चैतन्य प्रेम

संसार म्हणजे काय? तर जो सतत सरत असतो तो. अर्थात, क्षणोक्षणी त्याचं रूप सतत बदलत असतं. तो कधी अनुकूल भासतो, तर कधी प्रतिकूल भासतो. कधी सहजसोपा भासतो, तर कधी अतिशय कठीण वाटतो. सतत पालटत जाणं, हा संसाराचा मुख्य गुण आपण विसरतो आणि संसार सदोदित आपल्या मनाजोगताच राहावा, या अपेक्षेत आसक्त मनानं गुरफटून जगू लागतो. त्यामुळे संसाराचं पालटत जाणारं रूप आपल्या पचनी पडत नाही. त्यातही जो अनुकूल पालट असतो- म्हणजे आपल्या स्वार्थाला पूरक असा जो पालट असतो, तो आपल्याला आवडतो. जो प्रतिकूल पालट असतो- म्हणजे आपल्या स्वार्थपूर्तीच्या आड येणारा, अपेक्षांना छेदणारा जो पालट असतो, तो आपल्याला आवडत नाही. त्यामुळे सतत पालटत असलेल्या, अस्थिर असलेल्या संसाराला मनाजोगतं राखण्याची धडपड ही मनाला अस्थिर करणारीच असते. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियांद्वारे जगाकडे असलेली ओढ म्हणजेच ‘प्रपंच’! आणि गेल्या भागात पाहिलं त्यानुसार, ही जी जगाकडे म्हणजेच दृश्याकडे असलेली ओढ आहे, ती ना या देहात आहे, ना ज्या चैतन्य तत्त्वावर हा देह जगत आहे त्या चैतन्य तत्त्वात आहे. ही ओढ नाथ म्हणतात त्याप्रमाणे ‘वासनेच्या ठायी’ आहे. ही वासना अत्यंत सूक्ष्म आहे. ती ‘देहच मी’ या धारणेतून देहालाच सर्वस्व मानून चिकटून आहे. आता देहाला कमी लेखणं इथं अभिप्रेत नाही. उलट मनुष्य देहासारखं अनुपम साधन नाही. पण या देहाचा वापर आपण त्याच्या मूळ उद्दिष्टासाठी, म्हणजेच वास्तविक आत्महितासाठी करीत नाही. या देहात नांदत असलेल्या सूक्ष्म वासनेतच देहसुखाची लालसा आणि देहाभिमान उत्पन्न होतो आणि पोसला जात असतो. देहाभिमान म्हणजे ‘देहच मी’ या संकुचित धारणेतून प्रसवलेल्या ‘मी’चा अहंकार. आता दृश्याकडे असलेली ओढ ही देहात नाही, तशीच हा देह ज्या चैतन्य तत्त्वाच्या एकमेव आधारावर या जगात वावरतो त्या चैतन्य तत्त्वातही ती नाही, असं सांगितलं. आता दृश्याकडे असलेली ओढ म्हणजे काय? तर, जे जे दृश्यमान आहे त्यावर माणूस अधिक विसंबतो. जे आधारवत् दिसतं त्याचा त्याला अधिक भावनिक आधार वाटतो. त्यामुळेच तर मनाला ज्यांचा आधार वाटतो, अशा माणसांना आणि वस्तूंना मन चिकटून असतं. अनंत माणसांचं जग हे दृश्य आहे. या जगातच माणसांचा, वस्तूंचा आधार घेणं माणसाला शक्य असतं आणि म्हणूनच तो मनानं या जगावरच सुखासाठी विसंबून असतो. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियांद्वारे जगाकडे असलेल्या ओढीतूनच प्रपंच पसारा वाढत असतो. मग अंतरीक्ष राजा जनकाला सांगतो की, ‘‘जागृतिदेहाचा विसरु पडे। सवेंचि स्वप्नदेह दुजें जोडे। तेणें मिथ्या प्रपंच वाढे। स्वप्नीं स्वप्न कुडें कदा न मने।। ६१।।’’ या ओवीचा प्रचलित अर्थ असा की, ‘जागृत देहाचा विसर पडतो, तोच दुसरा स्वप्नदेह प्राप्त होतो. त्यामुळे मिथ्या स्वप्नप्रपंच वाढतो. स्वप्नामध्ये स्वप्न हे खोटं कधीच वाटत नाही.’ आता या ओवीचा अर्थ अनेक अंगांनी मनोज्ञ आहे. जागृत देहाचा विसर पडतो, म्हणजे काय? तर आपण झोपी जातो आणि एकदा निद्रेच्या अधीन झालो, की देहजाणीव काही काळापुरती विराम पावते. पण त्याच वेळी स्वप्नातला ‘मी’ जागाच असतो आणि स्वप्नात आपण वावरू लागतो तेव्हा त्याक्षणी स्वप्न हे खोटं कधीच वाटत नाही! त्या स्वप्नातही प्रपंच पसारा कायमच असतो आणि त्याच्या प्रभावाचा परीघही वाढताच असतो.