25 November 2020

News Flash

४२४. ‘रसना’ आणि ‘आहार’

धन, काम आणि अन्नातील आसक्ती माणसाला गळाला अडकवते.

(संग्रहित छायाचित्र)

– चैतन्य प्रेम

धन, काम आणि अन्नातील आसक्ती माणसाला गळाला अडकवते. गळाला अडकलेला मासा जसा जिवंत असेपर्यंत चडफडत, तडफडत राहतो तसा या गळात अडकलेला माणूसही निश्चिंतपणे जगू शकत नाही. हे गळ दिसत नाहीत. ते सूक्ष्म असतात, अदृश्य असतात. सूक्ष्म अशा मनाशी त्यांचा संबंध असतो आणि अदृश्य असले तरी माणसाच्या दृश्य जीवनावर त्यांचा फार खोलवर प्रभाव पडतो. त्या गळाला अडकलेल्या माणसाचं जगणं अधीर, अस्थिर, अस्वस्थ आणि अशांत असतं. जणू गळाला लागलेल्या माशाचं तडफडणं! एकनाथ महाराज अवधूताच्या माध्यमातून सांगतात की, ‘‘गळीं अडकला जो मासा। तो जिता ना मरे चरफडी तैसा। तेवीं रोगू लागल्या माणसा। दु:खदुर्दशा भोगित।।१७५।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). या गळाला अडकलेल्या माणसाला भवरोगच जडतो आणि तो अखंड दु:ख भोगतो, मन खचल्यानं स्वत:च स्वत:ची दुर्दशा करून घेतो. हे गळ जीवनात सावलीसारखे बरोबर असतात. धनाच्या आसक्तीत गुंतलेल्या माणसासाठी पैसा हेच ध्येय असतं, पैसाच श्रेय आणि प्रेय असतो. श्रेय म्हणजे जे श्रेयस्कर आहे, हिताचं आहे ते आणि प्रेय म्हणजे जे मनाला प्रिय आहे ते. आता जे प्रिय आहे ते हिताचं असेलच असं नाही. म्हणून प्रेयापेक्षा श्रेयाचीच निवड करावी, असं संत सांगतात. अर्थात माझ्यासाठी खरं श्रेयस्कर काय, हे सद्गुरू वा सत्पुरुषच सांगू शकतात. देहबुद्धीचा जोर असेतोवर धनासक्त माणसाला पैसाच श्रेयस्कर भासतो. आत्महितापेक्षा मोलाचा वाटत असतो. पैशाच्या आसक्तीसह कृपणता म्हणजे कंजूषपणाचा रोगही जडतो.अशांना धड पैशाचं सुखही अनुभवता येत नाही. भले ते सुख त्या पैशाइतकंच चंचल का असेना! कामासक्त माणसासाठी कामसुख हेच ध्येय असतं. तेच त्याला श्रेय आणि ध्येयस्थानी असतं. आता काम आणि धनातील आसक्तीची कधी तरी जाणीव होऊ शकते, पण अन्नातील आसक्तीमधील, म्हणजे  रसनालोलुपतेतील धोक्याची जाणीवच होत नाही. आता हे जे ‘अन्न’ आहे ते केवळ रसनेनं ग्रहण केलं जाणारं नाही. रसना जशी मिष्टान्नासाठी चटावते तसेच कानही श्रवणसुखास, डोळे नेत्रसुखास, नाक गंधसुखास चटावतंच ना? तेव्हा ही इंद्रियंही ‘रसना’ आणि त्यांचे विषय हासुद्धा ‘आहार’च आहे! एकनाथ महाराज सांगतात, ‘‘रसनालोलुप्यप्रमादी। त्यासी कैची सुबुद्धी। जन्ममरणें निरवधी। भोगी त्रिशुद्धी

रसदोषें ।।१७६।।’’ जो रसनालोलुपतेत अडकतो, देहबुद्धीला सुखकारक भासणाऱ्या ‘आहारा’त अखंड गुरफटतो,  त्याला सुबुद्धी कुठून उरणार? सुबुद्धी म्हणजे योग्य-अयोग्यतेचा निवाडा करणारी भगवंतसन्मुख बुद्धी! ही बुद्धी गेली की शाश्वताऐवजी अशाश्वताचीच गोडी लागते. त्यातून भ्रम, मोह वाढून विपरीत कर्मे घडत जातात. ती जन्ममरणाच्या साखळीत अडकवतात. जोवर अशाश्वतात रस कायम असतो तोवर जीव शाश्वत सुखापासून वंचित राहून दु:खभोगात भरडला जात असतो. अशाश्वताच्या त्या रसगोडीत दोष उत्पन्न झाल्याशिवाय- त्यात गोडी घेणं थांबल्याशिवाय सत, रज आणि तम या त्रिगुणांची शुद्धी होऊन शाश्वताची गोडी लागत नाही. आता केवळ या रसनासक्तीने पुन:पुन्हा जन्मावं लागतं, हे कुणाला पटणार नाही, हे अवधूत जाणतो. त्यावर तो म्हणतो की, ‘‘इंद्रियांची सजीवता। ते रसनेआधीन सर्वथा। रसनाद्वारें रस घेता। उन्मत्तता इंद्रियां।।१७८।।’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:06 am

Web Title: loksatta ekatmayog article 424 abn 97
Next Stories
1 ४२३. रोगांचे गळ गुप्त!
2 ४२२. विचार आणि भोग
3 ४२१. आभासी संग
Just Now!
X