आपल्या आतच आनंद आहे, असं संत सांगतात. आपल्याला मात्र त्याचा अनुभव नाही आणि म्हणूनच ते पटत नाही. दु:खात होरपळत असताना- ‘‘तू आनंदरूपच आहेस, दु:ख हा भ्रम आहे,’’ असं कुणी म्हणालं तर पटेल का? तेव्हा जीवनात दु:ख आहे आणि सुख-दु:खाचे प्रसंग या जगातच वाटय़ाला येतात. त्यामुळेच सुख मिळवण्याचा आणि दु:ख टाळण्याचा वा निवारण्याचा उपाय जगातच केला पाहिजे, अशी आपली दृढ धारणा आहे. आपल्याला सुखाची मूलत: ओढ आहे. त्यामुळे हे सुख ‘मिळविण्याचं’ ठिकाण असलेल्या जगाकडे आपला स्वाभाविक ओढा आहे. जगाची आस आणि आसक्ती हीच आपली प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीतून जोवर मनानं निवृत्त होता येत नाही, तोवर जन्म-मृत्यूची पुनरावृत्ती टळत नाही! ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी अशाश्वत जगाच्या भक्तीची पुनरावृत्ती थांबून शाश्वताची भक्ती सुरू झाली पाहिजे. भक्तीशिवाय मुक्त होण्याची कितीही धडपड केली तरी ती फोल ठरते. नाथ महाराजही म्हणतात की, ‘‘भक्तीवीण मुक्तीचा सोसु। करितां प्रयत्ना पडे वोसु।’’ आता मागेच म्हटल्याप्रमाणे ‘भक्ती’ काही आपल्याला नवी नाही; पण आपली भक्ती जगाची भक्ती आहे. त्या जगातल्या सुखाभासांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आपण घरात देवघर मांडतो, जमेल तशी पूजा करतो. सोमवारी शंकराच्या, मंगळवारी गणपतीच्या, गुरुवारी दत्ताच्या, शनिवारी मारुतीच्या.. याप्रमाणे वार लावून मंदिरात जातो. जमेल तसं तीर्थयात्रांनाही जातो. पण या सगळ्यामागे अध्यात्माकडे नेणाऱ्या विशुद्ध धर्माचरणाची ओढ नसते. भौतिक कामनेच्या पूर्तीचाच हेतू त्यात असतो. एकनाथ महाराज भक्तीपंथाच्या वाटचालीतलं मूर्तीपूजेचं महत्त्व नाकारत नाहीत, पण ते पूज्यतेचा क्रम हळूहळू व्यापक करीत एकाच ठिकाणी पूज्यताभाव केंद्रित करण्याची प्रक्रिया सुरू करतात. ते म्हणतात, भगवंत आपल्या हृदयातच आहे. त्यामुळे दृष्टी आत स्थिर करून हृदयस्थ भगवंताचं ध्यान करा. अर्थात जगाकडे फाकलेली, बहिर्मुख झालेली दृष्टी आत वळवा, अंतर्मुख करा. घरात मिट्ट अंधार आहे. काही दिसत नाही की चालताही येत नाही. अशा वेळी घराबाहेर झगमगाट करून काही उपयोग आहे का? घरातच प्रकाश उजळला पाहिजे. दागिने आणि नव्या कपडय़ांनी प्रेतही सजवतात, पण चतन्य नसल्यानं त्या बाह्य़रूपाला काही महत्त्व असतं का? त्या दागिन्यांचं आणि कपडय़ांचं कुणी कौतुक करतं का? उलट तृप्त मनानं ज्यानं प्राण सोडलेले असतात, त्याचा चेहरा मृत्यूनंतरही समाधानी भासतो तेव्हा त्याचं कौतुक लोकांना वाटतं! तेव्हा अंतरंग स्थितीलाच महत्त्व आहे. त्यासाठी प्रथम हृदयस्थाची भक्ती उत्तम आहे. ती सोपी मात्र नाही! त्यामुळे नाथ सांगतात, ‘‘त्या हृदयस्थाचे ठायीं। दृढ दृष्टी जंव बसली नाहीं। तंव सगुणमूर्ती हृदयीं। भजावी पाहीं सर्वात्मभावे॥ ५६९॥ (अध्याय ३)’’ जर हृदयस्थ भगवंताच्या ठायी दृष्टी गोळा होत नसेल, तर मग सगुण मूर्तीचं ध्यान धरावं, अंतरंगात तिची सर्वभावे भक्ती करावी. आता ही गोष्टही कठीण नाही. कारण प्रिय व्यक्तीच्या सगुण रूपाचं ध्यान आपल्या मनात सहज होतंच! मग अंतरंगातली ही पूजा स्थिर होण्यासाठी स्थूल मूर्तीपूजाही नाथ मान्य करतात, मात्र पूज्यतेचा क्रम अलगद सुधारू लागतात.

चैतन्य प्रेम