02 March 2021

News Flash

४४७. मुमुक्षू आणि साधक

एकनाथी भागवत किंवा अन्य कोणत्याही सद्ग्रंथाचं मनापासून पठण आणि श्रवण घडलं, तर सामान्य माणूसही भक्तीच्या सन्मार्गाला लागतो.

(संग्रहित छायाचित्र)

– चैतन्य प्रेम

एकनाथी भागवत किंवा अन्य कोणत्याही सद्ग्रंथाचं मनापासून पठण आणि श्रवण घडलं, तर सामान्य माणूसही भक्तीच्या सन्मार्गाला लागतो. पठण आणि श्रवण या एकाच वेळी घडणाऱ्या क्रियाही आहेत. म्हणजे आपण डोळ्यांनी वाचत असताना आपल्याच कानांनी ऐकतही असतो. तर असं मनापासून पठण, श्रवण घडलं की सन्मार्ग समजू लागतो आणि त्यावर पाऊलही ठेवलं जातं. आता इयत्ता पहिलीत उत्तम शाळेत प्रवेश मिळाला एवढय़ानं कुणी लगेच दहावीच्या परीक्षेला बसून भरघोस गुण मिळवत नाही. त्यासाठी अभ्यासाची ओढ लागावी लागते. विषय समजून घेण्याची तळमळ असावी लागते. ग्रंथात नेमकं काय सांगितलं आहे, याचा शोध घ्यायला सुरुवात होते. हा या भक्तिमार्गावरचा मुमुक्षू! जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वचनानुसार, ‘‘जे मुमुक्षू आहेत त्यांना शुद्ध परमार्थ कळू लागेल.’’ मुमुक्षूची आंतरिक स्थिती अशी असते की, साक्षात्कार व्हावा, असं त्याला तीव्रपणे वाटत असतं, पण ‘साक्षात्कार’ म्हणजे काय आणि तो झाल्यानं नेमका काय लाभ होणार आहे, हे नेमकेपणानं उमगलं नसतं. परमार्थाची क्षीण ओढ उत्पन्न झाली असली तरी जगाची ओढ सुटली नसते. संतवचनं मनाला भिडत असतात, पण ती अंतर्मनात पक्केपणानं रुजून जीवनात प्रतिबिंबित होत नसतात. संत एकनाथ महाराजांनी अनेक अभंगांतून मुमुक्षूंना बोध केला आहे. त्या अभंगांमधली, ‘‘लक्ष चौऱ्यांयशी फिरतां। अवचिता लाभ होतां।। नको श्रमूं विषयकामा। कांही तरी भजे रामा।।’’, ‘‘देह आहे तुम्हां आधीन। तोंवरी करा भजन।।’’ किंवा ‘‘नरदेहीं येऊनी करी स्वार्थ। मुख्य साधी परमार्थ।।’’, ‘‘शुद्धभावें गावें नाम श्रीहरीचें। भेदभाव साचे टाकूनियां।।’’ आदी बोधवचनं वाचताना मनाला भिडतात, त्यात सांगितलं आहे, तसंच करायचं, असा निश्चयही त्या क्षणी घडतो; पण प्रत्यक्ष वेळ आली की पूर्वीच्याच जग ओढीनुसार आपण जगू लागतो! काही वेळा अर्धा बोध पटतो, बाकी अनुभवाचा वा चिंतन-मननाचा आधार नसल्यानं वाचण्यापुरताच राहतो. उदाहरणार्थ, ८४ लाख योनींत भटकून अखेर हा माणसाचा जन्म मिळाला, तर त्याचा परमार्थासाठीच उपयोग करावा, हे वाक्य शब्दार्थानं समजतं, पण अनुभव? अशा ८४ लक्ष योनींत आपण फिरलो, हेच समजत नाही. ‘‘नको श्रमूं विषयकामा, कांही तरी भजे रामा,’’ हे वाचलं तरी विषयपूर्तीसाठी श्रमणं थांबत नाही. बरेचदा तर रामाचं भजनही त्या विषयपूर्तीची इच्छा मनात बाळगून सुरू असतं. नामस्मरण सुरू, पण जगाकडे अभेद दृष्टीनं पाहता येतच नाही. अशा मुमुक्षूनंही जर सद्ग्रंथांचं आकलन, मनन आणि चिंतन सुरू ठेवलं तर संतांनी सांगितलेला शुद्ध परमार्थ शब्दांनी तरी उमगू लागतो. जो या आकलन, मनन, चिंतनाचं बोट धरून त्या बोधानुरूप आचरणाचा अभ्यास सुरू करतो तो साधक! आणि जनार्दनस्वामी वर देतात की, ‘‘हा सद्ग्रंथ वाचणारे जे साधना करीत आहेत ते भवसागर तरून जातील!’’ पण हा कृतार्थ शेवट नाही! भवसागर तरून गेलो की सगळं पार पडलं असं नाही. पण ते पाहण्याआधी या वाक्याचाही विचार केला पाहिजे. हे वाक्य एका सुरातलं असलं तरी त्याचे दोन भाग आहेत. पहिला भाग ‘साधना’ आहे. ती किती काळ व्हावी लागेल, हे साधकाच्या आंतरिक विकासावर अवलंबून आहे. त्यानंतर दुसरा भाग ‘भवसागर तरून जाणं’ हा आहे. आणि खरं तर ‘भवसागर’ तरून गेल्यावर जाणवेल की, खरी साधना आता सुरू होणार आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:06 am

Web Title: loksatta ekatmayog article 447 abn 97
Next Stories
1 ४४६. पठण-श्रवण
2 ४४५. आस-निरास
3 एकात्मयोग : ४४४. चरणागत!
Just Now!
X