– चैतन्य प्रेम

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
Rape on 11 year girl
पाचवीतल्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, दत्तक आई वडिलांचं क्रूर कृत्य

ज्या आधारांवर जीवनात प्रेमसुख, कामसुख आणि वात्सल्यसुख अनुभवता येत होते, ते आधार तुटले, काळाच्या आघातानं, मृत्यूनं दुरावले; आता जगणं असह्य़ आहे, अशी कपोताची भावना झाली. जे. कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे, अगदी जवळची, आपल्याला आधारवत् वाटणारी व्यक्ती मृत्यूनं दुरावते तेव्हा आपण हमसून रडतो. ते रडणं जो गेला त्याच्यासाठी नसतं, तर आपला आधार गेला, आपलं आता कसं होईल, या उद्विग्न आणि असुरक्षित मनोभावातून अधिक असतं! कपोतालाही वाटलं की, ‘‘नाशिली स्त्री नाशिल्या प्रजा। येथ म्यां रहावें कवण्या काजा। दु:खें प्राण जाईल माझा। लोकलाजा निंदित।।६२१।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे, स्त्री गेली, मुले गेली- आता माझ्या जगण्याला काय अर्थ उरला आहे? आता कपोत हा इथं रूपक म्हणून योजला आहे. कपोताच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसालाच डोळ्यांसमोर ठेवून बोध केला आहे. कारण कपोत पुढे म्हणतो, ‘‘जळो विधुराचें जिणें। सदा निंद्य लाजिरवाणें। न ये श्राद्धींचें आवतणें। सदा वसणें एकाकी।।६२३।।’’ म्हणजे विधुराचं जिणं फार कष्टाचं असतं. आता पशुपक्ष्यांमध्ये विधुर कुठून आला? तेव्हा हा कपोताकडून व्यक्त होणारा उद्वेग सर्वसामान्य माणसाचाच आहे. हे जिणं किती एकाकी आहे? तर श्राद्धालासुद्धा कुणी जेवायला बोलवत नाहीत! आता याचा अर्थ इतकाच की, दु:खाच्या प्रसंगातही कुणाला आठवण येत नाही, तर सुखाच्या प्रसंगात कोण कशाला आठवण ठेवील आणि मला बोलावून आनंदात सहभागी करून घेईल, असा कपोताचा भाव आहे. मग या कपोतानं काय केलं? तर, आपली प्रिया आणि पिल्लं याच जाळ्यात अडकून मृत्युमुखी पडली आहेत, हे दिसत असतानादेखील स्वत:ही त्याच जाळ्यात उडी घेतली. अवधूत सांगतो, ‘‘मेल्या मागें मरणें। देखों हेंचि सर्वासी करणें। परी जन्ममृत्यु निवारणें। हा स्वार्थु कवणें न धरिजे।।६२७।। पहा पां स्त्रीपुत्राकरणें। आपुलाही जीवु देणें। परी भगवत्पदवी साधणें। हें न मनें मनें सर्वथा।।६२८।।’’ म्हणजे एक मेला त्यामागे शोक करीत बसलेलाही त्याच रीतीनं मरणपंथालाच लागला आहे. समर्थ म्हणतात ना? ‘मरे येक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’ अशीच गत आहे. कोणी निवर्तलं तर स्मशानात जाताना ‘रामनाम सत्य है’ म्हणत जायचं आणि परतल्यावर आपल्या जगण्यातच बुडून त्या नामाला विसरूनही जायचं! एक मेंढरू खड्डय़ात पडलं की, मागची सगळी मेंढरंही त्याच खड्डय़ात पडतात; तसा माणूसही मृत्यूच्या खाईत पडत असतो. जन्म-मृत्यूचं चक्र तोडण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. स्त्रीपुत्र वियोगदाहानं तो आपला जीवही द्यायला तयार असतो, पण आनंदनिधान भगवंताचं परमपद लाभून पूर्णतृप्त होण्याचा संकल्पही त्याच्या मनात कधी उत्पन्न होत नाही. कपोतही आपली प्रिया आणि पिल्लांप्रमाणे त्या जाळ्यात अडकून गतप्राण झाला. पारध्याला लाभच झाला! तसा माणूसही अलगद काळरूपी पारध्याच्या जाळ्यात अडकत असतो. अवधूत म्हणतो, ‘‘ऐसा जो कोणी गृहमेधी। त्यासी सर्वथा काळ साधी। जैशी कपोत्याची बुद्धी। तैसी बुद्धी गृहमेध्या।।६३०।।’’ कपोत्याप्रमाणेच गृहात आसक्त असलेल्याची बुद्धी संकुचित असते. जो घरादाराच्या आसक्तीत जखडला असतो त्याचा अगदी अलगद घास काळ घेत असतो.