चैतन्य प्रेम

हरीमयतेनं, हरिभक्तीनं साधकाच्या जीवनाचं दृश्य रूप बदलत नाही. म्हणजे त्याच्या जीवनाची बाह्य़ चौकट तशीच राहाते, त्याची आर्थिक-सामाजिक परिस्थिती तशीच राहते; पण त्या जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टीच बदललेली असते. त्यामुळे त्याचं आकलन, धारणाही बदललेल्या असतात. जिथं संकुचितपणा सुटलेला असतो, तिथं ‘मी’केंद्रित धारणा, कल्पना, भावना, वासना लोपलेल्या असतात. भ्रम, मोह, आसक्ती मावळलेली असते. त्यामुळे त्या अंत:करणात आनंदाशिवाय आणखी काय उरणार, हेच तुकाराम महाराज ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या अभंगात नमूद करतात. मग ते सांगतात की, भगवंताच्या प्रेमाचा जो गर्भ माझ्यापोटी अंकुरला आहे ना, त्याच्या आवडीनुसार आता मला भक्तीचेच डोहाळे लागले आहेत! आई आणि गर्भातल्या या जिव्हाळ्याला तोड नाही. अगदी त्याचप्रमाणे अंतरंगात सद्गुरुप्रेम अंकुरत असल्याने एका भगवंताच्या विचारावाचून मला दुसऱ्या कशाचाही जिव्हाळा नाही. (‘गर्भाचे आवडी मातेचा डोहळा। जेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे।।’) त्या भक्तिप्रेमाचा ठसा असा काही अंत:करणात ओतला गेला आहे, की आता मुखातून अनुभवावाचूनचं काही बोललंच जात नाही! (‘तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा। अनुभव सरिसा मुखा आला।।’) डोहाळ्यामागची समजूत काय असते? तर, पोटातल्या बाळाला जे खावंसं वाटतं, तेच आईला खावंसं वाटतं. जरी तिला ते पदार्थ खाण्याची मूळची आवड नसली तरी! पोटातलं बाळ काही बोलू शकत नाही, पण आई सांगू शकते. तेव्हा भक्तीचं जे बीज अंत:करणात रुजलं आहे ना, त्या बीजाच्या पोषणासाठीच या भक्ताच्या मुखी सदैव नामाचाच, शाश्वताचाच उच्चार होत असतो, त्याचीच त्याला ओढ आणि आवड असते, असाही याचा एक अर्थ. आता ही अशी भगवंतमयतेची स्थिती काही एकदम येत नाही. त्यासाठी सद्गुरुबोधानुरूप जगण्याचा अभ्यास करणं, हाच उपाय आहे. आता एक प्रश्न कुणाच्या मनाला शिवेल, की मुळात भगवंताचं होण्याची गरजच काय आहे? भगवंताचं न होताही चांगलं जगता येत नाही का? भगवंताचं होण्यातच जीवनाची सार्थकता का मानावी? याचं उत्तर आधीच्या चिंतनातही काही प्रमाणात आलं आहेच. ते अधिक स्पष्ट करू. माणूस हा इतर जीवांपेक्षा वेगळा आहे. कारण त्याला मन आहे! मन आहे म्हणूनच भावना आहेत, वासना आहेत, कल्पना आहेत, इच्छा आहेत. या मनाला कुठे ना कुठे तरी चिकटल्याशिवाय, जोडलं गेल्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे हे मन जगाला चिकटून असतं. जगाला जोडलं गेलेलं असतं. ते नुसतं जगाला जोडलं गेल्यानं बिघडत नाही; पण त्या जोडणीत ते जगाकडून अनंत अपेक्षा उरी बाळगू लागतं आणि त्यामुळेच अनेकदा अपेक्षाभंगाच्या दु:खाला सामोरं जातं. तेव्हा जी गोष्ट सतत बदलणारी आहे, अनंत ‘मी’केंद्रित माणसांवर अवलंबून आहे, तिच्यावर विसंबून जगण्यात काय अर्थ आहे? त्यामुळेच माझ्यासकट हे सर्व चराचर ज्या चैतन्य शक्तीच्या आधारावरच जगत आहे, त्या शक्तीचा शोध घेण्याच्या साधनेपाशी मनानं का जोडलं जाऊ नये? फार थोडे खऱ्या अर्थानं निरपेक्षतेनं समाजाची सेवा करीत असतील. पण समाजाची सेवा करतानाही, लोकेषणेपासून, लोकस्तुतीपासून दूर राहणं काही प्रत्येकाला साधतंच असं नाही. तेव्हा अस्थिर अशा जगाऐवजी स्थिर अशा परमतत्त्वाचा आधार घेणं, हेच आपल्यासाठी अधिक आवश्यक आहे!