– चैतन्य प्रेम

सूर्य जसा मलिन पाण्यात असूनही मलिन होत नाही, तसा सत्पुरुष संसारात असूनही देहभावात बद्ध होत नाही. आपल्या जगण्यातून तो ही सहज शिकवण देत असतो. जे त्याच्या अस्तित्वाचा खरा लाभ घेतात त्यांच्या चित्तावर हा निरासक्तीचा संस्कार होतोच. संसारात माणसानं निरासक्त राहणं किती आवश्यक आहे, ही जाणीव कपोत पक्ष्याच्या जोडप्यामुळे आपल्याला झाली, असं अवधूतानं यदुराजाला सांगितलं. त्या दृष्टीनं कपोत हा त्याचा आठवा गुरू झाला आहे. याआधी पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र आणि सूर्य या सात ‘गुरूं’कडून अवधूतानं काही गुण आत्मसात केले. या आठव्या गुरूची कथा मात्र थोडी वेगळी आहे. संसारातली आसक्ती किती आत्मघातक असते, हे कपोत किंवा पारवा या पक्ष्याकडून अवधूत शिकला आहे. कपोत पक्ष्यांची ही कथा रूपकात्मक आहे. ती कुणाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात घडू शकते. कथा अशी आहे : कपोत पक्ष्यांचं एक जोडपं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालं होतं. जगाचं भानही त्यांना नसे. रानावनात हिंडावं, विलासक्रीडेत गुंतावं, टिपलेल्यातील गोड दाणे एकमेकांना भरवावेत आणि आपल्या विश्वात हरवून जावं. कालांतरानं कपोतीनं घातलेल्या अंडय़ांतून दोन चिमुकली पिल्लं बाहेर पडली. त्यांच्या लहानशा चोची, बारीकसे डोळे, चिमुकले पाय पाहून दोघांचं अंत:करण वात्सल्यानं भरून गेलं. मग सकाळी दोघांना घरटय़ात सोडून चारा आणि धान्य टिपायला कपोत आणि कपोती दूरवरही जाऊ लागले. एकदा कपोती परतली तर घरटं खाली पडलेलं आणि पारध्याच्या जाळ्यात अडकलेली पिल्लं आकांत करताना दिसली. कपोतीही आक्रोश करू लागली. काही क्षणांत ती पिल्लं गतप्राण झाली. ते पाहून न राहवून त्यांना बिलगत कपोतीही जाळ्यात अडकली आणि तिनंही प्राण सोडला. तिथं पोहोचलेल्या कपोताला हे दृश्य पाहवेना. तोही आक्रोश करू लागला. धर्म, अर्थ आणि काम हे गृहस्थाश्रमाचे तीनही स्तंभ ढासळलेत, या तिन्हींची पूर्ती झाली नसल्यानं मन मोक्षासाठीही तयार नाही, हा भाव त्याच्या मनात दाटून आला. आता स्त्री-पुत्रादिकांशिवाय जगण्याला तरी काय अर्थ आहे, या भावनेतून कपोतानंही जाळ्यात अलगद प्रवेश केला! या रूपकात्मक कथेच्या निमित्तानं अवधूताच्या माध्यमातून एकनाथ महाराजांनी अनेक अर्थगर्भ ओव्या प्रकट केल्या आहेत. तसंच अनेक तीव्र प्रश्न पुनश्च मनात घोळू दिले आहेत! कामवासना आणि प्रपंच वाईटच, हा पवित्रा एकांगी नाही का? प्रपंच वाईट असेल, तर विवाहसंस्था का टिकून आहे, असे नेहमीचे प्रश्न आहेतच. पण आणखी एक वेगळा प्रश्नही आहे! तो म्हणजे, स्त्री-पुत्र मोहातून दूर होण्याचा उपदेश बहुतांश संतांनी केला आहे, मग पति-पुत्र मोहातून दूर व्हायचा उपदेश स्त्रीलाही अभिप्रेत आहे का? नाथांना खरं काय सांगायचं आहे, हे जाणून घेत या प्रश्नांचा विचार पुढल्या आठवडय़ात करू.

chaitanyprem@gmail.com