– चैतन्य प्रेम

अवधूतानं यदुराजाला सागराचं योग्याशी असलेलं साधर्म्य आधी सांगितलं, आता तो दोघांमधला फरकही मांडत आहे. योगी हाच समुद्रापेक्षा काही बाबतींत कसा श्रेष्ठ आहे, ते सांगत आहे. तो म्हणतो, ‘‘समुद्र सर्वाप्रति क्षार। तैसा नव्हे योगीश्वर। तो सर्वा जीवांसी मधुर। बोधु साचार पैं त्याचा।।५९।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे, समुद्राचं पाणी सर्वानाच खारट लागतं, उलट योगी सर्वाशी गोडच असतो. त्याचा बोध आणि ज्ञान हे सत्य व मधुरच असतं. काय शब्दगुंफण आहे पाहा.. ‘तो सर्वा जीवांसी मधुर’! श्रीगोंदवलेकर महाराजांबरोबर एकदा कोणी नवागत आध्यात्मिक चर्चा करीत होते. तोच एका शिष्याचं लेकरू शौच करून आलं. धुण्यासाठी म्हणून ते आईला हाक मारू लागलं. श्रीमहाराज तात्त्विक चर्चा करता करता त्याच्यापाशी गेले आणि पटकन त्या मुलाला स्वच्छ केलं. त्या मुलाचे वडील म्हणजेच महाराजांचे शिष्य धावत आले. कळवळून म्हणाले, ‘‘महाराज..!’’ महाराज म्हणाले, ‘‘अरे, तुम्हा मोठय़ा माणसांची वासनेची घाण नाही का साफ करावी लागत? मग यात काय आहे?’’ वैद्य कासेगावकर महाराजांकडे काही दिवस राहिले होते. त्यांच्या आठवणी वाईच्या साधकांनी छापल्या आहेत. त्यातली एक आठवण फार गोड आहे. एका तरुणाला पैशाची निकड होती. त्याला पैसे द्यायला महाराजांनी दुसऱ्या गावकऱ्याला सांगितलं. तो फारसा राजी नव्हता. तर महाराज काय म्हणाले? की, ‘‘तू याला पैसे दे, त्यानं नाही दिले तर मी देईन!’’ काही महिने लोटले. ज्यानं पैसे परत करायचे होते त्याच्याकडे ते परत करण्याइतपत जमाही झाले होते. पण त्याला ‘शक्कल’ सुचली. ज्याच्याकडून त्यानं पैसे घेतले होते त्याला तो म्हणाला की, ‘‘मी काही तुझे पैसे देत नाही. मी दिले नाहीत तर महाराजांनी पैसे द्यायचं कबूल केलंच आहे. तर तू त्यांच्याकडेच माग. म्हणजे आपल्या दोघांचाही त्यात फायदा आहे!’’ त्या गृहस्थानं मग महाराजांकडे मागणं सुरू केलं. महाराजांच्या सर्व प्रकार लक्षात आला. ते तरुणाला म्हणाले, ‘‘अरे, तुला ते पैसे देण्याची ऐपत नसेल, तर मी देणार होतो. आता तुझी ऐपत असताना मी ते देणं काही योग्य नाही.’’ त्यावर तो म्हणू लागला, ‘‘माझ्या ऐपतीचा प्रश्नच नाही. मी कोणत्याही कारणानं पैसे दिले नाहीत, तर तुम्हीच ते देण्यास बांधील आहात. तुम्ही तसा शब्द दिलाय. तुम्ही ते पैसे दिले पाहिजेत!’’ महाराज आणि तो तरुण यांच्यात वाद  सुरू झाला. महाराजांनी मग उग्रावतार धारण केला. इतका की, त्यांच्याकडे पाहण्याचं कुणाचं धारिष्टय़ही होईना! तोच त्या तरुणाचे आजोबा धावत आले. महाराजांची क्षमा मागू लागले. कासेगावकरांना वाटलं, महाराज आता याच्याशी जन्मभरात बोलणारही नाहीत. पण संध्याकाळी कासेगावकर नदीवर गेले, तर महाराज त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून हास्यविनोद करीत येताना दिसले! सामान्य माणूस नाही हो असा मधुर व्यवहार करू शकत! सत्पुरुष असामान्यच असतो व म्हणून त्याचा सगळ्यांशी होणारा व्यवहार असामान्य असतो. अवधूत सांगतो, ‘‘जयासी बोधु नाहीं पुरता। अनुभवु नेणे निजात्मता। त्यासी कैंची मधुरता। जेवीं अपक्वता सेंदेची।। ६०।।’’ ज्याच्या अंगी बोध मुरलेला नाही, निजात्म अनुभव नाही, त्याच्या वागण्यात माधुर्य कसं शक्य आहे? कच्चं फळ आंब्याचंच असलं, तरी आंब्याचा गोडवा त्यात कुठून येणार? म्हणून सत्पुरुषाचा शिष्य होऊनही पक्वता नाही तोवर माधुर्य नाही! या माधुर्याचा आणखी विचार करू.