– चैतन्य प्रेम

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी

गृहात जो आसक्त असतो, त्याचा अलगद घास काळ घेत असतो, असं अवधूत यदुराजाला सांगतो. असं का होतं? तर, जो गृहाच्या आसक्तीत अडकलेला असतो, त्याची बुद्धी संकुचित होते. ती कशी, हे जाणून घेण्यासाठी ‘गृहासक्ती’चा व्यापक अर्थ पाहू. आपल्याला लाभलेला देह हासुद्धा आपलं ‘घर’च आहे! ‘श्रीअवधभूषण रामायणा’त या देहाला ‘साधनधाम’ म्हणजे केवळ साधनेसाठी मिळालेलं घर म्हटलं आहे. मात्र, आपण हे घर साधनेसाठी न वापरता ‘मी’ आणि ‘माझे’च्या जपणुकीसाठी, देहसुखासाठीच वापरत राहतो. ‘मी’ आणि ‘माझे’ यापलीकडे आपली दृष्टी जात नाही. भ्रम, मोह, आसक्तीनं जखडून त्यामुळेच आपण सदोदित अतृप्तच राहतो. अवधूत म्हणतो, ‘‘ऐसा कुटुंबी गृहस्थु। कुटुंबपोषणीं आसक्तु। विषयवासना अशांतु। पावे घातु सकुटुंब।।६३३।।’’ जो कुटुंबपोषणात आसक्त असतो, त्याच्या विषयवासना कधीच शांत होत नाहीत. त्याचा सहकुटुंब घात होत असतो! वरकरणी असं वाटतं की, कुटुंबात विषयवासनांची तृप्ती होऊन त्यांचा प्रभाव हळूहळू क्षीणच होत असला पाहिजे. मात्र, माणसाचं आंतरिक भावविश्व मोठं रहस्यमय असतं. कारण अनंत जन्मांतल्या अनंत अतृप्त वासना, अनंत जन्मांतल्या अनंत धारणा, कल्पना यांचे सूक्ष्म, चिवट संस्कार खोलवर रुजलेले असतात. त्यामुळे माणसाची एक इच्छा पूर्ण होताच, एक तर दुसरी नवी इच्छा त्याच्या मनात उत्पन्न होते किंवा पूर्ण झालेल्या इच्छेतला आनंद टिकेनासा होतो. यामुळे मन पुन्हा अतृप्तच होतं. पुन्हा प्रपंचातल्या भावपोषणात इतरही माणसांचा संबंध येतो. माणूस म्हणजे यंत्र नव्हे. प्रत्येकाच्या आंतरिक भावविश्वाची स्वतंत्र रचना असते. प्रत्येकाचं आकलन, धारणा, कल्पना, मनोरचना वेगवेगळी असते. त्यामुळे विविध नात्यांतील तृप्तीची पातळी कधीच सर्वाना समान, सुखकारक ठरत नाही. त्यातच आयुष्याचा अवधी वेगानं सरत असतो. त्यामुळे आपल्या इच्छा आणि त्यांच्या पूर्तीची मर्यादा, आसक्तीतला फोलपणा, घातकीपणा याचा साधकानं तरी अगदी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. या देहासक्तीत सर्वात मोठा वाटा असलेल्या आणि सूक्ष्म व्यापक प्रभाव असलेल्या कामवासनेचा किंवा कामासक्तीचाही त्यानं विचार केला पाहिजे. कारण ही सूक्ष्म आसक्ती जोवर संपणार नाही, तोवर साधक गटांगळ्याच खाणार. त्याला खरी जीवन्मुक्ती साधणं शक्य नाही. त्यासाठी या गृहासक्ती, देहासक्ती आणि कामासक्तीचा खोलवर विचार केला पाहिजे. ‘ध्यान आणि आध्यात्मिक जीवन’ (प्रकाशक : रामकृष्ण मठ, नागपूर) या ग्रंथात स्वामी यतीश्वरानंद म्हणतात की, ‘‘लैंगिकता ही काही सर्वस्वी शारीरिक नसते. शारीरिक उत्तेजनांखेरीज मानसिक स्तरांवर सूक्ष्म आकर्षण व मोह यांच्या रूपातदेखील कामवासना विद्यमान असते. जसजसा साधक अंतर्मुख होऊ लागतो, तसतसे त्याला त्याच्या अंतरी सूक्ष्म लैंगिकतेच्या शाखाप्रशाखांचे जाळे जाणवू लागते. (पृ. १८८)’’ पुढे स्वामी लिहितात की, ‘‘लैंगिक उद्दीपन केवळ एखाद्या स्थूल रूपातच होते असे नव्हे. सूक्ष्म आकर्षण व सूक्ष्म रूपातील उद्दीपन हे स्थूल रूपांपेक्षाही भयंकर असते. नवशिक्या साधकांना हे सूक्ष्म उद्दीपन सहजपणे ओळखता येत नाही.. त्यामुळे त्यांना मनस्तापही भोगावा लागतो. (पृ. १९५)’’ या विधानांच्या पार्श्वभूमीवर या सूक्ष्म आसक्तीचा थोडा विचार करू.