चैतन्य प्रेम

जन्मापासून देह आपला सोबती असतो. या देहाशिवाय जगात वावरता येत नाही. सुख मिळविण्याची आणि दुख टाळण्याची धडपड करता येत नाही. त्यामुळे ‘देह’  हा आपला पहिला आणि मुख्य आधार असतो. या देहाला सर्वाधिक महत्त्व असतं. देहानं आपण जगात वावरतो खरं, पण हा देह परिस्थितीनं बांधला असतो. म्हणजे चांगल्या-वाईट परिस्थितीनुसार या देहाच्या वाटय़ाला सुख-दुखं येत असतात. अर्थात परिस्थितीवरही माझ्या जीवनातली अनुकूलता-प्रतिकूलता; म्हणजेच सुख-दुख अवलंबून असतं. त्यामुळे जीवनात देहाइतकंच परिस्थितीलाही महत्त्व असतं. या जगात जन्मापासून मृत्यूपर्यंत माझा अन्य माणसांशी अटळ संबंध येतो. या माणसांच्या वृत्तीवरही माझ्या जीवनातली सुख-दुखं अवलंबून असतात. त्यामुळे देह आणि परिस्थितीइतकंच माझ्या भोवतालच्या माणसांना महत्त्व असतं.

देह, परिस्थिती आणि जग हे सगळं काळाच्या अधीन, काळाच्या चौकटीत बद्ध असतं. म्हणजेच आपल्या हाती जेवढा काळ आहे तेवढय़ात आपल्याला खरं आत्महित साधून घ्यायचं आहे! सर्वसामान्य माणूसही खरं तर तसंच मानत असतो. आयुष्याचे अखेरचे दिवस तरी आनंदात जावेत, हीच प्रत्येकाची मनोमन इच्छा नसते काय? आता हे दिवस आनंदात जाण्याची व्याख्या तरी काय? तर शरीर निरोगी राहावं, सुखच नव्हे, तर अखंड सुख मिळत राहावं, आवडत्या माणसांचा आधार टिकून राहावा, आर्थिक स्थिती चांगली असावी, हीच अपेक्षा असते ना? ‘भले दुखाचे दिवस येवोत, पण अंतकरणात समाधान अखंड राहू दे,’ असं कुणीच म्हणणार नाही. कारण सुख-समाधान हे बाह्य परिस्थितीतच आहे, अशी आपली पूर्ण खात्री असते. बरं माणसाला नुसतं सुख नको असतं, त्याला कायमचं सुख हवं असतं. आपल्याला आपल्या तरुण, सदासतेज शरीराची सवय असते. त्या शरीरावर जेव्हा प्रथम सुरकुती पडू लागते, तेव्हा मन अस्वस्थ होतंच ना? केस पांढरे होऊ लागतात, त्यानं वाईट वाटतंच ना? मग माणूस त्वचेवर सुरकुत्या न पडू देणारे उपाय शोधू लागतो, चेहरा आकर्षक राखणारी मलमं आणि लेप लावू लागतो, केस काळ्या रंगानं रंगवू लागतो. थोडक्यात, आपण नेहमीच तरुण दिसावं, भासावं, असं माणसाला तळमळीनं वाटत असतं.

ही जी नित्याची, शाश्वताची, अखंड सुखाची ओढ आहे त्यामागचं कारण आपलं आत्मस्वरूप नित्य अखंड शाश्वत आणि परमानंदमय आहे, हेच आहे. पाण्यावाचून मासा तडफडतो, कारण पाण्यावाचून तो राहूच शकत नाही. तसा माणूस आनंदासाठी तडफडतो. आनंदावाचून तो राहूच शकत नाही. तो जवळ असूनही दुरावलेला परमानंद पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठीचा अभ्यास म्हणजे साधना आहे. खरं तर या अभ्यासाची सुरुवात आपल्याला आपली सदसद्विवेकबुद्धीच सर्वप्रथम करून देत असते. एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘पश्वादि योनींच्या ठायीं । हिताहितज्ञान असे पाहीं । मा पुरुषाच्या पुरुषदेहीं । ज्ञान पाहीं स्फुरद्रूप ॥२१७॥ जें कर्म करितों मी देहीं । तेणें तरेन कीं नाहीं । हें ज्याचे त्याचे ठायीं । स्फुरद्रूप पाहीं कळतसे ॥२१८॥’’ (अध्याय ७).म्हणजे आपलं भलं-बुरं कशात आहे, हे ज्ञान पशू-पक्ष्यांनाही असतं. तेच या मनुष्यदेहातही स्फुरत असतं. आपलं कोणतं कर्म तारक आहे, हे माणसालाही उमजत असतं.