– चैतन्य प्रेम

प्रपंचावर आणि विषयसुखावर संतांनी टीका केली असली, तरी त्या टीकेचा हेतू, रोख आणि व्याप्ती जाणून घेतली पाहिजे, असं गेल्या काही भागांत म्हटलं होतं. त्या टीकेचा हेतू आपण जाणून घेतला. आता रोख आणि व्याप्ती नेमकी काय आहे, तेही जाणून घेऊ. या टीकेचा रोख प्रपंचावर नसून प्रपंचात जी आमची आसक्ती आहे ना, त्या आसक्तीवर आहे. त्या आसक्तीत केवळ स्वत:चा विचार आहे. प्रपंच हा त्यागही शिकवतो, सहजीवनही शिकवतो, निरपेक्ष सेवाही शिकवतो, सहवेदनाही शिकवतो! त्या गोष्टी आपण शिकतो का? त्या शिकत असू तर आपला प्रपंच निरासक्त होत जाईल आणि परमार्थाहून तो वेगळा उरणारही नाही. पण आपला प्रपंच हा आसक्तीचा असतो. त्यात स्वार्थ, द्वेष, मत्सर, क्रोध यांचा वाढता प्रभाव असतो. देह आणि देहभावापलीकडे आम्ही जातच नाही. त्यामुळे अशा आसक्तीमय प्रपंचावर संतांनी टीका केली आहे. आता या टीकेची व्याप्ती काय? तर ही टीका प्रपंच नाकारत नाही. कुणीही प्रपंचाचा त्याग करावा, अशी ही शिकवण नाही. प्रपंचातील आसक्तीपुरती या टीकेची व्याप्ती आहे. विषयांवरही संतांनी टीका केली आहे, पण ती अनिर्बंध वैषयिक ओढींपुरती मर्यादित आहे. आता आणखी एक प्रश्न आजच्या काळात सामोरा येईल; तो असा की, स्त्री-पुत्र मोहातून दूर होण्याचा उपदेश बहुतांश संतांनी केला आहे आणि तो साहजिकच पुरुषांना आहे, असं वाटतं. मग पती-पुत्र मोहातून दूर व्हायचा उपदेश स्त्रीलाही अभिप्रेत आहे का? तर एक स्पष्ट केलं पाहिजे की, अध्यात्मात ज्या पायरीवर खऱ्या विशुद्ध भक्तीचा प्रवाह खुला होतो, तिथं देहभावच उरत नाही; मग स्त्री-पुरुष भेद तरी कसा उरेल? तेव्हा संतही स्त्री-पुरुष भेदानं भक्ताकडे पाहात नाहीत. मग ‘कामिनी’ आणि ‘कांचन’ ही त्याकाळची प्रचलित रूपकं आहेत, हे लक्षात ठेवून त्यावरील टीकेकडे पाहिलं पाहिजे. आता या ओळी पाहा : ‘‘परधन कामिनी समूळ न आणी मना। नाही हे वासना माया केली।। तृष्णा हे अधम न व्हावी मजला। प्रेमाचा जिव्हाळा देई तुझ्या।।’’ हा अभंग संत जनाबाईंचा आहे! त्याही मनाला बजावत आहेत की, परधन आणि कामिनीमध्ये चित्त गुंतू देऊ नका! तेव्हा कामिनी-कांचनचा अर्थ मोह आणि आसक्ती, असाच गृहीत धरला पाहिजे. स्त्री-पुत्र मोह नको, याचा अर्थ जे नश्वर आहे त्यात भ्रामक मोहजन्य वैषयिक ओढींनी आसक्त होऊ नका, हाच आहे आणि तो स्त्री-पुरुष दोघांनाही लागू आहे! तर प्रिया आणि पिलांपुढे जगच माहीत नसलेला कपोत पारध्याच्या जाळ्यात सापडून गतप्राण झालेल्या त्या तिघांना पाहून खचतो. मग स्वत:ही त्याच जाळ्यात गुरफटवून घेतो, अशी कथा अवधूतानं सांगितली. या रूपकात्मक कथेच्या निमित्तानं अवधूताच्या माध्यमातून एकनाथ महाराजांनी अनेक अर्थगर्भ ओव्या प्रकट केल्या आहेत, त्या पाहू. अवधूत म्हणतो, ‘‘आसक्ति आणि स्नेहसूत्र। या दोन्हींपासाव दु:ख विचित्र। पदोपदीं भोगिती नर। अस्वतंत्र होउनी।।५४९।। यालागीं भलतेनी भलते ठायीं। आसक्ति स्नेहो न करावा पाहीं। अतिस्नेहो मांडिजे जिंहीं। दु:ख तिंहीं भोगिजे।।५५०।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे, आसक्ती आणि स्नेहपाश या दोन कारणांनी माणूस परतंत्र होतो आणि विलक्षण दु:ख भोगतो. म्हणून कुणीही कोणावरही आसक्ती ठेवू नये! अतिस्नेह असेल, तर दु:ख भोगावंच लागणार!