– चैतन्य प्रेम

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

जीवनातला एक क्षणदेखील कर्म केल्याविना सरत नाही. मग प्रश्न असा की, कोणती कर्मे करावीत की ज्यायोगे कोणत्याही गुंत्यात माणूस अडकणार नाही? याचं फार मनोज्ञ उत्तर एकनाथ महाराजांनी दिलं आहे. ‘एकनाथी भागवता’च्या २१ व्या अध्यायात ते म्हणतात, ‘‘जेणें कर्मे तुटे कर्मबंधन। तें कर्माचरण अतिशुद्ध।।’’ (१६१ व्या ओवीचा उत्तरार्ध) व ‘‘जेणें कर्मे होय कर्माचा निरास। तें शुद्ध कर्म सावकाश।।’’ (१६३ व्या ओवीचा प्रथम चरण). म्हणजे ज्या कर्माचरणानं कर्मबंधन तुटतं तेच कर्माचरण अत्यंत शुद्ध आहे, तसेच ज्या कर्मानं कर्माचा निरास होतो तेच कर्म खरोखर शुद्ध आहे! याच अध्यायात एकनाथ महाराज म्हणतात की, ‘‘स्वयें करितां कर्माचरण। जेणें खवळे देहाभिमान। कर्त्यांसी लागे दृढ बंधन। तें कर्म जाण अपवित्र।।१६२।।’’ म्हणजे जे कर्म आचरताना देहभाव दृढ होतो आणि आपण बंधनात पडतो, ते कर्म अपवित्र आहे. पण मग असं कोणतं कर्म आहे, जे इतर कर्माचा नाश करतं? तर निष्काम कर्म हेच खरं कर्म आहे. म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता वाटय़ाला आलेली कर्तव्यं पार पाडणं आणि ती पार पाडली जात असताना मनात सद्विचाराचं मनन, चित्तात सद्विचाराचं चिंतन, बुद्धीनं सद्विचाराचा बोध या रीतीनं प्रत्येक क्षण स्मरणात घालवण्याचा प्रयत्न करणं; हेच खरं शुद्ध कर्म आहे! या शुद्ध कर्मासाठी काळवेळ पाहायला नको, मुहूर्त काढायला नको, दिशा आणि वास्तुशुद्धीची चिंता पाळायला नको! एकनाथ महाराज तर स्पष्टच सांगतात, ‘‘जेथ समबुद्धि सदा अविनाश। तो ‘पुण्यदेश’ उद्धवा।।’’ (१६३ व्या ओवीचा उत्तरार्ध). म्हणजे, जेथे सदासर्वदा समबुद्धी टिकून राहते तेच पुण्य क्षेत्र आहे. मग ते आपलं राहातं घरही का असेना! उलट, ‘‘जरी सुक्षेत्रीं केला वास। आणि पराचे देखे गुणदोष। तो देश जाणावा तामस। अचुक नाश कर्त्यांसी।।१६४।।’’ म्हणजे, भले सुक्षेत्रात राहात असलो, पण दुसऱ्याचे गुणदोषच जर दिसत असले, तर तो प्रदेश तामसीपणाला वाव देणारा आणि आपला आत्मघात करणारा आहे. मग म्हणतात, ‘‘जेथ उपजे साम्यशीळ। तो देश जाणावा निर्मळ। चित्त सुप्रसन्न जे वेळ। तो ‘पुण्यकाळ’ साधकां।।१६६।।’’ जिथं मन, चित्त, बुद्धीचं समत्व गवसतं तो प्रदेश निर्मळ आहे आणि ज्या क्षणी चित्त सुप्रसन्न होतं तीच वेळ साधकासाठी शुभ, पुण्यकाळ आहे. पुढे म्हणतात, ‘‘स्वभावे शुद्ध ब्राह्ममुहूर्त। तेथही क्षोभल्या चित्त। तोही काळ अपुनीत। जाण निश्चित वेदार्थ।।१६७।।’’ म्हणजे, पहाटेचा ब्राह्ममुहूर्त हा पावन आहे खरा, पण त्याच वेळी चित्तात जर क्षोभ उत्पन्न झाला तर तो काळ अपवित्रच आहे, असं शास्त्रंही सांगतात. तेव्हा स्वजागृती आणि स्वसुधारणेला चालना देणारं साधनायुक्त कर्तव्यपालनाचं कार्य जर खरोखरच करायची इच्छा असेल, तर काळ-वेळ, दिशा, स्थान यांच्या अचूकतेच्या धडपडीत न पडता सद्गुरू बोधानुरूप जगणं सुरू करावं! हाच खरा सत्संग आहे.

chaitanyprem@gmail.com