– चैतन्य प्रेम

सत्याची जाणीव करून देणाऱ्या, शाश्वताचे संस्कार करणाऱ्या, भ्रमाची जळमटं दूर करणाऱ्या अशा, सृष्टीतील प्रत्येक घटकात अवधूताला ‘गुरू’चंच दर्शन घडलं. सद्गुरू हा एकच असतो हे खरं, पण जर आपल्या अवतीभोवती जाणिवेचे कान आणि डोळे उघडे ठेवून वावरलो, तर प्रत्येक गोष्टीतून प्रकट होणारा सद्गुरुबोध जाणवल्याशिवाय राहात नाही. त्याच दृष्टीनं अवधूताला सर्वत्र गुरुतत्त्वाचीच प्रचीती आली आणि गुरुबोधाचंच दर्शन झालं. त्यातल्या चोवीस गुरूंची ओळख त्यानं यदुराजाला करून दिली. या चोविसांपलीकडेही अनेक गोष्टींमध्ये त्याला गुरुतत्त्वबोधाचा प्रत्यय आला आहे, हे लक्षात ठेवावं. त्यातील जे चोवीस गुरू त्यानं प्रकट केले त्यातला अगदी आगळावेगळा ‘गुरू’ आहे पिंगला नावाची देहविक्रय करणारी स्त्री! समग्र संतसाहित्यात देहविक्रय करणाऱ्या स्त्रीचा उल्लेख अंत:करणातील तुच्छ वासनात्मक ओढीची निंदा करताना रूपक म्हणून क्वचित झाला आहे. पण ‘गुरू’ म्हणून असा उल्लेख एकमेव आणि म्हणूनच विलक्षण आहे. स्त्री-समानता, स्त्री-अधिकार, स्त्री-स्वातंत्र्य म्हणून जे काही चित्र आहे ते शहरी स्तरावर आढळतं, पण इतर स्तरांवर आजही स्त्री ही न्यायापासून सहज वंचित ठेवली जाऊ शकणारी, आर्थिक गुलामगिरीत भरडू शकणारी, निर्णयाधिकारात दुर्लक्षिली जाऊ शकणारी घटक आहे याचा प्रत्यय आजही काही घटनांतून विदारकपणे येतो. राजकारण हा आपला चिंतनाचा प्रांत नाही, पण एखाद्या नेत्याला दुर्बळ दाखवायचं असेल तर त्याला बांगडय़ा पाठवायची मनोवृत्ती आजही आहे आणि स्त्रियादेखील अशा गोष्टी करण्यात सामील होतात, ही किती वाईट गोष्ट आहे. उत्तर प्रदेशात एकदा नवरात्रात होतो आणि एका लहान मुलीची पाद्यपूजा केली गेली. तिनं मग मला विचारलं, ‘‘भाई नवरात्री में बच्चियों की पूजा क्यूं करते है?’’ (नवरात्रीत लहान मुलींची पूजा का करतात?) मी हसून म्हणालो, ‘‘आप को दुर्गा का रूप माना जाता है!’’ (तुम्हाला दुर्गेच्या रूपात पाहिलं जातं) त्यावर बारा-तेरा वर्षांच्या त्या मुलीनं विचारलं, ‘‘फिर नवरात्री के बाद हमें दुर्गा क्यो नहीं मानते?’’ (नवरात्रीनंतर आम्हाला दुर्गा का मानत नाहीत?). तर असं आपलं प्रतीकात्मकतेचं वेड आहे. यावर एखाद्या गार्गी-मैत्रेयीचं उदाहरण किंवा मातृसत्ताक पद्धतीचं वा स्त्री राज्याचं उदाहरण पुरेसं नाही. त्या परंपरेत सातत्य राहिलं नाही, हे सत्य काही नाकारता येत नाही. तर अशा या समाजातली ही एक स्त्री आहे पिंगला. ती देहविक्रय करून गुजराण करत आहे. कोणतीही स्त्री स्वखुशीनं ज्या मार्गात कधी येत नाही तोच तिचा उपजीविकेचा मार्ग आहे. देह हा माणसाला सर्वस्व वाटतो. देह म्हणजेच मी, ही त्याची धारणा असते. त्या देहाची अस्मिता राखण्याचा अधिकार जिला नाकारला गेला होता, अशी ती स्त्री आहे. आज ती तरुण आहे, रूपवान आहे. त्यामुळे हीच आपली ‘बलस्थानं’ आहेत, असं तिला वाटत आहे. वयपरत्वे हे रूप-तारुण्य झपाटय़ानं ओसरून आपली पालापाचोळ्यागत गत होईल, या विदारक वास्तवाची तिला या घडीला जाणीवही नाही. अशा स्थितीत असलेल्या जीवाच्या अंत:करणात अवचित शुद्ध ज्ञानाचा किरण प्रकटला आणि एक विलक्षण वैराग्य निपजलं, हीच अद्भुत गोष्ट एका सायंकाळी घडली. अवधूत सांगतो, ‘‘आधींच रूप उत्तम। वरी शृंगारिली मनोरम। करावया ग्राम्यधर्म। पुरुष उत्तम पहातसे।।१९१।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा).

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…