– चैतन्य प्रेम

भ्रम, मोह आणि आसक्तीनं जीव जगाच्या ओढीत गुंतलेला असतो. आता जग जरी विराट असलं तरी प्रत्येकाचं जग हे त्याच्यापुरतंच असतं. म्हणजे या जगात अमेरिका देश असला तरी जोवर माझ्या वैयक्तिक जीवनावर अमेरिकेतील स्थितीचा कोणताही परिणाम होत नसतो तोवर तो माझ्या जगाचा भाग नसतो. पण माझा अगदी जवळचा आप्त तिथे राहू लागला तर तेथील बर्फवृष्टीची, चक्रीवादळांची मलाही चिंता वाटू लागते! सांगायचा मुद्दा हा की, जग किती का विराट असेना, माझ्या वैयक्तिक जीवनावर बरा-वाईट परिणाम करू शकतील, अशाच गोष्टी माझ्या जगाचा अविभाज्य भाग असतात. माझ्या जगाचा परीघ तेवढाच असतो. जगात कोटय़वधी माणसं असली तरी माझ्या जगाच्या परिघात मी ज्यांना ‘माझं’ मानतो तेवढीच माणसं असतात. मग ते ‘माझे’ मित्र, आप्त, परिचित असोत की ‘माझे’ नावडते, शत्रू, विरोधक असोत! या गोतावळ्यानंच माझं जग बनलेलं असतं. ज्यांच्या समावेशामुळे मला बौद्धिक, भावनिक, मानसिक लाभ होईल, असं वाटतं; अशा व्यक्तींना या जगात समाविष्ट करण्यासही मी उत्सुक असतो. मात्र जग हे स्वाभाविकपणे स्वार्थकेंद्रित आहे. कारण या जगाचा घटक असलेला ‘मी’सुद्धा स्वार्थकेंद्रितच आहे! मग जगाला दोष का द्यावा? त्यामुळे जोवर स्वार्थाला विशेष बाधा येत नाही तोवर जग आपल्या मनाजोगतं राहत असतं. याला अर्थातच अपवाद आहेत, पण आपण सर्वसाधारण विचार करीत आहोत. तर अनंत ‘मीं’नी भरलेलं जग काही कायम कुणा एका ‘मी’च्या तालावर नाचत नाही. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी ‘मी’चा अपेक्षाभंग होतो. तरीही जीव त्या धक्क्यातून काही शिकत नाही. तो व्यक्तींना दोष देतो, परिस्थितीला दोष देतो. आता तरी माझ्या मनासारखं घडेल, मनासारखी माणसं आयुष्यात येतील, या भावनेनं नव्या ओढीनं तो पुन्हा जगमोहातच अडकतो. त्या पिंगलेलाही वाटलंच की, ‘‘आतां येईल वित्तवंत। अर्थदानीं अतिसमर्थ। माझा धरोनिया हात। कामआर्त पुरवील।।१९७।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). पिंगलेला वाटत आहे की, अर्थ म्हणजे पैसा आणि काम म्हणजे वासना यांची पूर्ती करणारा समर्थ दानशूर असा वित्तवंत येईल, माझे हात धरून मला आपलंसं करीत माझं आर्त पुरवील! नाथांनी काय विलक्षण शब्द योजला आहे.. ‘कामआर्त’! खरं पाहता जन्मापासून जीवाच्या अंत:करणात एक गूढ आर्त सुप्तपणे आहे. ते नेमकं कशानं शमेल, हे कळत नाही म्हणून सगळी तळमळ आहे. मग  मेकॅनोतले अनेक तुकडे जोडून पाहावेत तसं अनेक गोष्टी माणूस करून पाहात असतो; पण त्यात स्वत:ला विसरावं, अशा तृप्तीचा अनुभव येत नाही. केवळ कामविषयाच्या प्रवाहात त्याची झलक मिळते आणि त्यामुळे सहजप्राप्य अशा कामसुख चिंतनात तो गढून जातो. त्याच्या आयुष्यातला किती तरी मोठा काळ हा भावनिक वणवण करण्यात ओसरत असतो. या ‘सुखाभासा’चा पगडा इतका मोठा असतो की, साधकालाही तो झिडकारून कायमचा झटकता येत नाही. अर्थात, कामसुखापेक्षाही प्रेमसुखाचं महत्त्व अबाधित असतं आणि कालांतरानं प्रेमप्रभावच कामावर मात करतो. जीवाला खरी भूक विशुद्ध, निरपेक्ष, अखंड प्रेमाचीच असते. पिंगलेच्या मनातलं कामआर्त हे म्हणूनच खरं तर प्रेमआर्त होतं! जे आयुष्यात कधीच गवसलं नाही त्या शुद्ध प्रेमासाठी तिच्या अंत:करणात आर्तता दाटून आली होती. म्हणूनच तर ती अशा ‘उत्तम पुरुषा’ची प्रतीक्षा करीत होती!