चैतन्य प्रेम

भक्तीचा महिमाच असा आहे की, सद्गुरू भक्ताचा द्वारपालदेखील होतो! अर्थात भक्ताच्या मनाच्या दाराशी तोच रक्षणकर्ता म्हणून सदैव उभा राहतो! माणूस ज्ञानेंद्रियं आणि कर्मेद्रियांनी जगाशी जोडल्यागत भासतो; पण खरं जोडलं जात असतं ते मनच! इंद्रियांचा वापर करीत मनच जगाच्या संगामध्ये लिप्त असतं. या मनालाच जगाची भक्ती करण्याची सवय जडलेली असते. अकरावं इंद्रिय असलेल्या या मनाला एका दशेत स्थिर होण्याची प्रेरणा देण्यासाठीच श्रीमद् भागवताच्या एकादश स्कंधावर एकनाथांनी ‘एकनाथी भागवत’ रचलं. हे मन एका दशेत, एका स्थितीत नाही, कारण ते अनंत ‘मीं’नी भरलेल्या जगात गुरफटलं आहे. त्या मनात अहोरात्र जगाचं, दृश्याचं, मौतिकाचं भजन गुंजत आहे. त्या मनाला एका परमात्म भजनात लावल्यावाचून ते एका दशेत स्थित होणार नाही. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, ‘‘याचिलागीं सद्गुरुपाशीं। शरण रिघावें सर्वस्वेंशीं। तो संतोषोनियां शिष्यासी। भजनधर्मासी उपदेशी ॥३४९॥’’ हे ‘भजन’ हाच भागवत धर्म आहे, भगवंताचं होण्याचं मर्म आहे! आता हे भजन म्हणजे देवाच्या स्तुतीचे अभंग मोठय़ा स्वरात गाणं नव्हे, नुसतं टाळ कुटणं नव्हे, तर आपला प्रपंच मनानं भगवंताला अर्पण करून त्याच्या स्मरणात कर्तव्य करीत राहणे, हेच मुख्य भजन आहे. एकनाथांनीच दुसऱ्या अध्यायात ही व्याख्या केली आहे. तेव्हा सद्गुरू शिष्याला ज्या भजनधर्माचा उपदेश करतात, तो हाच भजनधर्म आहे. ‘जो धारण केला जातो तो धर्म’ ही व्याख्या लक्षात घेतली, तर प्रपंच भगवंताचा मानून कर्तव्य करण्याची धारणा हाच भजनधर्म आहे. तो भजनधर्म केवळ सद्गुरूबोधानुसार आचरण करूनच साधता येतो. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘जेणें भजनें भगवंत। भजोनि जाहले उत्तम भक्त। ते भागवतधर्म समस्त। शिकावे निश्चित सद्भावेंसीं॥३५०॥’’ या भागवत धर्माच्या आचरणानं भगवंताचं खरं भजन साधून अनेक साधकांनी उत्तम भक्ताची स्थिती साध्य केली. तो भागवत धर्म सद्गुरू सान्निध्यात सद्भावानं शिकून घ्यावा! प्रपंच आजवर ‘मी’पणानं केला जात होता. तोच आता ‘मी’पणा जगापुरता ठेवून आणि आपल्या मनातून पुसून करायचा आहे. तो कर्तव्याचा आहे. म्हणजेच प्रपंचात जी जी नातीगोती आहेत, त्यांच्याप्रति माझी जी जी कर्तव्यं आहेत ती करण्याचा अभ्यास म्हणजे प्रपंच आहे. त्या कर्तव्यपालनात आज मोह शिरला आहे. त्यामुळे मोहानं, परस्पर स्वार्थपूर्तीच्या अपेक्षेनं जो प्रपंच सुरू आहे, त्याची आपल्या मनोरचनेतील घडण बदलायची आहे. त्यासाठीच नाथ सांगतात, ‘‘मुख्य भागवतधर्मस्थिती। अवश्य करावी सत्संगती। हेंचि सद्गुरू उपदेशिती। असत्संगतित्यागार्थ॥३५१॥’’ भागवत धर्माची मुख्य स्थिती काय आहे? तर सत्संगती निर्धारानं साधायची आहे आणि तितक्याच निर्धारानं सर्व तऱ्हेची असत्संगती त्यागायची आहे. आता सत्संग म्हणजे नुसता सत्प्रवृत्त माणसांचा वा सहसाधकांचा संग नव्हे. त्याचप्रमाणे असत्संगती म्हणजे निव्वळ दुष्प्रवृत्त माणसांचा संग नव्हे. संग हा माणसांइतकाच विचारांचा असतो. माणसांपेक्षा विचारांचा संग हा सूक्ष्म आणि त्यामुळेच अधिक प्रभावी असतो. तेव्हा जगण्यातील सर्व तऱ्हेचे नकारात्मक, भ्रामक, आसक्तीप्रधान विचार हीच मोठी कुसंगती आहे. ती सोडण्याची कला सद्गुरूच शिकवतात!