– चैतन्य प्रेम

खरा सत्संग लाभला की आत्मकल्याणाची प्रामाणिक इच्छा माणसाच्या मनात निर्माण होते. मनुष्यजन्माचं खरं हित परमार्थात आहे, हा भाव जागा होतो.  इथं खरा सत्संग म्हणजे काय, तेही नीट लक्षात घेतलं पाहिजे. ‘भावार्थ रामायणा’त एकनाथ महाराज म्हणतात तद्वत, ‘‘सत्संगें भवनिर्मुक्ती!’’ हाच खऱ्या सत्संगाचा एकमेव निकष आहे. ज्या सहवासात भवाची ओढ, भवाची गोडी कमी होत असेल आणि परमभावाची गोडी लागत असेल, तर तो खरा सत्संग आहे. ‘भव’ म्हणजे हवं-नकोपणा! अर्थात अमुक व्हावं, ही इच्छा! आपल्या सगळ्या इच्छा या देहभावानुसारच उसळत असतात. त्या अशाश्वताच्याच ओढीत गुंतलेल्या असतात. अशुभाकडे प्रवाहित होत असतात. त्या अशुभ वासना त्यागून मन परमार्थाकडे दृढ लावावं, असं एकनाथ महाराज सांगतात. पण हे साधावं कसं? ‘भावार्थ रामायणा’तच एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘बाळक लाविजे अभ्यासीं। शनै: शनै: योग्यता होय त्यासी। तेवि आत्मअनुसंधानें चित्तासी। सावकासीं राखावें।।७२।।’’ म्हणजे लहान मुलाला आई कशी अभ्यासाला बसवते? त्याचं मन एका जागी स्थिरावतच नसतं. सारखी उत्साही चुळबुळ सुरू असते. पण तरीही त्याचं मन ती अभ्यासाकडे वळवत राहाते. तसं साधकानं आपलं मन अभ्यासाकडे वळवत राहिलं पाहिजे. आता मूल अभ्यासाला बसलं आणि लगेच ज्ञानी झालं, असं होतं का हो? तर नाही. ‘‘शनै: शनै: योग्यता होय त्यासी!’’ हळूहळूच त्याच्यात ज्ञान रुजू लागतं. त्या बळावर हळूहळू त्याची योग्यता वाढत जाते. त्याप्रमाणे चित्ताला आत्म अनुसंधानाची सवय, आत्माभ्यासाची सवय हळूहळूच लागते. त्यासाठी साधकानं आपलं चित्त अनुसंधानात राखलं पाहिजे. पण तेसुद्धा कसं? तर, ‘‘सावकासीं राखावे!’’ अगदी सावकाश! म्हणजे आपल्या चित्तात कोणतं अनुसंधान सुरू आहे, हे साधकानं अगदी बारकाईनं सतत तपासलं पाहिजे. अनुसंधान ही काही केवळ अध्यात्माच्या प्रांतातली गोष्ट नाही. लहानपणी मूल एखाद्या खेळण्यासाठी आकांत करीत असतं, ते त्या खेळण्याच्या अनुसंधानातूनच! वय वाढू लागताच भौतिकातल्या ज्या ज्या गोष्टी माणसाला हव्याशा वाटतात, मग ती एखादी दुचाकी असेल वा चारचाकी, एखादं घर असेल, एखादा दूरचित्रवाणी संच असेल वा एखादा उत्तम पेहराव असेल; जे हवं अशी तीव्र तळमळ मनाला लागते त्या वेळी त्या गोष्टीचं अनुसंधानच सुरू असतं! मनात सदोदित सुरू असलेलं भौतिकाचं अनुसंधान शुद्ध सत्संगानंच सुटतं. त्या सत्संगानंच, ज्या भौतिक गोष्टींचा हव्यास मनाला आहे त्यातला फोलपणा उमगू लागतो. मग खरं परम तत्त्वाचं अनुसंधान सुरू होऊ लागतं. मग तो सत्संगच शिकवतो की, ‘‘सावधान अहोरात्र। चित्तें लक्षावें चिन्मात्र। हेंचि परमार्थाचें सूत्र। अति पवित्र निजनिष्ठा।।७६।।’’ हे अनुसंधान सुटू नये म्हणून अहोरात्र सावधान राहावं लागतं. चित्तानं सदोदित चैतन्य तत्त्वाचंच लक्ष्य राखणं, हेच परमार्थाचं सूत्र आहे. निजनिष्ठेशिवाय, आत्मनिष्ठेशिवाय अन्य काहीच पवित्र नाही. आत्मकल्याण, आत्महिताच्या प्राप्तीसाठी एकनिष्ठ असणं, याशिवाय अन्य सारं व्यर्थ आहे. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे, जे जे अंतर्निष्ठ राहिले तेच तरून गेले आणि जे अंतभ्र्रष्ट झाले ते ते निर्थक अवास्तव धारणेच्या खोडय़ात अडकून बुडाले! श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, तरायला आणि बुडायला दोन्ही सोयी परमात्म्यानं करून ठेवल्या आहेत. तरायचं की बुडायचं, हे आपल्याहाती आहे!