चैतन्य प्रेम

मायेच्या पकडीतून भलेभले सुटलेले नाहीत आणि म्हणूनच या मायेच्या प्रभावातून सुटण्याचा उपाय जनक राजा नवनारायणांना विचारीत आहे. खरं पाहता सद्गुरू वंदनेच्या श्लोकांमध्येच एकनाथांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ते म्हणतात की, ‘‘हे सद्गुरो! तुझ्या चरणीं जो सद्भावपूर्वक लागला, त्याचा मीपणाच लयाला गेला. अहो, हा जो जीवभाव आहे ना, तो वज्रानंदेखील तुटणारा नाही. पण त्याची तुझ्या चरणांच्या प्रीतीनं राख होते!’’ (‘नवल पायांचें कठिणपण। वज्रें न तुटे लिंगदेह जाण। त्याचेंही केलें चूर्ण। अवलीळा चरण लागतां।।२।।’) जो तुझ्या चरणांचं आवडीनं चिंतन करतो त्याचा मनुष्यधर्मच नष्ट होतो! (‘आवडी पाय चिंतिती दास। त्यांच्या मनुष्यधर्मा होय नाश।’) माया म्हणजे तरी काय? तर, विराट जीवनप्रवाहातलाच एक अंश असतानाही त्या विराटापासून विलग होऊन जीव स्वत:ला ‘मी’ मानू लागला, ‘मी’ची स्वतंत्र सत्ता मानू लागला. प्रत्यक्षात ‘मी’चं अस्तित्वच तकलादू आहे. या ‘मी’ची जी ओळख आहे, ती बरीचशी जगानं लादलेली आणि आपणच आपल्या विचार, कल्पना आणि भावनांनुसार जोपासलेली आहे. ती टिकणारी नाही. स्वत:ला ज्ञानी मानू लागावं, तर स्वत:तलं अज्ञानही उघड होताच ती ‘ज्ञानी’पणाची ओळख संपते! स्वत:ला शांतचित्त मानावं, तर क्रोध उफाळण्याचा प्रसंग घडताच ती ओळखही झपाटय़ानं लयाला जाते! स्वत:ला समाधानी मानावं, तर अचानक परिस्थिती आणि माणसांची अपेक्षित वृत्ती पालटून मन कधी असमाधानानं भरून जाईल, ते सांगता येत नाही. थोडक्यात, आपण नेमके कसे आहोत, हे आपल्यालाही ठामपणे सांगता येत नाही. मग अशा ठिसूळ असलेल्या ‘मी’ची मोह, भ्रम आणि आसक्तीमुळे दृश्य जगात जी जखडण सुरू आहे, त्याचं कारण हीच माया आहे! जे अशाश्वत आहे, अस्थिर आहे, मिथ्या आहे, त्याच्या आधारावर शाश्वत, स्थिर आणि वास्तविक अखंड सुख प्राप्त होण्याची जीवाची ही धडपडच त्या मायेला सत्यत्व देते आणि तिचा पाया अधिकच बळकट करते. त्या मायेचं जर निरसन व्हायला हवं असेल, तर सद्गुरू चरणांचा आधारच अनिवार्य आहे. वज्रानंदेखील जीवाचा देहभाव तुटत नाही, पण या सद्गुरू चरणांनी त्या जीवभावाचं चूर्ण होतं! जो ‘आवडीने भावे’ सद्गुरू चरणांचं चिंतन करतो, त्याच्या मनुष्यधर्माचा- अर्थात त्याच्या भ्रामक देहबुद्धीजन्य ओढींचा नाश होतो. आता सद्गुरू चरणांचा आधार घ्यायचा म्हणजे काय? त्या चरणांचं चिंतन करायचं म्हणजे काय? तर, सद्गुरू चरणांचा आधार घ्यायचा, याचा अर्थ ज्या मार्गानं सद्गुरू चालवत आहेत त्या मार्गानं चालणं, त्याच मार्गाचा आधार घेणं. आजवर आपण आपल्या मनाच्या मर्जीनुसार अनेक रस्त्यांवरून बरीच वणवण केली, पण खरं सुख काही गवसलं नाही. आता सद्गुरू ज्या रस्त्यानं जायला सांगत आहेत, त्या वाटेनं पावलं टाकली पाहिजेत. त्या चरणांचं चिंतन, याचा अर्थ ज्या मार्गाचा बोध त्यांनी केला आहे, त्या मार्गाचं आणि त्या बोधाचं चिंतन. त्यांच्या देहाच्या पायाचं चिंतन म्हणजे त्या चरणांचं चिंतन नव्हे! चिंतनापाठोपाठ कृती घडत नसेल, तर चिंतन निर्थक असतं. समजा, एखादा आग लागलेल्या घरात सापडला आहे, तर त्यातून सुटण्याचं तो नुसतं चिंतनच करीत बसला तर काय उपयोग? त्या चिंतनाला कृतीची जोड नसेल, तर तो आगीतून वाचणार नाही. त्याचप्रमाणे सद्गुरूबोधाच्या चिंतनाला कृतीची जोडही हवीच!