– चैतन्य प्रेम

माणसानं एखादी गोष्ट दडवण्याचा प्रयत्न केला, तर ती अधिकच उफाळून येते. त्यामुळे विकारवासना दडपू नयेत. मात्र त्यांच्यामागे वाहवतही जाऊ नये. साधकानं तर सर्व प्रकारे कामना संगापासून दूर पळून जावं, असं अवधूत बजावतो. तो म्हणतो, ‘‘पळतां पळतां पायांतळी। आल्या काष्ठाची पुतळी। तेही नातळावी कुशळीं। निर्जीव स्त्री छळी पुरुषातें।।१२६।।’’ पळता पळता लाकडी बाहुली मिळाली तरी तिलाही स्पर्शू नये, कारण निर्जीव ‘स्त्री’सुद्धा मनाला गोवू शकते! यात फार मोठा अर्थ भरला आहे, असं गेल्या वेळी म्हटलं होतं. त्याचा थोडा विचार करू. ‘कामिनी’ म्हणजे ज्या माध्यमातून कामनापूर्ती होईल ते माध्यम. माणूस देहबुद्धीनं जगात वावरत असतो. ‘देह म्हणजेच मी’ या भावनेत जगत असतो. देहसुखालाच महत्त्व देत असतो. पण मनुष्य म्हणजे निव्वळ देह नव्हे. ‘मनुष्य’ या शब्दातच मन आहे. तेव्हा तन आणि मन म्हणजे माणूस आहे. हा देह अंगसंगतीत गुरफटतो, पण तरी देहाच्या संगाला मर्यादा आहेत. मनाच्या संगाला मात्र कोणतेच बंधन नाही. हे मन आभासी संगात किती तरी खोलवर रुतू शकतं, वाहवत जाऊ शकतं. ‘काष्ठाची पुतळी’ हे त्याचंच प्रतीक आहे! काम आणि कामनापूर्तीचा प्रत्यक्ष देहसंग नसेल, पण त्या संगाचा कल्पनेच्या पातळीवर ‘अनुभव’ घेण्याची क्षमता मनात असेल, तर त्या आभासी संगात साधक अडकू आणि रुतू शकतो. आता त्यातही अस्वाभाविक काही नाही, पण अखेर आपल्या जीवनाचा अग्रक्रम कशाला आहे, हे ठरवलं पाहिजे. श्रीतुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे, ‘‘एक मन तुझ्या अवघ्या भांडवला। वांटितां तें तुला येई कैसें।।१।। म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग। देहा लावीं संग प्रारब्धाचा।।ध्रु.।। आणिका संकल्पा नको गोऊं मन। तरीच कारण साध्य होय।।२।। तुका म्हणें ऐसें जाणावें उचित। तरी सहज स्थित येईल कळों।।३।।’’ तुकाराम महाराज जणू सांगत आहेत की, ‘‘हे साधका, तुझ्याकडे एका मनाचंच काय ते भांडवल आहे. ते तुला कसं वाटता येईल? ते परमतत्त्वात गुंतव आणि देह प्रारब्धकर्म पार पाडण्यात गुंतव. तरच काही साध्य होईल. मनाला विविध कल्पनांमध्ये अडकू देऊ नकोस. कारण अनंत कामकल्पना या सूक्ष्म संकल्पच ठरतात. किंबहुना ‘अमुक व्हावं’ अशा ज्या ज्या कल्पना माणसाच्या मनात उत्पन्न होतात ना, त्यांना संकल्पच मानलं जातं. मग प्रत्येक संकल्प पूर्णत्वाला जाईपर्यंत माणसाला जन्मावंच लागतं. तेव्हा अशा कोणत्याही कल्पनांमध्ये मनाला रमू न देता ते भक्तीकडे वळव, मगच खरं काही साधता येईल.’’ आता हे शक्य आहे का हो? तर शक्य आहे, पण सोपं नाही. याचं कारण माणूस म्हणजे देह आणि मन जरी असला तरी देह हा स्थूल आणि मन सूक्ष्म आहे. जे सूक्ष्म असतं ना त्याची शक्ती आणि व्याप्ती विलक्षण असते. त्यामुळे हे मन इतक्या वेगानं माणसाला कल्पनेत बद्ध करतं की ते लक्षातही येत नाही. आजचा काळ तर वेगवान तंत्रप्रगतीनं असा युक्त आहे की, मनावर अनंत कल्पनाचित्रांचे ठसे आदळत असतात. मायेचा आभासी संग सहजप्राप्य झाल्यानं त्या संगाचा विळखा पक्का झाला आहे. अशा आव्हानात्मक पार्श्वभूमीवर ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ हा अनुभव साधकाच्या वाटय़ाला अनेकवार येत आहे. पण आधीच सांगितल्याप्रमाणे, अग्रक्रमाचा निर्णय तेवढा आपल्या हातात आहे. या गोष्टी क्षणार्धात मनातून हद्दपार होणार नाहीत. त्यांचा प्रभाव लगेच नष्ट होणार नाही आणि त्या धडपडीत आपण पडूही नये. पण आपला अग्रक्रम या कल्पनासंगाला नाही, एवढं मनाला बजावलं पाहिजे.