– चैतन्य प्रेम

जन्मापासून आपलं आयुष्य क्षणाक्षणानं घटत आहे. मृत्यूकडेच आपली वाटचाल सुरू आहे. हे नकारात्मक विधान मानू नका. कारण हे विधान केलं काय किंवा न केलं काय, मरणवास्तव काही बदलत नाही. खरं तर मरणाचं स्मरण असेल, तर माणूस जगण्याबाबत सजग होईल. जगण्याची संधी देणाऱ्या प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक क्षणाचं मोल त्याला उमगू लागेल. मग शक्यतो कोणताही क्षण निर्थक वा व्यर्थ सरू नये, असं त्याला अगदी प्रामाणिकपणे वाटू लागेल. ती आंतरिक धारणा प्रत्येक क्षणी टिकेलच असं नाही, पण त्या दिशेनं थोडय़ा सजगतेनं प्रयत्न तरी होऊ लागतील. पण बरेचदा यौवनाच्या उन्मादात माणसाला हे भान राहत नाही. जरा-मरणाचं स्मरण शिवतही नाही. ‘जरा’ म्हणजे म्हातारपण. म्हातारपणाचं स्मरण म्हणजे काय? तर आज या देहाची कशीही हेळसांड केली तरी खपून जातंय, देह धडधाकट आहे आणि त्याच्या सर्व इंद्रियगत क्षमताही उत्तम आहेत, तोवर देहसुखापलीकडे काही सुचतही नाही. पण आज ना उद्या या क्षमता ओसरणार आहेत, जगणं परावलंबी होत जाणार आहे, हे वास्तव त्याला जाणवतही नाही. आधीच सांगितल्याप्रमाणे, विषयसुखात वा देहसुखात तिरस्करणीय असं काही नाहीच. फक्त त्यापलीकडे जीवनात जर कशालाच अर्थ उरला नसेल, त्यापलीकडे जीवनात काहीच महत्त्वाचं वाटत नसेल, तर जेव्हा विषय आपल्याला त्यागतील, म्हणजे विषयभोगांसाठी आपला देह साथ देईनासा होईल, तेव्हा जीवनातली पोकळी अधिकच भीषण आणि बोचरी वाटू लागेल. मन, चित्त, बुद्धीचं खचणं प्रत्येक दिवस रूक्ष आणि वेदनादायी असल्याची भावना निर्माण करील. मोक्ष, जीवन्मुक्ती हे शब्द आवाक्यातलेही भासणार नाहीत. कपोताची हीच दशा झाली. दोन्ही पिलं आणि आपल्या प्रियेला पारध्याच्या जाळ्यात मृतदशेत पाहून तो खचला. म्हणाला, ‘‘धर्म अर्थ आणि काम। या तिहींच्या आश्रयो गृहाश्रम। तो भंगला मी अनाश्रम। अतृप्त काम सांडूनी।।६०६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे, गृहस्थाश्रम हाच धर्म, अर्थ आणि काम या तिन्हींचा आश्रयस्थान आहे. या तिन्हींची पूर्ती गृहस्थ जीवनात होत असते. पण तोच गृहस्थाश्रम अनपेक्षितपणे भंगला असून कामभावना तृप्त झाली नसतानाच मी आश्रमविहीन झालो आहे! मग तो विषण्णपणे म्हणतो, हे तीन आश्रम तर भंगलेच, पण चौथा पुरुषार्थ जो मोक्ष तो तरी साधून घ्यावा, असं कुणी म्हणत असेल, तर तेही आता शक्य नाही! का? तर कपोत म्हणतो की, ‘‘ऐसें म्हणसी जरी निगुतीं। ये अर्थी मानी दुर्मती। विषयवासना नोसंडिती। कैसेनि मुक्ति लाधेल।।६०।।’’ माझी मती अर्थात बुद्धी वाईट झाली आहे, भ्रष्ट झाली आहे आणि विषयवासनेचं प्रेम तर अजून मनात, चित्तात खोलवर कायम आहे! मग जीवन्मुक्ती कशी शक्य आहे? तेव्हा तिची गोष्टच दूर!

chaitanyprem@gmail.com