– चैतन्य प्रेम

जगात विखुरलेल्या मनाला गोळा करण्यासाठी एका केंद्रबिंदूची गरज असते. तो केंद्रबिंदू म्हणजे सद्गुरू! जगात अपेक्षापूर्तीच्या ओढीनं भटकत, ठेचकाळत असलेल्या मनाला एका सद्गुरुस्थानाची ओढ लागणं आणि उरणं, हे चांगलंच लक्षण असतं. भौतिकाच्या विचारांत गुंतून अलगद अविचाराच्या पकडीत जात असलेल्या मनाला चिंतन आणि मननासाठी एका सद्गुरुबोधाची गोडी लागणं, हेदेखील प्रगतीचं लक्षण असतं. आपला नावलौकिक वाढविण्याची आस बाळगणाऱ्या मनाला भगवंताचा नामलौकिक जपावासा वाटतो, हीदेखील आंतरिक पालटाचीच खूण आहे. तर अशा प्रकारे अनेकांत विखुरलेल्या मनाला आधी एका केंद्रस्थानी आणावं लागतं. मग या अनेकांतून एकाकडे आलेल्या मनाला आता एकाकडून व्यापकत्वाकडे वळवायचं आहे. चराचरांत भरून असलेल्या गुरुतत्त्वाचं दर्शन म्हणूनच अवधूत घडवीत आहे. आता अवतीभोवती दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीतील गुणानं तर त्याला प्रभावित केलंच आणि त्याला त्यानं गुरू मानलं, हे समजू शकतं. पण एखाद्या गोष्टीतील अवगुणानंही त्याच्यात आंतरिक जागृती निर्माण झाली, हे नवल वाटावं असंच. पण जे तुम्हाला जागं करतं ते गुरूच नव्हे का? तर असं अवधूतानं घडवलेलं जे व्यापकत्वाचं दर्शन आहे, ते साधकालाही व्यापक करणारं आहे. त्याच्या आकलनाची कक्षा रुंदावणारं आहे. त्यानं श्रीसद्गुरूंचा अस्तित्वभाव वाढतो. पू. बाबा बेलसरे यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘सर्व चराचर सृष्टी परमात्म स्वरूपाने आतबाहेर भरली असल्याने विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये अनंत गुणांनी भरलेल्या परमात्म्याचा एक तरी गुण प्रकट होतो. म्हणून साधना करीत असताना, म्हणजे आपले मन परमात्मदर्शनाला लायक करण्याचा अभ्यास करीत असताना साधकाने अत्यंत शिकाऊ वृत्ती ठेवणे अवश्य असते. सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे हा अनुभव येण्यास वरील पायरी फार मदत करते.’’ (‘भावार्थ भागवत’, पृष्ठ २९५) मग अवधूतानं चराचरांत परमात्मगुणाचं जे दर्शन घेतलं आणि त्या-त्या तत्त्वांना गुरू मानलं त्याबद्दल पू. बाबा म्हणतात, ‘‘अवधूताने यदुराजाच्या प्रश्नांना उत्तर देताना सबंध विश्वाला गुरूरूपाने पाहावे असा साधनाचा अतिमहत्त्वाचा सिद्धांत सांगितला. हे विश्व सर्वागपरिपूर्ण भगवंताचे व्यक्त स्वरूप असल्याने त्यातील प्रत्येक वस्तूमध्ये तो गुणरूपाने विलसत आहे. तो गुण शोधून काढण्याची बुद्धी मात्र पाहिजे.’’ (पृ. ३१६-३१७) स्वत:मध्ये आणि जगामध्ये असार टाकून सार शोधणारी ही सद्बुद्धीच असते, असं बाबा म्हणतात. म्हणजेच ज्याची सद्बुद्धी जागृत होते, त्यालाच या जगातल्या प्रत्येक वस्तुमात्राचा आणि व्यक्तीचा गुण लक्षात येतो. त्याचं खरं स्वरूप लक्षात येतं. मग त्या गुणाचा आदर्श ठेवून जर माणसानं तसं होण्याचा प्रयत्न केला, तर तो गुणच त्याचा गुरू होतो! मग या सगळ्या दर्शनातून सद्गुरूच मला काही ना काही शिकवत आहेत, ही जाणीव झाली की साधनेचा पायाही मजबूत होतो, दृढ होतो.

chaitanyprem@gmail.com