– चैतन्य प्रेम

आध्यात्मिक चिंतनाच्या लेखन आणि वाचनासंदर्भात दोन प्रामाणिक प्रश्न आपण गेल्या भागात पाहिले. त्यातील एका प्रश्नाचं उत्तरही पाहिलं. आता दुसरा प्रश्न. तो म्हणजे, आध्यात्मिक चिंतन वाचायला खूप आवडतं, मनाला बरंच काही नवं गवसल्यासारखं वाटतं, पण ते आचरणात येत नाही. किंबहुना ते आचरणात येणं अशक्यच असतं! मग वाटतं, हे वाचायला आवडणं म्हणजे निव्वळ बौद्धिक मनोरंजन आहे का? प्रश्न अगदी प्रामाणिक आहे. जोवर आपल्यावर कठोर प्रसंग ओढवत नाही तोवर आपल्याला मायावाद, मिथ्यावाद खरा वाटतो. आध्यात्मिक चर्चातही गोडी वाटते. पण जेव्हा अनपेक्षितपणे काही गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला धक्का बसतो. खरं तर आयुष्यात जे घडणार असतं ते घडतंच. पण ते घडणं आपल्याला अपेक्षित नसतं म्हणून ते अनपेक्षित वाटतं. आणि त्या क्षणी आपण मनानं पार कोसळतो. अशा वेळी हे आध्यात्मिक चिंतनच सर्वात खोटं वाटतं! इतकंच नव्हे, ते सहनही होत नाही. त्यात काही चूकही नाही बरं. शेवटी मनुष्य हा मनोप्रधान आहे. हे मन भावनाप्रधान आहे. या भावना जीवनातील माणसांशी जोडल्या गेलेल्या असतात आणि म्हणून स्थूल रूपानं पाहता ही माणसं आपल्या सुखाचं वा दु:खाचं कारण भासतात. त्यामुळे जीवनातील त्यांच्या असण्या वा नसण्याबाबत आपण हळवे असतो, सूक्ष्मपणे आग्रहीदेखील असतो. माणसं म्हणजे नुसते हाडामांसाचे जिवंत देह नव्हेत. आपल्या अनेक भावना, कल्पना, धारणा, वासना, अपेक्षांचा ते आधार असतात. त्यामुळे त्यांच्या सुख-दु:खानं आपण आनंदी वा व्यथित होणं मनुष्यधर्मानुसार स्वाभाविकच असतं. त्यामुळे आपल्या अवतीभोवती पसरलेला आणि आपल्या भावनेला व्यापून टाकणारा जगाचा पसारा मिथ्या आहे, या ‘ज्ञाना’चा खरा रोखच आपल्या लक्षात येत नाही. हे जग मिथ्या आहे म्हणजे? संतवचन आहे की, ‘क्षणाचे हे सर्व खरे आहे’! नीट लक्षात घ्या, ‘क्षणाचे हे सर्व खरे आहे’ असं म्हटलंय त्यात. ‘क्षणाचे हे सर्व भासमान आहे’ असं नाही म्हटलेलं! म्हणजेच क्षणभर का होईना, जे आहे ते खरं आहे आणि ते माझ्या खरेपणाची परीक्षा पाहणारं आहे! कारण जे आहे ते माझ्या प्रारब्धानं वाटय़ाला आलं आहे, प्रारब्ध म्हणजे माझ्याच कर्माचे परिणाम आहेत. ते सुधारायचे असतील तर मला र्कमही सुयोग्य तीच केली पाहिजेत. अर्थात, कर्म टाळून प्रारब्ध संपणार नाही. तेव्हा मी त्या त्या प्रसंगात खरंच वर्तन केलं पाहिजे. मग ते प्रेम असो वा त्याग, सेवा असो वा साह्य़! पण हे सर्व करताना जो खऱ्या अर्थानं माझा आहे, त्या परमतत्त्वस्वरूप सद्गुरूला मला ओळखता, जाणता, स्वीकारता, पचवता आणि जगण्यातून प्रतिबिंबित करता आलं पाहिजे! खरं अध्यात्म इतकंच आहे. ते या घडीला अशक्य वाटलं, बौद्धिक मनोरंजनातून ते वाचण्यापुरतं आवडत आहे असं वाटत असलं, तरी जसजशी कृती म्हणजे साधना घडत जाईल तसतसे अनुभव येतील. आणि एकदा का ज्ञान अनुभवाच्या कक्षेत आलं, की मग वाचनाची गरज उरणार नाही!

chaitanyprem@gmail.com