– चैतन्य प्रेम

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

साधक जर ‘एकनाथी भागवता’चं अभ्यासयुक्त मनन करतील, तर ते भवसागर पार करतील. या भवसागराची व्याख्या आपण मागेच पाहिली- अशाश्वताच्या भावनिक ओढीत अडकलेलं आपलं अंत:करण हाच भवसागर आहे. आता आपल्यालाही अनुभव असेल की, आपल्या जवळची कुणी व्यक्ती वा आप्त एखाद्या भावनिक गुंत्यात अडकल्यास आपण त्याला समजाविण्याचा प्रयत्न करतो. ज्या दु:खाला कवटाळून तो खचून निराश झाला असतो, ते दु:ख आपल्याला फार क्षुल्लक वाटत असतं. इतकंच नाही, तर अनेकदा समजावूनही ती व्यक्ती त्या दु:खाच्या पकडीतून स्वत:ला सोडवत नाहीये, अशी आपली भावना झाली तर काही वेळा त्या व्यक्तीचाच आपल्याला राग येतो! पण आपल्या बाबतीत असं काही घडलं, तर आपल्या दु:खाला आपणही असंच दृढमिठी घालून बसतो! सांगायचा मुद्दा हा की, हा भवसागर जोवर पार होत नाही, तोवर त्या दु:खापलीकडे कशालाच महत्त्व वा अग्रक्रम येत नाही. मग साधना तरी खऱ्या अर्थानं होणं कसं शक्य आहे? श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत, सुखाची तीव्र इच्छा आणि दु:खाची तीव्र भीती असल्यानं आपण सतत दु:खच भोगत असतो. दु:खाची भीती सोडली की मग सहज स्थितीत सहज सुखच आहे! जीवन म्हटलं की दु:ख अटळ आहे. एकानं विचारलं की, दु:ख सुटत नाही आणि शाश्वत सुख गवसत नाही, अशा स्थितीत काय करावं? उत्तर सोपं आहे, साधनेचं बोट न सोडता दु:खनिवारणासाठी प्रयत्न करीत राहावं. बरं साधनेच्या मार्गावर येण्याआधी जीवनात दु:खं होतीच ना? ती काही आताच आलेली नाहीत. तेव्हा दु:खं कशी दूर करता येतील, याचा अवश्य विचार करावा. या दु:खांचीही नीट छाननी करावी. खरी दु:खं किती नि अपेक्षाभंगानं, मनासारखं न घडल्यानं झालेली दु:खं किती, हे पाहावं. अशाश्वताच्या प्राप्तीत अडथळा आल्यानं किती दु:खं आली, हे तपासावं. मग लक्षात येईल, खऱ्या दु:खांऐवजी मानसिक दु:खंच प्रमाणापेक्षा मोठी वाटतात. ती सोडविण्यातच शक्ती आणि वेळेचा अपव्यय वा अनाठायी वापर होतो. तेव्हा काही मानसिक दु:खं ही दुर्लक्ष केल्यानं दूर होतात, हे लक्षात आलं की दृष्टिकोन व्यापक होऊन खऱ्या दु:खांकडे लक्ष जातं. आता एखादा पदार्थ बनवताना जसं, ‘‘आता एक चमचा साखर घाला, दोन चमचे तिखट घाला, किंचित हिंग घाला..’’ असं वाचत जाऊन तसं लगेच करतो तितकं हे सोपं नाही! कारण यात चिंतनाची, मननाची,  अभ्यासाची जोड द्यायची आहे. कधी चुकणं, कधी बरोबर येणं, हाच अभ्यास असतो ना? तेव्हा या अभ्यासातही बरेच अडथळे आहेत, बरीच वळणं आहेत. सद्गुरू कृपेनं आणि त्यांच्या बोधानुरूप आचरणानंच हा अभ्यास साधत जातो. त्याशिवाय अंत:करणातला भवसागर ओसरणं शक्य नाही. जेव्हा त्या भवसागरात गटांगळ्या खाणं थांबेल तेव्हाच सद्गुरू आज्ञेनुसार आचरण सोपं होईल. हा भवसागर केवळ नामानं पार होईल, असं एकनाथ महाराज सांगतात. नाम ही नौका आहे (भवसिंधु तराया नाम हे नौका। उतार ते लोकां सोपा केली।।), नाम हेच औषध आहे (भवरोगियांसी औषध हें नाम। सेवावें परम आवडीनें।।) असं त्यांनी अनेक अभंगांतही सांगितलं आहेच. तेव्हा ‘एकनाथी भागवता’सारखे सद्ग्रंथ वाचून मुमुक्षूंना शुद्ध परमार्थ कळेल, तर साधक भवसागर पार करतील. त्यांना सद्तत्त्वाचं ज्ञान होईल आणि  या सद्ग्रंथाच्या कृपेनं, जे ज्ञानी आहेत ते सुखी होतील, असा जनार्दन स्वामींचा आशीर्वाद आहे!