– चैतन्य प्रेम

अवधूत सांगत आहे, ‘‘रामनामाच्या आवृत्तीं। चारी मुक्ती दासी होती।’’ रामनाम जर अंत:करणात धारण केलं, वृत्ती जर पूर्णपणे रामनाममय झाली, तर चारही मुक्ती दासी होतात! आता या चार मुक्ती कोणत्या? तर सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता या त्या चार मुक्ती आहेत. सलोकता म्हणजे मी ज्या सृष्टीत जगत आहे, ती सृष्टी भगवंताची आहे, त्याची या चराचरावर सत्ता आहे आणि त्याच लोकाचा मी एक घटक आहे. समीपता म्हणजे तो भगवंत सदोदित माझ्यासोबत आहे. सरूपता म्हणजे मी त्याचा अंश आहे, त्याच्यासारखाच आनंदरूप आहे. सायुज्यता म्हणजे तो आणि मी वेगळे नाहीच आम्ही एकच आहोत. पण या चार मुक्तींचं चार पातळीवरचं नुसतं शाब्दिक आकलन होऊन उपयोग नाही. त्या प्रत्येक पातळीवरील ही प्रत्येक स्थिती अनुभूतीचाही विषय झाली पाहिजे. या चार मुक्तींचा लाभ काय? सलोकतेमुळे निश्चिंतता, समीपतेमुळे निर्भयता, सरूपतेमुळे नि:शंकता आणि सायुज्यतेमुळे निश्चलता प्राप्त होते. झब्बूच्या खेळात प्रथम सुटलेला म्हटलं तर खेळाचा भाग असतो, म्हटलं तर नसतोही! तो कुणाचेही पत्ते पाहू शकतो, त्याच्यावर हरण्याचं दडपण नसतं. तसा जणू जगात सहज वावर होतो. पण हे कशानं होतं? तर, ‘रामनामाच्या आवृत्ती’मुळे. वारंवार रामनाम घेतल्यानं ते अंत:करणात रुजत जातं. अंत:करण म्हणजे मन, चित्त, बुद्धी आणि अहं! या सूक्ष्म स्तरांवर नाम झिरपतं तेव्हाच मनोलय, चित्तशुद्धी होत जाते. दुश्चित्त असलेलं चित्त सुचित्त होतं, मनाचं सुमन तर बुद्धीची सुबुद्धी होते. ‘अहं’भाव ‘सोहं’भावानं व्याप्त होतो. पण हे ‘रामनाम’ म्हणजे काय हो? तर, ‘राम’ म्हणजे नुसता दशरथपुत्र राम नव्हे. ‘राम’ ही व्यापक जीवनधारणा आहे. ‘राम’ म्हणजे ध्येयसंगत शौर्य आणि धैर्य आहे. ‘राम’ म्हणजे निर्मोही कर्तव्यपालन आहे. ‘राम’ म्हणजे भक्तीचा आधार आहे. रामनाम म्हणजे स्वनाममोहाच्या गढूळ पाण्याला शुद्ध करणारी तुरटी आहे. जो रामनामात रंगला, त्याच्या अंत:करणातला जगाचा प्रभाव, जगाची आसक्ती ओसरू लागली, जगाची लाचारी संपली. मग तो जगात निरासक्त भावानंच वावरेल. ‘जो दुनिया के लिए खुला है, वो खुदा का बंदा नहीं हो सकता!’ दुनियेकडे ओढ असेल, तर भगवंताची, व्यापकत्वाची ओढ लागूच शकत नाही. पराकोटीचा अहंभाव आणि पराकोटीचा सोहंभाव एकाच वेळी विलसू शकत नाही. तेव्हा ‘रामनामाच्या आवृत्ती’ इतक्या झाल्या पाहिजेत, की आंतरिक वृत्तीत पालट घडला पाहिजे. मग माझ्या आणि परमात्म्याच्या व्युत्पत्तीचा खरा शोध सुरू होईल. पण ज्या देहाच्या जोरावर मन साधनामार्गावर वळू शकतं, त्याच देहाच्या जोरावर तेच मन विषयांच्या गोडीतही गुरफटू शकतं. विषयप्रभावातून मन मुक्त होणं, ही सोपी गोष्ट नाहीच. अवधूत जरी पोटतिडकीनं सांगत असला की, ‘‘विषयसुखाचिये आसक्ती। कोणा नाहीं झाली तृप्ती। मृगजळाचिये प्राप्ती। केवीं निवती तृषार्त॥६४२॥’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा) तरीही मृगजळामागे धावणं काही थांबत नाही!

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?

chaitanyprem@gmail.com