– चैतन्य प्रेम

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय

चवदार पाणी वाहणाऱ्या नद्या येऊन मिळत असल्या तरी समुद्राच्या पाण्याला थेंबभरही गोडवा नसतो. उलट प्रपंचाच्या खारट आसक्तीनं बरबटलेले असंख्य जीव सत्पुरुषाला येऊन मिळत असले तरी त्याचं माधुर्य लेशमात्रही उणावत नाही. या माधुर्याची पुसटशी कल्पना वल्लभाचार्य यांच्या ‘मधुराष्टक’ काव्यात येते. अवघ्या गोकुळाला आपल्या भक्तीप्रेमानं व्यापून टाकणाऱ्या कृष्णाची प्रत्येक गोष्ट मधुर आहे, असं या काव्यात वर्णिलं आहे. यातील प्रत्येक शब्दा-शब्दांतून जणू मधच पाझरत आहे. पण या स्तोत्रातून नेहमीच प्रचलित अर्थापलीकडचा अर्थ माझ्या हृदयात रुंजी घालत असतो. यात म्हटलंय की, हे कृष्णा तुझे ओठ मधुर आहेत. मग त्या ओठांतून बाहेर पडणारा शब्द कडू कसा असेल? तुझं मुखमंडल मधुर आहे. मनातले भाव चेहऱ्यावर उमटतात, पण ते डोळ्यांतून अधिक व्यक्त होतात. या कृष्णाचे ते डोळे मधुर आहेत. डोळे म्हणजे दृष्टी. सज्जनांच्या विशाल, व्यापक हिताची कळकळ ज्या डोळ्यांतून प्रस्फुटित होत असते त्या डोळ्यांइतके मधुर नेत्र अन्य कोणते आहेत हो? या मुरलीधराचं हास्य मधुर आहे. हास्य हे उपहासात्मकही असू शकतं, छद्मीही असतं, गर्वानं फुललेलंही असतं, परयातनांनी सुखावणारंही असतं. पण ज्यात केवळ आत्मीय अभेद प्रेम भरून आहे ते हास्य परम मधुर आहे. त्या नंदपुत्राचं हृदय मधुर आहे आणि त्या हृदयाकडे होणारी वाटचालही मधुर आहे! किती सांगावं हो? हा कान्हा म्हणजे जणू माधुर्याचा अधिपती आहे. त्याचं सगळंच काही मधुर आहे! (अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरम्। हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरम्।।). त्याचं बोलणं मधुर, त्या बोलण्यानुरूपचं त्याचं जगणं मधुर (वचनं मधुरं चरितं मधुरं), त्याचं एखाद्याला मार्गावरून चालवणं मधुर आणि तितकंच एखाद्याला भरकटवणंही मधुरच! (चलितं मधुरं भ्रमितं मधुरं). अहो, अर्जुन, उद्धवासारख्या अनेकांना त्यानं योग्य मार्गावरून चालवलं, पण कित्येक शत्रूंना भ्रमितही केलं! शत्रूच कशाला? प्रभु रामांशी युद्ध करण्याची सुप्त इच्छा जामवंतालाही एकदा झाली होती. खऱ्या लढवय्याला दुसऱ्यातील बळ पाहून आपल्या शक्तीचा कस लावण्याची इच्छा होते. पण प्रभुंशी लढणं कसं शक्य होतं? पण भक्तांचं मनोरथ पूर्ण करणं, हे प्रभुंचं वचन आहे. त्यासाठी जामवंताला भ्रमित करण्याच्या हेतूनं कृष्णानं स्यमंतक मणि घेऊन केलेली पलायनाची लीला काय कमी मधुर आहे? भक्ताच्या हृदयातला या ‘जगन्निवासा’चा वास मधुर आहे (वसनं मधुरं), तर शत्रूच्या हृदयातला वाकडेपणाही मधुरच आहे, कारण त्या वाकडेपणातूनही मधुर चरित्रच घडत जातं (वलितं मधुरं)! त्याची संयोग भक्ती मधुर आहे तशीच वियोग भक्तीही! त्या आर्त विरहातल्या असीम प्रेमाचं माधुर्य किती सांगावं हो? (युक्तं मधुरम् मुक्तं मधुरम्). खरोखर माधुर्याच्या अधिपतीचं सगळंच काही मधुर आहे! मग एक चरण सांगतो की, ‘नृत्यं मधुरं सख्यं मधुरं!’ त्या कृष्णाचं नृत्य मधुर आहे आणि सख्य मधुर आहे. आता ‘नृत्य’ आणि ‘सख्य’ यांचा काही ताळमेळ आहे का हो? तर आहे! आत्मा-परमात्मा ऐक्यतेचा परिपोष असं त्याचं रास-नृत्य मधुर आहे. त्या रासक्रीडेचा प्राण असलेलं सख्य मधुर आहे! ज्यांच्या हृदयात सख्य आहे त्या प्रत्येक जीवमात्राशी हे रास-नृत्य आजही सुरू आहे बरं! पण ज्यांच्या हृदयात वाकडेपणा होता त्यांनाही कान्हानं खूप नाचवलंय! या ‘मधुराष्टका’त जणू सत्पुरुषाच्या प्रत्येक मधुर लीलेचंच वर्णन आहे.