चैतन्य प्रेम

माया प्रत्यक्षात नसताही कशी भासू लागते? एकनाथ महाराज एक मनोज्ञ रूपक योजतात. ते म्हणतात की, ‘‘अग्निसंकल्पु सूर्यी नसे। शेखीं सूर्यकांतींही न दिसे। तळीं धरिलेनि कापुसें। अग्नि प्रकाशे तद्योगें।। ५९।। तेवीं शुद्ध ब्रह्मीं संकल्पु नाहीं। शेखीं न दिसे केवळ देहीं। माझारीं वासनेच्या ठायीं। देहाभिमानें पाहीं, संसारु भासे।। ६०।।’’ म्हणजे अग्नी उत्पन्न करावा, असा काही सूर्याचा संकल्प नसतो. सूर्याचं तेजही त्या हेतूनं प्रकटलेलं नसतं. पण त्या सूर्याच्या प्रकाशझोतात कापूस धरला तर अग्नी उत्पन्न होतो. अगदी त्याचप्रमाणे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा संकल्प नाही. ज्या देहाच्या आधारे प्रपंच पसारा वाढताना भासतो, त्या देहातही तो संकल्प नाही. पण देहात जो वासनात्मक जीव नांदत असतो, त्याच्या देहाभिमानामुळे अर्थात भ्रामक अहंभावामुळेच ‘मी’ आणि ‘माझे’चा प्रपंच पसारा भासमान होत असतो! या ६० व्या क्रमांकाच्या ओवीत सखोल तत्त्वज्ञान भरून आहे. आता, ब्रह्म म्हणजे काय? सनातन तत्त्वज्ञानाच्या आधारे त्याचं अनेक प्रकारे वर्णन केलं जातं. समस्त दृश्य आणि अदृश्य चराचराचं उगमस्थान व आधार ब्रह्म आहे आणि त्यातच समस्त चराचर लयही पावणार आहे. उगमाआधी आणि लय पावल्यानंतरही ब्रह्मच होतं आणि राहणार आहे. अगदी संक्षेपानं सांगायचं, तर अस्तित्वाचं मूळ अस्तित्व जर काही असेल, तर ते ब्रह्म आहे! इतकी घडामोड ज्या ब्रह्माच्या आधारानं होते, ते स्वत: मात्र त्यापासून निर्लिप्त आहे. त्या परब्रह्मात ‘मी’ व ‘माझे’युक्त प्रपंच निर्मितीची ओढ नाही. बरं, हा जो मनुष्यदेह लाभला आहे, त्यातही ‘प्रपंचा’ची आसक्तीयुक्त ओढ नाही. म्हणजे काय? तर, डोळ्यांनी पाहिलं जातं हे खरं, पण पाहण्याची ओढ डोळ्यांना नसते. आवडत्या माणसाच्या दर्शनानं डोळे तृप्त होत नाहीत. जिव्हेनं अन्नग्रहण केलं जातं आणि बोललं जातं, पण खाण्याची वा बोलण्याची ओढ जिव्हेला नसते. कानांनी ऐकलं जातं, पण ऐकण्याची ओढ कानांना नसते. स्तुती आणि निंदा ऐकून कान सुखी वा दु:खी होत नाहीत. तेव्हा कानांनी ऐकण्याची ओढ, जिव्हेनं रसास्वादनाची आणि बोलण्याची ओढ, डोळ्यांनी पाहण्याची ओढ त्या-त्या अवयवांना नसते. ती या देहात नांदत असलेल्या वासनात्मक जीवालाच असते. आणि देहाच्या अवयवांद्वारे होत असलेल्या सर्व क्रिया या देहातील चैतन्य तत्त्वामुळेच होत असतात. अर्थात, त्या चैतन्य तत्त्वामुळे देह जिवंत आहे तोवरच देहगत क्षमतांनुसार हे अवयव आपापलं कार्य करीत असतात. तारुण्यात हे अवयव पूर्ण शक्तिनिशी कार्यरत राहू शकतात. वृद्धत्वामुळे या अवयवांच्या कार्यक्षमतेत शैथिल्य येऊ  शकतं. या देहातून प्राण गेल्यावर तर सर्व अवयव जागच्या जागी असूनही आपापलं कार्य करू शकत नाहीत. अर्थात, डोळे पाहू शकत नाहीत, कान ऐकू शकत नाहीत, जिव्हेला खाता वा बोलता येत नाही, हाता-पायांना हालचाल करता येत नाही. याचाच अर्थ, नुसत्या देहात प्रपंच ओढ नाही. हा देह ज्या चैतन्य तत्त्वाच्या आधारे कार्यरत आहे, त्यातही प्रपंच ओढ नाही. या चैतन्याआधारे देहात वावरत असलेल्या वासनात्मक जीवात केवळ ही ओढ आहे! प्रपंचाचं बीज या वासनेतच आहे.

chaitanyprem@gmail.com