– चैतन्य प्रेम

आपला विषय पुढे सुरू करण्याआधी एका शंकेचं निराकरण करू. गेल्या भागात पंख्याचं रूपक आपण पाहिलं. पंखा बंद पडला की तिन्ही पाती स्थिरावतात अन् उकडू लागतं. वीज आली की पंखा गरगरा फिरू लागतो, पाती दिसेनाशी होतात आणि आल्हाददायक वारा मिळतो. तसं सद्गुरूभक्तीची ऊर्जा नसेल तर सत, रज आणि तमाची पाती स्थिरावून अहंभावाच्या उष्म्यानं जिवाची काहिली होते. सद्गुरूभक्तीचा प्रवाह खुला झाला की त्रिगुणातीत अवस्थेनं खरा आनंद लाभू शकतो. काहींच्या मनात स्वाभाविक शंका आली की, तामसीपणा आणि निव्वळ स्वार्थकेंद्रित राजसीपणा चुकीचा असेलही; पण सत्त्वगुण वाईट कसा असू शकतो? तर रजोगुण आणि तमोगुणापेक्षा सत्त्वगुण हा एका मर्यादेपर्यंत समाजासाठी हितकर असतो. पण त्या सत्त्वगुणाचा अहंकार निर्माण झाला, तर तो राजस आणि तामस अहंकारापेक्षा घातक असतो. कारण तो अहंकार आहे, हेच लक्षात येत नाही. लोखंडाची बेडी तोडून सोन्याची बेडी घातली, तर काय उपयोग? कैदेचं वास्तव कायमच राहतं ना? तेव्हा नरकात अडकवणारं पाप जितकं वाईट तितकंच स्वर्गात अडकवणारं ‘पुण्य’ही बाधकच. पण तरीही समाजाच्या भल्यासाठी पुण्यर्कमच केली पाहिजेत. फक्त ती करताना ती आपण करीत नसून सद्गुरू इच्छेनं आणि प्रेरणेनं घडत आहेत, हा भाव ठेवला तर त्यातून अहंकार निपजणार नाही. तर आता मूळ विषयाकडे पुन्हा वळू. शिकायचं ठरवलं तर चराचरातील प्रत्येक गोष्टीकडून आपण शिकू शकतो, हेच अवधूतानं आपल्या २४ गुरूंच्या उदाहरणांवरून दाखवलं. यात काहींचे गुण त्याला दिसले, ते गुण आपल्याही अंगी बाणावेत, ही प्रेरणा त्याला मिळाली. त्याचबरोबर काहींचे अवगुणही दिसले. त्या अवगुणांनी होणारी हानीही त्यानं पाहिली. त्यामुळे ते अवगुण आपल्या आचरणात नसावेत, ही प्रेरणा त्याला मिळाली. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत पक्षी, अजगर, समुद्र आणि पतंग या अकरा गुरूंनंतर अवधूतानं सांगितलेला त्याचा बारावा गुरू म्हणजे भ्रमर! पू. बाबा बेलसरे म्हणतात, ‘‘कोणालाही कमीजास्त न लेखता प्रत्येकापासून गुणदृष्टीने सार ग्रहण करणे, हा भ्रमराचा मोठा गुण आहे. सामान्य माणूस विवेकाने प्रत्येक प्राण्यामध्ये साररूपाने असणारा भगवंत पाहू लागला तर या जन्मात त्याला आत्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री नाथ देतात.’’ आता सामान्य माणसात विवेक आला, तर सगळे प्रश्नच सुटले. तर इथे प्रत्येकातला भगवंत पाहायचा म्हणजे त्याच्यातला गुण पहायचा! श्रीगोंदवलेकर महाराजांचंही म्हणणं असं होतं की, प्रत्येक माणसात एकतरी सद्गुण असतोच, जो त्याला भगवंतापाशी जोडू शकतो. तो सद्गुण फुलवण्याचं कार्य श्रीमहाराजांनी केलं. भ्रमरही हेच शिकवतो.

भ्रमर म्हणजे मधुकर. प्रत्येक फुलातला मध गोळा करणारा कीटक. या गुरूचं वर्णन करणारी पहिलीच ओवी फार अर्थगर्भ आहे. अवधूत सांगतो, ‘‘भ्रमरू रिघोनि पुष्पामधीं। फूल तरी कुचंबो नेदी। आपुली करी अर्थसिद्धी। चोखट बुद्धि भ्रमराची।।९२।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). म्हणजे भ्रमर फुलातला मधच तेवढा घेतो. तो फुलाला चुरगळत नाही, त्याची हानी करीत नाही, त्याचं रूप तसंच राखतो. यात मोठा अर्थ आहे बरं. दुर्गुण काढण्यापेक्षा सद्गुण फुलवणं सोपं असतं. सद्गुणाचा प्रभाव वाढत गेला की दुर्गुणाचा प्रभाव ओसरत जातो.