चैतन्य प्रेम

मनातीत परमात्म्याच्या मनात दोन होऊन आनंद भोगण्याची जी इच्छा झाली, तीच मूळमाया! भगवंताला वाटलं की, ‘‘मज माझी अतिप्रीती। माझी मज होआवी रती। माझ्याचि म्यां घेऊनि युक्ती। मज माझी प्राप्ति मद् बोधे व्हावी।। ७४।। म्हणे मज मियां आलिंगावें। मज मियांचि संभोगावें। मज मियांचि संयोगावें। नियोगावें स्वामिसेवकत्वें सर्वदा।। ७५।।’’ मीच माझ्याशी प्रेमरत व्हावं, मी माझ्याशीच रममाण व्हावं, मी मलाच बोधावं आणि मी माझ्यातच मिसळून मला प्राप्त व्हावं, मी मलाच आलिंगावं, मी माझाच उपभोग घ्यावा, माझा माझ्याशीच संयोग व्हावा आणि स्वामी-सेवक भावानं मी सर्वदा आत्मरत राहावं! भगवंताच्या मनात असा भाव येताच ही सर्व सृष्टी निर्माण झाली. अंतरिक्ष म्हणाला, ‘‘ऐकें आजानुबाहो नृपनाथा। ऐसें आठवलें भगवंता। तो आठवो जाला स्रजिता। महाभूतां भौतिकां।। ७६।।’’ हे नृपनाथा, भगवंताच्या मनात ही जाणीव स्फुरताच त्या स्फुरणातून पंचमहाभूतं आणि त्यांच्या आधारे ही अनेक आकारांतील दृश्य सृष्टी निर्माण होत गेली. या सृष्टीचा पसारा किती होता? तर, ‘‘चारी वर्ण चारी खाणी। चारी युगें चारी वाणी। चारी पुरुषार्थ चहूं लक्षणीं। मुक्तीची मांडणी मांडली चतुर्धा।। ७७।। उभारूनि तिन्ही गुण। आठवो रवी त्रिभुवन। तेणें मांडूनि त्रिपुटीविंदान। कर्मही संपूर्ण त्रिधा केले।। ७८।।’’ हे साक्षात परमात्म स्फुरण असल्यानं ते शक्तीरूप आहे. त्या शक्तीनं उत्पत्ती, स्थिती आणि लय ही प्रक्रिया अविरत चालते आणि सत्, रज आणि तम या तीन गुणांनी विभागून ही माया त्रलोक्याचा पसारा मांडते. चार वर्ण, चार खाणी, चार युगं, चार वाणी, चार पुरुषार्थ आणि चार मुक्ती, तसंच ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे त्रिपुटीविंदान आणि त्यानुसारचं तीन प्रकारचं कर्म असा या मायेचा विस्तार होतो. अर्थात, सत्यस्वरूप परमात्मा आणि आंतरिक निजानंद हा दोन होऊन भोगण्याच्या त्याच्या आंतरिक इच्छापूर्तीच्या स्फुरणातून उत्पन्न झालेली मिथ्यारूप माया यांची लीला म्हणजे हे जग! ‘भावार्थ भागवत’ या ग्रंथात बाबा बेलसरे सांगतात, ‘‘परमात्मा सर्व काही आहे आणि सर्व काही नाही. मानवी अनुभवाच्या क्षेत्रात गवसत असलेल्या सगुण-निर्गुण, ज्ञान-अज्ञान, सांत-अनंत, काल-कालातीत, चल-अचल, शाश्वत-अशाश्वत इत्यादी सर्व लक्षणांच्या पलीकडे राहणारे केवल स्वरूप ते सत्स्वरूप होय. त्याच दृष्टीने जगत् म्हणून वेगळे काही नाही. अर्थात तेथे मायाही अस्तित्वात नाही. परंतु परमात्म स्वरूप अखंड स्फुरणारे आहे. त्या स्फुरणाच्या पोटी स्वत:मध्ये स्वत:ला दुसरेपणाने ते बघू लागते. हे दुसरेपण शक्तिरूप असल्याने मूळचे परमात्मस्वरूप ईश्वर आणि माया किंवा शीव आणि शक्ती अशा अद्वैतमय द्वैताने प्रकट होते. आपण आपलेच तोंड आरशात पाहून प्रसन्न व्हावे, तसे परमात्मा मायेमध्ये आपले स्वरूप पाहून आनंदाने बेहोश होतो. या आनंदाचा अमर्याद विलास म्हणजे हा सृष्टीचा खेळ होय. तो अनंतरूपाने अनंतकाल चालण्यास मूळ शक्तीला अधिकाधिक दृश्य रूप धारण करावे लागते. किंबहुना अव्यक्तांतून अनंत व्यक्त रूपे निर्माण करणे आणि कालांतराने ती सर्व रूपे पुन्हा अव्यक्तांत आवरून नाहीशी करणे हाच खरा सृष्टीचा खेळ होय.. ज्या शक्तीने हा अचाट व्यवहार युगानुयुगे चालतो, तिला भगवंताची माया असे म्हणतात.’’ हे सर्व विवेचन वाचून अनेक प्रश्न मनात घोंगावतात. अत्यंत संक्षेपानं त्यातल्या एक-दोन प्रश्नांचा विचार आता करू.