चैतन्य प्रेम

माया नाही, एवढय़ा उत्तरानं काही मायेनं होणारी जिवाची फरपट थांबत नाही. अंतरिक्षही सांगतो की, ‘‘‘संत’ म्हणों तरी ते नासे। ‘असंत’ म्हणों तरी आभासे। आधीं असे पाठीं नासे। ऐसीही नसे निजांगें।। ५२।।’’ या ओवीचा प्रचलित अर्थ असा की, ही माया सत् म्हणावी, तर ती नाहीशी होते; ती असत् म्हणावी, तर भासू लागते. ती आधी असते आणि मागाहून नाहीशी होते, तर असंही नाही. पण या ओवीचा गूढार्थही फार मनोज्ञ आहे. तो असा की, संत जेव्हा मायेचं खरं रूप विशद करून सांगतात, तेव्हा ती नाहीशी होते आणि जे मनानं सान्त नाहीत अर्थात ज्यांचं मन भौतिक ओढींनी व्याप्त आहे, त्यांच्या बोलण्यानं ती पक्की होत असते! सत्पुरुष आपल्या मनातील मोह-ममता उकलून दाखवत असतात. त्यांच्या बोधानं आपल्या धारणेतील चुका आपल्याला उमगू लागतात. एकदा धारणा बदलली, आकलन बदललं की आचरण बदलू लागतं. मग आधी आपल्याला जखडणाऱ्या मायेचा प्रभाव जगण्यातून आपोआप ओसरू लागतो. पण जे ‘असंत’ असतात- म्हणजेच ज्यांची वृत्ती भौतिकाशी तन्मय असते, ज्यांचं मन अनंत ओढींनी अशांत असतं, अशी काही माणसं- आपल्या मनातील मायेची पकडच कशी योग्य आहे, आपल्या मनातल्या अवास्तव इच्छांच्या पूर्तीसाठीदेखील धडपडणं कसं योग्य आहे, हेच बिंबवत राहतात. मग ती माया खरी वाटू लागते. त्या मायेच्या प्रभावात जगणं हेच खरं जीवन वाटू लागतं. त्या मायेला सन्मुख झालो, तर ती दिसते; पण त्या मायेला विन्मुख झालो, तर मात्र ती मावळते! (आधीं असे पाठीं नासे।), पण खरं पाहता तिला स्वत:चं अस्तित्वच नसतं (ऐसीही नसे निजांगें।।). त्यामुळे ती आज खरी वाटत असली, तरी एक ना एक दिवस ती माया कशी व्यर्थ आहे, त्या मायेच्या प्रभावात वाहवत जाऊन आपण आपलाच किती घात करून घेतला आहे, हे उमजल्यावाचून राहत नाही. मग अंतरिक्ष म्हणतो, ‘‘आरसां काय प्रतिबिंब असे। जो पाहे तोचि आभासे। तेवीं आपुलेनि संकल्पवशें। माया उल्हासे नसतीचि।। ५६।।’’ आरशात प्रतिबिंब दिसतं, पण ते खरंच तिथं असतं का? त्याप्रमाणे आपल्या संकल्पाच्या ओढींनी, म्हणजेच अमुकच व्हावं या इच्छांच्या ओढीनं जगात नसलेली माया ठायी ठायी दिसत असते, जाणवत असते आणि नाचवतही असते! एक बोधवचन प्रसिद्धच आहे की, ‘आरशात मुख आणि प्रपंचात सुख असत नाही, केवळ दिसतं!’ पण तरीही या नसलेल्या, पण पदोपदी भासणाऱ्या मायेचा निरास काही सोपा नाही. अंतरिक्ष म्हणतो, ‘‘उडवों जातां आपली छाया। सर्वथा न उडवे ज्याची तया। तेवीं तरतां दुस्तर माया। जाण राया निश्चितीं।। ५८।।’’ हे राजा, एखाद्याला आपली सावली पाहून त्रास झाला आणि ती सावली आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न त्यानं केला, तरी ते जसं अशक्य आहे, त्याचप्रमाणे या दुस्तर मायेतून तरून जाणं कठीण आहे. देह आहे, तर सावलीही आहे. पण आपलं लक्ष जेव्हा सावलीला जपण्याकडे जातं, तेव्हा माया बळकट होते. कारण मग सावली रस्त्याकडेच्या गटारात पडू नये म्हणून माणूस स्वत: गटारनाल्यातून चालू लागतो आणि चांगल्या रस्त्यावर पडत असलेली सावली पाहून सुखी होतो! सावलीच्या सुखासाठी धडपडणाऱ्याला देहदु:खाचं भान नसतं, त्याप्रमाणे देहसुखाच्या ओढीनं जगणाऱ्याला आत्मसुखाचं भान येत नाही. नव्हे, त्याला आत्मसुख ही गोष्टच काल्पनिक आणि मायिक वाटते!!