– चैतन्य प्रेम

माणूस सुखासाठीच धडपडतो, तरी त्याला सुख मिळतंच असं नाही. माणूस दु:ख टाळण्यासाठी धडपडतो, पण दु:ख टळतंच असं नाही. न मागता दु:ख वाटय़ाला येतं, तसंच न मागता सुखही वाटय़ाला येतंच. मग जेवढं वाटय़ाला येणार आहे तेवढं सुख मिळणारच असताना, माणूस सुख ‘मिळविण्या’साठी का धडपडतो, असा अवधूताचा प्रश्न आहे. एक गोष्ट खरी की, वाटय़ाला असलेलं सुख मिळणार असलं, तरी त्यासाठी अपेक्षित कष्ट करावेच लागतात. धान्य उत्तम येणं नशिबात असलं, तरी नशिबावर हवाला ठेवून शेतात बी न पेरता शेतकरी स्वस्थ बसू शकत नाही! पण नेमकं किती सुख वाटय़ाला येणार हे माहीत नाही, त्यामुळे नेमके किती प्रयत्न आवश्यक तेही सांगता येत नाही. म्हणूनच भगवान कृष्णही प्रयत्नाला, कर्मरत राहण्याला विरोध करीत नाहीत; मात्र अमुकच फळ मिळावं, अशा आसक्तीला विरोध करतात. तेव्हा योग्यांचा खरा विरोध प्रयत्नांना नसून फळाची आसक्ती बाळगायला आहे. जो साधनापथावर आला आहे त्याच्या मनात तरी ही फलासक्ती नसावी, त्याला भगवंताच्या व्यापक कृपेवरही विसंबता आलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. आणि म्हणूनच, ‘‘काही न करता नुसता परमार्थ करून का कुणाचं पोट भरतं?’’ या प्रश्नाच्या उत्तरात त्यांना अजगर हा आदर्शवत वाटतो. यदुराजासमोर अजगराची स्थिती मांडताना अवधूत म्हणतो की, ‘‘उद्योगेंवीण आहारू। अयाचित सेवी अजगरू। डंडळोनि न सांडी धीरू। निधडा निर्धारू पैं त्याचा।।२५।। स्वभावें तो मुख पसरी। सहजें पडे जें भीतरीं। सरस नीरस विचारू न करी। आहार अंगीकारी संतोषें।।२६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). धावपळ न करता जो आहार मिळेल तो अजगर अयाचितपणे सेवन करीत असतो. घाबरून तो कधी धीर सोडत नाही. कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचा त्याचा निर्धार असतो. तो आपलं तोंड उघडतो आणि समोर जे भक्ष्य येईल ते ग्रहण करतो. ते सरस आहे की नीरस याच्याशीही त्याचं देणंघेणं नसतं. मग अवधूत म्हणतो, ‘‘तैशीच योगियांची गती। सदा भाविती आत्मस्थिती। यदृच्छा आलें तें सेविती। रसआसक्ती सांडूनि।।२७।।’’ आत्मस्थ योग्यांची अशीच स्थिती असते. जे भगवत्कृपेनं वाटय़ाला येईल त्याचं सेवन ते करतात. त्यात चवीचा आग्रह नसतो. पुढे अवधूत सांगतो की, ‘‘भक्ष्यच आले नाही तर नुसता वारा पिऊनही अजगर शरीराचं पोषण करतो, तसाच योगीही अन्नासाठी काकुळतीला येत नाही!’’ आता अजगरासारखं सुस्त पडून उघडय़ा तोंडात जे पडेल ते स्वीकारून जगता येतं, हा आदर्श विचारशील, भावनाशील, उद्यमशील माणसाला पटत नाही. त्यातही आज, शेकडो जण असलेल्या नोकऱ्या गमावत असताना आणि अफाट वैज्ञानिक, वैद्यकीय, आर्थिक प्रगतीकडे झेपावतानाच माणुसकी, सहृदयता अधोगतीला जात असताना अजगराप्रमाणे यदृच्छेवर सोपवून निश्चिंत राहायचा सल्ला त्याचं हृदय चिरून जातो. मग या बोधाचा रोख काय असावा?

chaitanyprem@gmail.com