News Flash

४५२. देहाचं भांडवल

समर्थ रामदासांनी तर ‘दासबोधा’च्या आरंभी नरदेहाचंही स्तवन केलं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

– चैतन्य प्रेम

या ऐक्य प्रक्रियेसाठी आपल्याकडे साधनेसाठी दोन गोष्टी आहेत. पहिला म्हणजे आपला देह आणि दुसरं म्हणजे आपलं मन! नरदेहाचं अलौकिकत्व संतांच्या काही अभंगांतून मांडलं गेलं आहे. समर्थ रामदासांनी तर ‘दासबोधा’च्या आरंभी नरदेहाचंही स्तवन केलं आहे. अवधूतानं यदुराजाला जे २४गुरू सांगितले त्यात ‘नरदेह’ हा एक गुरू आहे. इतकंच नव्हे, तर तो प्रमुख गुरू आहे! कारण आत्म-अनात्म अर्थात शाश्वत-अशाश्वताचा विचार करणारं विवेक-वैराग्य या देहाच्या आधारावरच आचरणात आणता येतं. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘चोवीस गुरूंचाही गुरू। विवेकवैराग्यविचारू। हा नरदेहीं लाधे सधरू। यालागीं मुख्य गुरू नरदेहो।।२४९।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय नववा). पण हा नरदेह जसा परमलाभ साधून देऊ शकतो, तसाच तो परमहानीदेखील ओढवू शकतो. आता हा परमलाभ म्हणजे आत्मजागृति आणि परमहानी म्हणजे आत्मविस्मृति! एकनाथ महाराज सांगतात, ‘‘देहाऐसें वोखटें। पृथ्वीमाजीं नाहीं कोठें। देहाऐसें गोमटें। पाहतां न भेटे त्रिलोकी।।२५१।।’’ या पृथ्वीतलावर या नरदेहाइतकी वाईट दुसरी गोष्ट नाही आणि या त्रलोकात या नरदेहाइतकी लाभदायी गोष्ट नाही! आता त्रिलोक म्हणजे कोणते? तर स्वर्ग, नरक आणि मृत्युलोक. सनातन तत्त्वज्ञानानुसार स्वर्ग आणि नरक हे सूक्ष्म लोक आहेत. या स्वर्ग आणि नरक लोकामध्ये सूक्ष्म देहात राहून अनुक्रमे पुण्यवान जीव सुख, तर पापवान जीव दु:ख भोगत असतो. स्वर्गात नवं पुण्य जमा करण्याची सोय नसते आणि आधीचा पुण्याचा साठा संपला की पुन्हा मृत्युलोकात फेकले जाण्याची भीती असते. (आधार : गीतेतील श्लोक : ‘ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति!’). नरकात पाप घटण्याची गती संथ असते आणि पुण्यकर्म करायला वाव नसतो. निर्धारपूर्वक पुण्यकर्म करण्याची अत्यंत दुर्लभ आणि दुर्मीळ संधी केवळ मनुष्य देहातच असते. पण मागेच म्हटल्याप्रमाणे पुण्य स्वर्गात, तर पाप नरकात अडकवतं. थोडक्यात स्वर्ग हादेखील अडकवतोच. त्यामुळे स्वर्ग वा नरक या कशातही न अडकता मूळ आनंद स्थितीत जर परतायचं असेल, तर सहज परम आनंद स्वरूप अशा सद्गुरूंच्या बोधानुरूप जगणं, हा एकमेव पर्याय आहे. केवळ मनुष्यजन्मात हा योग शक्य आहे म्हणून स्वर्गातील पुण्यात्म्यांना आणि नरकातील पापात्म्यांना या नरदेह प्राप्तीचं खरं मोल उमगत असतं. त्यामुळेच नरदेह लाभूनही त्याचं मोल न उमगणाऱ्या माणसांचं संतांना आश्चर्य वाटतं. पण जसा हा देह बंधनातून सोडवणारा आहे, तसाच तो बंधनात गोवणाराही आहे. ‘देहाऐसें वोखटें.. / देहाऐसें गोमटें’ चा एक अर्थ असाही आहे की मनुष्य जर देहभावावर आला तर देहाइतकी अडकवणारी वाईट गोष्ट नाही आणि मनुष्य जर त्रिगुणातीत झाला, त्रिगुणात सापडेनासा झाला अर्थात देवभावात स्थिरावला, तर या नरदेहाइतकी गोमटी म्हणजे उत्तम गोष्ट नाही! पुढे म्हणतात की, ‘‘वोखटें म्हणोनि त्यागावें। तैं मोक्षसुखासी नागवावें। हो कां गोमटें म्हणोनि भोगावें। तैं अवश्य जावें नरकासी।।२५२।।’’ वाईट म्हणून देह त्यागावा, तर मोक्षसुखाला पारखं होणं आहे आणि चांगला म्हणून देहसुखभोगात रमला तर नरकात ढकलण्याइतपत तो घातक आहे! मग काय करावं? तर देहाची सुखभोगांची लालसा न दडपता त्याला त्यापलीकडेही सुख आहे, याची जाणीव करून देत राहिलं पाहिजे. ती जाणीव टिकण्यासाठी साधन-तत्पर असलं पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:06 am

Web Title: loksatta ekatmayog article abn 97 4
Next Stories
1 ४५१. ऐक्य प्रक्रिया
2 ४५०. बालक्रीडा!
3 ४४९. विषयखोडी
Just Now!
X