चैतन्य प्रेम

आपण जन्मापासून सुख मिळवण्यासाठीच धडपडत असतो. आयुष्याच्या मध्यावर येता येता आपल्या मनात विचारांचा झंजावात सुरू होतो. खरं अखंड सुख कोणतं आणि ते कसं मिळेल, हा प्रश्न त्या विचारांच्या मुळाशी असतो. संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग आपल्याला खुणावत असतो. पण ते विवेक-वैराग्य, त्याग आणि समर्पण; हे सारं अशक्य कोटीतलंही वाटत असतं. त्यात भर पडते ती भक्ती, वैराग्य या गोष्टींना थोतांड ठरविणाऱ्या विचारांची. ‘एकनाथी भागवता’त भगवान श्रीकृष्णानं आपला प्रिय सखा उद्धवाला जो बोध केला आहे, त्यात या विरोधी विचारांचाही ऊहापोह आहे. ही सृष्टी एकाच परमात्म सत्तेतून निर्माण झाली असून त्या एकाच्याच आधारावर टिकून आहे. त्यामुळे त्यात एकात्मता आहे, या मताचं काही जण खंडन करतात. त्यांचा युक्तिवाद मांडताना एकनाथ महाराज सांगतात की, ‘‘म्हणती जे मानिती एकात्मता। तरी एकाचेनि सुखें सुख समस्तां। कां एकाचेनि पापें पापता। न घडे सर्वथा सकळांसी।।’’ (अध्याय दहावा). जर सर्व काही एकच आहे; तर मग एक जण सुखी होताच सर्वच जण सुखी का होत नाहीत आणि एकानं पाप केल्यास सगळ्यांना पाप का लागत नाही? मग स्वकर्तृत्वाच्या अभिमान भ्रमाने फुललेले लोक सांगू लागतात की, ‘‘..जीव नित्य आणि अनंत। मुख्य ईश्वरचि नाहीं म्हणत। कर्ते येथ निजकर्म।।’’ म्हणजे अनंत जन्मं जन्मणारा जीव अनित्य नव्हे, तर नित्यच आहे. मुळात ईश्वर म्हणून मात्र कुणी नाहीच. माणसाचं कर्म हाच खरा कर्ता आहे, असं मत ते हिरिरीनं मांडतात. त्यातही प्रत्येक जीवातलं अहंभावाचं स्फुरण वेगवेगळं आहे आणि म्हणून जीवांमध्ये एकत्व नाही, तर अनेकत्वच आहे. (मीपणें जें स्फुरे स्फुरण। ते प्रतिशरीरीं जीव भिन्न।). त्याग, संन्यास, वैराग्य या गोष्टींची ते निंदा करतात आणि कर्मरत राहणं हेच खरं, असं मत मांडत असतात. (त्याग-संन्यास जे करिती। त्यांतें अनधिकारी म्हणती। कर्म मुख्यत्वें मानिती। वैराग्य निंदिती निजमते।।). ज्या कर्माच्या जोरावर सुख भोगता येतं, त्या कर्माचा त्याग करून निष्कर्म होण्यात काय सुख आहे, असं ते विचारतात. इतकंच नाही, तर त्याग हाच परम दु:खमय आहे, असं ते मानत असतात (कर्म करोनि भोगिजे सुख। तें कर्म त्यजिती नि:शेख। निष्कर्मासी कैंचें सुख। परम दु:ख तो त्यागु।।). मुळात या जगात काही अनित्य आहे, असंही ते मानतच नाहीत. कारण जर खरंच काही अनित्य असतं, तर माणसाच्या मनात वैराग्य सहजच आलं असतं. जर सगळंच नश्वर असतं किंवा मायिक असतं, तरी त्याबाबत मन विरक्त झालं असतं, असा युक्तिवाद ते करतात. (म्हणती अनित्य असतें कांहीं। तरी वैराग्य घडतें ते ठायीं। येथ अनित्यचि नाहीं। वैराग्यें कायीं त्यजावें।.. हो कां भोग्य जरी नश्वर होतें। अथवा मायिक कांहीं असतें। तरी वैराग्य संभवतें। तें तत्त्व येथें असेना।।). आता इथं वैराग्याच्या विरोधात जे मुद्दे मांडले गेले आहेत, ते आपल्याला अपरिचित नाहीत. आपणही ते अनेकदा ऐकले असतील, तर काही वेळा आपल्याही मनात ते येऊन गेले असतील. कर्मानंच नशीब पालटतं, सुख भोगता येतं, तेव्हा त्या कर्माचा त्याग करून वैराग्याचा स्वीकार करण्यात काय अर्थ, असा प्रश्न मांडला जातो. हे प्रश्न म्हणजेदेखील भक्तिमार्गातील विघ्नंच आहेत. कारण ते मनात विकल्पांचं आणि तर्क-वितर्काचं नाहक वादळ निर्माण करतात. वितर्काचं रूपांतर कुतर्कात होतं आणि कुतर्कानं आत्मघातच ओढवून घेतला जातो.