– चैतन्य प्रेम

माणूस दु:खात बुडून जातो तेव्हा त्या दु:खापलीकडे त्याला काहीच दिसत नाही. त्या दु:खाचं सावट इतकं मोठं असतं की, सारासार विचार करण्याची क्षमताही लयाला गेलेली असते. पण ज्याच्यावर भगवंताची कृपा असते त्याला आपल्या दु:खाकडे अलिप्तपणे पाहता येऊ लागतं. ज्या देहभावामुळे त्या दु:खापलीकडे काहीच दिसत नसतं, त्या दु:खाचंच निरीक्षण माणूस करू लागतो. जग आपलं दु:ख दूर करू शकत नाही. ते अटळ दु:ख स्वीकारावंच लागतं. मग सकारात्मक वृत्तीनं त्या दु:खाकडे पाहिलं तर मनानं त्यापलीकडे जाता येतं. ते दु:खं मग लहान भासू लागतं. एवढय़ा या लहानशा दु:खामागे आपण किती वाहवत जात होतो, त्याच्या पकडीत किती अडकून होतो, हे उमगू लागतं. मग विषयात अडकलेल्या मनात अचानक वैराग्य उत्पन्न होतं. पिंगलेचंही तसंच झालं; अवधूत म्हणतो, ‘‘कैसें वैराग्य उपजलें तिसी। जे चिंतीत होती विषयासी। त्या विटली विषयसुखासी। छेदक आशेसी वैराग्य।।२०३।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे, जी विषयाचंच चिंतन करत होती ती त्या विषयाला विटून गेली! सारांश, वैराग्य हे आशेला छेदून टाकतं. आणि एकदा वैराग्य उत्पन्न झालं की विवेक जागा होतो. ज्याच्या बुद्धीत वैराग्य नाही त्याची काय दशा होते? अवधूत सांगतो की, तो जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो. (‘‘वैराग्य नाहीं ज्याचे बुद्धीं। त्यासी जन्ममरणाची आधिव्याधी। प्रतिपदीं बाधकु।।’’). आता जन्म-मृत्यूचं चक्र म्हणजे काय? तर संक्षेपानं याचा विचार करू. माणसाचा जन्म वासनेत म्हणजे इच्छेत असतो. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा हा सत्यसंकल्पी आहे. म्हणजेच परमात्मा जो संकल्प करतो तो सत्यात उतरतोच. जीव हा परमात्म्याचा अंश असल्याने त्याचा संकल्प म्हणजेच त्याची इच्छाही सत्यात उतरल्याशिवाय राहात नाही. फरक इतकाच की, परमात्म्याचा संकल्प तात्काळ सत्यात उतरतो, पण जीवाचा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी काळाची, परिस्थितीची अनुकूलता लागते. ती अनुकूलता येईपर्यंत जीवाला जन्म घ्यावाच लागतो. शारदामाता म्हणत की, ‘‘बर्फीचा अर्धा तुकडा खाण्याची इच्छा अपुरी राहिली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो.’’ तेव्हा मनात येणारी प्रत्येक इच्छा ही पुढील जन्मांचं बीजही असू शकते. जोवर वैराग्य मनात उपजत नाही तोवर मनातला अवास्तव इच्छांचा पसारा कमी होत नाही. तो कमी होत गेला की मगच जन्म-मृत्यूच्या फेऱ्या मंदावतात. ज्याच्या मनात अनुताप नाही त्याच्या मनाला वैराग्य शिवत नाही. मागेच आपण पाहिलं की, हातून चूक घडून गेल्यानंतर मनात वाटणारी हळहळ म्हणजे पश्चात्ताप आणि चूक घडण्याचा प्रसंग ओढवला की मनाच्या वृत्तीच्या जाणिवेनं होणारी वेदना, वाटणारी हळहळ हा अनुताप आहे. पश्चात्तापात चूक घडून गेलेली असते, वागू नये ते वागलेलो असतो, बोलू नये ते बोललेलो असतो. अनुतापात चूक घडू शकेल अशी परिस्थिती उद्भवलेली असते आणि मनात काम, क्रोध, मत्सर आदी विकार उफाळून आलेले असतात. त्याचबरोबर त्यांची जाणीवही तीव्रपणे होत असते आणि त्यांचं दु:खही वाटत असतं. असं जेव्हा होतं तेव्हाच चूक टाळण्याची इच्छाही निर्माण होते. पण अनुताप नसेल तर विवेक नाही. विवेक नाही तर आशेचा निरास नाही. अवधूत म्हणतो, ‘‘अनुतापु नाहीं ज्यासी। विवेक नुपजे मानसीं। तो संसाराची आंदणी दासी। आशापाशीं बांधिजे।।२०६।।’’ त्याच्या मनाला मोहममतेची बेडी पडलेली असते. त्याच्या मनात अहोरात्र विषयांचंच दळण सुरू असतं. अशा मनाला अर्धघडीदेखील शांतता नसते.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय