात ते माझ्याशीच तादात्म्य पावतात, माझा आकारच होतात. अशा माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही, (न मे भक्त: प्रणश्यति) अशी भगवंताचीच ग्वाही आहे. आता भक्त कालातीत असतो, म्हणजे नेमकं काय हो? त्याचा देह अमर असतो का? तर नाही. मग कालातीत म्हणजे नेमकं काय? उदाहरण पाहू. संत तुकाराम महाराज देहूत होते. भौतिकातला, लौकिकातला त्यांचा प्रपंच किंवा चरितार्थाचा उद्योग यशस्वी होता, असं म्हणता येईल का? तर नाही! जगाच्या मापदंडानुसार तुकाराम महाराजांना आर्थिक सुबत्ता काही नव्हती. मग त्याचवेळी देहूत जे यशस्वी, श्रीमंत, संपन्न गावकरी होते त्यातील एकाचं तरी नाव आज टिकून आहे का? तर नाही! पण तुकाराम महाराजांचं नाव अखंड टिकणार! आता केवळ नाव टिकणं म्हणजे कालातीत होणं नव्हे. मग? तुकाराम महाराज यांचा भावविचार, त्यांचा बोध आजही टिकून आहे आणि अनंत काळ टिकून राहील. त्या बोधानं जागृत होऊन जीवन घडविण्याची कृती सुरू राहील. हे खरं कालातीत होणं आहे!

यानंतर सूर्य हा आपला सातवा गुरू का, हे अवधूत सांगणार आहे. सूर्याकडून दोन प्रमुख गोष्टी अवधूत शिकला. पहिली गोष्ट म्हणजे थोडं घ्यावं, पण त्याची परतफेड भरभरून करावी. दुसरी गोष्ट म्हणजे या स्वीकार आणि त्याग या दोन्हीत आपण निरासक्तच असावं! अवधूत म्हणतो, ‘‘सूर्य काळें निजकिरणीं। रसें सहित शोषी पाणी। तोचि वर्षांकाळीं वर्षोनी। निववी जनीं सहस्त्रधा।।५३३।।’’ (अध्याय ७). सूर्य हा आपल्या किरणांनी ठरावीक काळात समुद्राचं पाणी शोषत असतो, मग वर्षांकाळात पावसाच्या रूपानं, त्याच शोषलेल्या पाण्याचा तो अनंत पटीनं वर्षांव करतो, परतफेड करीत असतो! हे पाणी शोषलं जाणं कुणालाही उमगत नाही. पण सूर्याला या प्रक्रियेतील त्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा अभिमानही नाही की परतफेडीचा गर्वही नाही. योगीही हेच करत असतो. तो जनांकडून फार थोडं घेतो आणि त्याचा भरभरून परतावा करीत राहतो, असं अवधूत सांगतो. आता हे ‘घेणं‘ आणि ‘देणं‘ नेमकं काय आहे?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 12:06 am

Web Title: loksatta ekatmayog article 355 abn 97
Next Stories
1 ३५४. काळप्रवाह
2 ३५३. आत्मस्थितीचा पूर्णचंद्र
3 ३५२. प्रतिमा आणि आकलन
Just Now!
X