22 January 2021

News Flash

३७५. नामलौकिक

राम’ म्हणजे सर्व चराचरांत कणाकणांत रममाण असलेलं परम तत्त्व. त्या परम व्यापक तत्त्वाच्या स्मरणाचा सहज उपाय म्हणजे रामनाम!

संग्रहित छायाचित्र

 

– चैतन्य प्रेम

स्वनावाचा मोह फार खोलवर असतो. तिथपर्यंत ‘रामनाम’ नुसतं पोहोचलं पाहिजे असं नव्हे, तर त्याच्या आवृत्त्या व्हाव्यात, असं अवधूताच्या निमित्तानं श्रीएकनाथ महाराज सांगत आहेत. हे ‘रामनाम’ म्हणजे काय आणि त्याची ‘आवृत्ती’ म्हणजे काय, हे प्रथम समजून घेऊ. ‘राम’ म्हणजे सर्व चराचरांत कणाकणांत रममाण असलेलं परम तत्त्व. त्या परम व्यापक तत्त्वाच्या स्मरणाचा सहज उपाय म्हणजे रामनाम! आता इथं ‘रामनाम’ म्हणण्यामागे केवळ ‘राम’ या एका इष्टदेवतेच्या नावाचा संकुचित आग्रह नाही. ‘रामनाम’ हा अशा सर्वच नामांचा संकेत आहे जी परम व्यापक तत्त्वाशी अखंड एकरूप होण्याचं माध्यम आहेत. तेव्हा परम व्यापकाशी जोडणारं कुठलंही नाम हेच इथं ‘रामनाम’ म्हणून अभिप्रेत आहे. आपण पाहिलं की जे या जन्मापुरतं टिकणार आहे अशा स्वनावाच्या लौकिकात आपण अडकतो आणि त्या लौकिकाच्या ध्यासातून आस, हव्यास जोपासतो. त्यातूनच सुप्त स्वार्थातून उपजणाऱ्या प्रेमाचा आणि द्वेषाचा प्रवाह आयुष्यभर वाहू लागतो. त्यातून इतरांशी आपलं भलं-बुरं वर्तन घडतं. या वर्तनानुरूप प्रारब्ध घडतं. त्या प्रारब्धानुरूप जन्म-मृत्यूच्या चक्रात आपण सापडतो. काहींना प्रारब्धाचा सिद्धांत मान्य नाही. ते म्हणतात, माणसाला एकच जन्म असतो आणि पूर्वजन्म वगैरे काही नसतं. आता काही धर्मानी एकाच जन्माचं सूत्र सांगितलं त्यामागे कारण आहे. ‘जन्म एकच आहे, तर त्याचा काळजीपूर्वक वापर करा,’ हेच त्यांना सांगायचं होतं. पण केवळ सनातन धर्म पूर्वजन्म प्रारब्ध मानतो म्हणून त्या सिद्धान्ताला विरोध करायचा, हेही बरोबर नाही. कारण एकच जन्म असेल तर एकाला गरीब आणि एकाला श्रीमंत, एकाला अपंगत्व आणि एकाला धडधाकट देह, एकाच्या जीवनात सुखच सुख आणि एकाच्या जीवनात दु:खच दु:ख, असा ‘अन्याय’ का? दयाळू भगवंतानं सर्वाना एकसारखंच आयुष्य दिलं पाहिजे! मात्र ते तसं नसेल तर आपलाही काही दोष असलाच पाहिजे. भगवंताच्या कृपेची उपेक्षा करीत आपण अनेक जन्म जे काही भलं-बुरं वागलो आहोत त्यानुसारचे चांगले-वाईट भोग आपल्या वाटय़ाला आले आहेत. आता याचा अर्थ इतरांच्या जीवनातील दु:खाकडे दुर्लक्ष करावं, त्यांच्यावरील अन्यायाकडे डोळेझाक करावी, असा नाही. स्वामी विवेकानंद ‘रामकृष्ण मिशन’च्या समाजकार्याचं समर्थन करताना म्हणाले होते की, ‘‘इतर जण त्यांच्या प्रारब्धानुसार दु:ख भोगत असले, तर त्यांचं दु:ख दूर करण्यासाठी धडपडणं हेच आपलंही प्रारब्ध आहे!’’ तेव्हा आपण इतरांचं जीवन सुखकर बनविण्याचाच प्रयत्न करायचा आहे, पण दु:खाचं मूळ कारण ज्या परमात्म विस्मरणात दडलं आहे, त्याचंही भान जोपासलं पाहिजे. जीवनात शाश्वत सुख हवं असेल, तर ते अशाश्वताच्या आधारानं मिळणार नाही. जगणं व्यापक व्हावं, अशी इच्छा असेल, तर समस्त संकुचितपणाच्या पाशातून बाहेर पडावंच लागेल. त्यासाठी परम व्यापक तत्त्वाचाच आधार घ्यावा लागेल. समस्त धर्मानी त्याच एका परम तत्त्वाचा आधार घेण्याची शिकवण दिली आहे. म्हणूनच तर व्यापकाशी जोडणारी नामोपासना सर्वच धर्मात आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:04 am

Web Title: loksatta ekatmayog article 375 abn 97
Next Stories
1 ३७४. नावलौकिक
2 ३७३. आत्मघातक आसक्ती
3 ३७२. बेडी आणि शूळ
Just Now!
X