– चैतन्य प्रेम

स्वत: जो भयाच्या कचाटय़ात जगत आहे तो दुसऱ्याला निर्भय करू शकत नाही. माणसाची ही दशा आहे; पण याचा अर्थ दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात अर्थ नाही, असा नव्हे. कारण एकमेकांना भावनिक तसंच आवश्यक आणि शक्यतो भौतिक, व्यावहारिक आधार देण्यात माणुसकीचं सौंदर्य आहे. त्याच वेळी एक गोष्टही खरी की जसं विमलाताई ठकार म्हणतात त्याप्रमाणे ‘आधार, पण आश्रय नव्हे,’ हे सूत्रही विसरता कामा नये. जसा दुसऱ्याला होईल तितका आधार द्यावा, पण त्याला आश्रित करू नये, तसंच आपणही दुसऱ्या माणसांचा आधार घ्यावा, पण त्यांचं आश्रित होऊ नये! आश्रय घ्यायचाच तर जो कुणाच्याही आश्रयाविना खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहे त्याचाच घ्यावा. असा या चराचरात एक खरा सद्गुरूच आहे. तो ‘स्वयानंदं स्वयाधारं निखिलाधारमव्ययम्’ (श्रीअवध भूषण रामायण) आहे. त्याला सोडून जिथं दुसऱ्या माणसाचा आश्रय मिळविण्याची आस आहे आणि तो टिकविण्याची धडपड आहे तिथं भावनिक गुलामगिरीचा भोवरा आहे. आवश्यक तितका आधार मात्र माणसाला पूर्णत्वाची प्रेरणा देण्याइतपत उपयुक्त आहे. उदाहरणार्थ एखादा यशस्वी व्यावसायिक जेव्हा एखाद्या तरुण व्यावसायिकाला आधार देतो तेव्हा त्या तरुणाच्या मनात आपणही यशस्वी व्यावसायिक बनावं, ही जिद्द जोपासली जाते. त्यासाठीच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते. एखादा तज्ज्ञ डॉक्टर तरुण डॉक्टरला आधार देत कौशल्याचा वारसा सोपवतो तेव्हा त्या तरुणाच्या अंत:करणात उत्तम डॉक्टर होण्यासाठीच्या कृतीचे संस्कारच संक्रमित होत असतात. तर असा हा आधार एका मर्यादेपर्यंत माणसाला घडविण्यात उपयुक्त असतो; पण आश्रय मिळविण्याची आणि टिकविण्याची आस मात्र वर म्हटल्याप्रमाणे भावनिक भोवरा आहे. तो भवसागरात गरगरा फिरविल्याशिवाय राहणार नाही. पिंगलेला या अपूर्ण आधारातले पूर्ण धोके उमजले. माणसाच्या आधाराची ही गत, मग ‘देवा’चा आधार तरी कायमचा आहे का? या प्रश्नापाठोपाठ पिंगलेच्या मनासमोर देवांचा राजा इंद्र हाच उभा राहिला. तिच्या मनात आलं, ‘‘असो नराची ऐसी गती। करू अमरांमाजीं अमरपती। बिळांत ते चौदा निमती। पदच्युति अमरेंद्रा।।२५३।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे, नरांच्या आधाराची ही दशा, मग देवराज इंद्रालाच स्वामी करावं, त्याचा आधार घ्यावा, तर ब्रह्मदेवाच्या एका आयुष्यात चौदा इंद्र नष्ट होतात. अर्थात इंद्रही अविनाशी नाही, त्यालाही पद गमावण्याची सदोदित भीती आहे. मग त्याचा आधार तरी अविनाशी कसा असेल? ‘‘एवं सुर नरलोक लोकीं। आत्ममरणें सदा दु:खी। ते केवीं भार्येसी करिती सुखी। भजावें मूर्खी ते ठायीं।।२५४।।’’ देव आणि मानव सदा दु:खभोगात बुडाले असताना ते कुणाला कसं सुखी करणार? मूर्खानीच हवं तर त्यासाठी धडपडावं, असं पिंगला म्हणते. याच ओवीत नाथांनी एक फार विलक्षण आणि चिरंतन असं  सूत्रही मांडलं आहे. पण ते इतक्या सहजतेनं आलंय की पटकन लक्षातही येत नाही. ते अत्यंत महत्त्वाचं पारमार्थिक सूत्र आता पाहू.

chaitanyprem@gmail.com