चैतन्य प्रेम

जी प्रत्यक्षात नाहीच, तिचं वर्णन तरी काय करावं, या सुरात अंतरिक्ष नारायण मायेबाबत बोलत आहे. तो म्हणतो, ‘‘आकाशाची सुमनें। सुवासें की वासहीनें। हें विवंचिती जे देखणे। ते मायेचें सांगणें सांगोत सुखें।।३९।।’’ आकाशात अनेक ढगांचे आकार एखाद्या उमललेल्या फुलांसारखे दिसतात. पण ती फुले पाहणाऱ्यांपैकी ज्यांच्या मनात ती फुले सुवासिक आहेत की बिनवासाची, असा प्रश्न पडतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची धडपड जे करतात, त्यांना हवंतर मायेबद्दल भरभरून बोलू देत! पण मग तरीही माया भासतेच ना? ती भासण्याचं कारण अंतरिक्ष सांगू लागला. तो म्हणतो, ‘‘भ्रम तो मायेचें निजमूळ। भ्रांति हेंचि फूल सोज्ज्वळ। भुली तें इचें साचुक फळ। विषय रसाळ सदा फळित।।४२।।’’ भ्रम हेच या मायेचं मूळ आहे, भ्रांती तिचं ताजं फूल आहे आणि विषयरूपी रसानं निरंतर डवरलेली भूल हेच तिचं फळ आहे. पुढे अंतरिक्ष सांगतो, ‘‘हे नसतेनि रूपें रूपा आली। सत्यासत्यें गरोदर जाहली। तेथें असत्याचीं पिलीं। स्वयें व्याली असंख्य।।४३।।’’ ही नसलेल्या रुपानंच रूपास आली, सत्य-असत्याच्या मिश्रणानं गर्भवती झाली आणि असत्याच्या असंख्य पिल्लांना तिनं जन्म दिला आहे! जगाकडून आपल्या मनात उपजणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत ना, तिचं ही असत्याची पिल्लं आहेत! ती नसतानाही भासू लागली, मग जगाकडून अमुक सुख मिळेल, ही आशा आपल्या पोटात फलद्रूप झाली आणि मग अमुक घडावं, या ठिसूळ पायावरच्या अनेक अपेक्षांचा जन्म त्यातून सातत्यानं आपोआप होत गेला. मग.. ‘‘तिसी तो ‘अहंकारु’ सखा। अतिनेटका ज्येष्ठपुत्र।।४७।।’’ अहंकार हा या मायेचा ज्येष्ठ पुत्र झाला. तो तिचा जीव की प्राण होता. म्हणजेच अहंकार आहे म्हणूनच तर माया टिकून आहे! ‘‘कुळविस्तारालागीं पाहीं। ‘ममता’ व्याली ठायीं ठायीं। ‘मोहो’ उपजवूनि देहीं। घरजांवयी त्या केला।।४८।।’’ मग या मायेनं आपल्या देहाच्या प्रपंचात आपला कुळविस्तार सुरू केला. तिनं ममतारूपी कन्यांना जन्म दिला आणि या देहात, देहबुद्धीत मोह उत्पन्न करून त्याला घरजावई करून घेतले! थोडक्यात काय, तर अनेक गोष्टींबद्दल, व्यक्तींबद्दल मनात ममता पाझरू लागली. मग त्या ममतेची सांगड मोहाशी जुळली. मग हा मोह घरजावई झाला. म्हणजे ‘मी’ आणि ‘माझे’च्या प्रपंचात मोह कायमचा वस्तीस आला. ज्या ज्या गोष्टींबद्दल, व्यक्तींबद्दल ममता वाटत होती तिचं रूपांतर मोहात होऊन हट्टाग्रह उत्पन्न झाला. ज्यांच्याबाबत माझ्या मनात ममता आहे त्यांनाही माझ्याबद्दल ममता वाटलीच पाहिजे, हा तो हट्टाग्रह! मग ‘‘अहंमोहममतायोगें। जग विस्तारलें अंगें। स्थूळ सबळ प्रयोगें। ममता निजअंगें वाढवी।।४९।।’’ या अहंतेनं, ‘मी’भावानं आणि मोह-ममतेच्या संयोगानं मायेचं आभासी जग स्वबळावर विस्तारत गेलं, व्यापक होत गेलं, बळकट होत गेलं. त्या दृश्य जगाचा पाया जीवाच्या अंत:करणात खोलवर गेला. ‘‘संकल्पविकल्पांचीं कांकणें। बाणोनि ‘मन’ दिधले आंदणें। घालोनि त्रिगुणाचें ठाणें। माया पूर्णपणें थोरावे।।५०।।’’ मोहयुक्त धारणेतून उत्पन्न झालेला, ‘अमुक व्हावं’ हा संकल्प आणि त्याच मोहयुक्त धारणेतून उद्भवणारा ‘अमुक झालं तर?’ हा शंकात्मक विकल्प या कंकणांच्या ध्वनीनं गजबजलेलं मन या ममतेला आंदण देऊन टाकलं आहे आणि मग सत्, रज आणि तम या तीन गुणांच्या जोरावर माया बळकट झाली आहे.