06 August 2020

News Flash

३५६. समुद्र आणि पाऊस

सूर्य हा समुद्राचं पाणी शोषत असतो आणि वर्षांकाळी पावसाच्या रूपानं सहस्र जलधारांचा वर्षांव करीत जनांना निववत असतो.

 

– चैतन्य प्रेम

सूर्य हा समुद्राचं पाणी शोषत असतो आणि वर्षांकाळी पावसाच्या रूपानं सहस्र जलधारांचा वर्षांव करीत जनांना निववत असतो. योगी अर्थात खरा सत्पुरुषही तसाच असतो. तो जनांकडून फार थोडं घेतो, पण त्याचा परतावा भरभरून करतो, असं अवधूत सांगतो. हे सांगणं इतकं सहज आहे आणि त्यातलं समुद्र व पावसाचं रूपक इतकं चिरपरिचित आहे, की या सांगण्यात लपलेलं आणि त्या रूपकात दडलेलं गूढमधुर रहस्य आपल्या पटकन लक्षातही येत नाही! सूर्याच्या तप्त किरणांनी समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती आकाशात जाऊन तिचे ढग बनतात आणि मग त्याद्वारे जलवर्षांव होतो. मग तेच पावसाचं पाणी जलाशयात साठतं. नदी, नाल्यांद्वारे वाहत पुन्हा समुद्राला जाऊन मिळतं. आता हे आपण शाळेतही शिकलो होतो, पण तरी या चिरपरिचित प्रक्रियेतली एक मोठी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. ती गोष्ट म्हणजे, वाफ होत जे पाणी आकाशाकडे जातं ते खारट असतं आणि पावसाद्वारे परत येतं ते पाणी गोड असतं, ही! अगदी त्याचप्रमाणे योगी फार थोडी सेवा घेतो, पण त्यातून खारट इच्छा, अपेक्षांच्या भवसागरातलं किती तरी दु:खं शोषून घेत कृपावर्षांवच करतो! अवधूत सांगतो, ‘‘तैसीचि योगियाची परी। अल्प ज्याचें अंगीकारी। त्याचे मनोरथ पूर्ण करी। सहस्र प्रकारीं हितत्वें।।५३५।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). आता या इच्छा खारट असतात म्हणजे काय? जेव्हा पदार्थात प्रमाणाबाहेर मीठ पडतं तेव्हा आपण तो पदार्थ खारट झालाय, असं म्हणतो. प्रमाणात मीठ असतं तेव्हा त्याला खारट म्हटलं जात नाही. तशा प्रमाणाबाहेरच्या इच्छा आणि अपेक्षा या खारट आहेत. त्या आत्मतृप्ती साधू शकत नाहीत. हृदयाची तहान भागवू शकत नाहीत. या खारट इच्छांचा त्याग घडविणारी अल्प सेवा योगी घेतो आणि त्याबदल्यात या इच्छांच्या ओझ्यामुळे पुढे आपल्या वाटय़ाला येऊ घातलेली किती तरी दमछाक थांबवतो. म्हणजे काय? खरा सत्पुरुष जो असतो, त्याच्या सेवेत आपलं किंचित धन, किंचित वेळ खर्च होतो. हा खर्च अन्यथा भौतिकात झाला असताच. तोदेखील निरपेक्ष नसताच. म्हणजे पुन्हा अपेक्षा आणि अपेक्षाभंगाची साखळी आलीच. ती साखळी या इच्छात्यागातून योगी घडवतो. बरं, या आपल्या देण्याला विषयच चिकटलेले असतात. म्हणजे अमुक व्हावं, ही आस असतेच. योगी ती आस अलगद तोडतो. इतकंच नाही, तर भ्रामक इच्छांचा त्याग असा वाढवीत नेतो की तो साधक निरिच्छच व्हावा आणि खऱ्या विश्रांतीचा त्याला लाभ व्हावा. ही विश्रांती आत्मतृप्तीची आहे! अवधूत सांगतो, ‘‘ज्यासी सेविती योगी आत्माराम। त्यांचे पुरती सकळ काम। अंती करोनियां निष्काम। विश्रामधाम आणिती।।५३६।।’’ मात्र, या सगळ्या देवघेवीत योग्याला कोणतीही इच्छा नसते! समुद्राचं पाणी शोषून घेणं आणि पावसाच्या रूपात ते परत करणं, या दोन्ही वेळी सूर्य जसा अलिप्त असतो ना, तसा योगी अलिप्त असतो! सूर्याला या प्रक्रियेतील त्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा अभिमानही नाही की परतफेडीचा गर्वही नाही. योगीही हेच करत असतो. अवधूत म्हणतो, ‘‘त्यांसी विषयो देतां कां घेतां। आसक्ति नाहीं सर्वथा। रसु शोखूनि घेतां देतां। अलिप्त सविता तैसे ते।।५३८।।’’ शिवाय सूर्य जसा मलीन पाण्यात पडल्यानं मलीन होत नाही, डबक्यात पडल्यानं चिखलानं माखत नाही, तसा योगी देहात असूनही देहभावात कधीच चिणलेला नसतो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 12:06 am

Web Title: loksatta ekatmayog article 356 abn 97
Next Stories
1 ३५५. कालातीत
2 ३५४. काळप्रवाह
3 ३५३. आत्मस्थितीचा पूर्णचंद्र
Just Now!
X