27 October 2020

News Flash

१८०. अद्वैत

आईनं मारलं तरी ते आईलाच बिलगतं. उच्च-नीच, आप-पर ही जाणीवच त्याला नसते. त

चैतन्य प्रेम

जगाच्या आसक्तीतून अनंत जन्मांच्या प्रयत्नांनी सुटलेल्या आणि साधनाभ्यासानं परमात्म्याशी एकरूप होण्याची कळकळ असलेल्या भक्ताला भगवंत हा आईच्या वात्सल्यानं सांभाळत असतो. ‘‘निरभिमानाचेनि नांवें। देव निजांगें करी आघवें। जेवीं कां तान्हयाचेनि जीवें। जीवें भावें निजजननी।।७२६।।’’ हा भक्त निरभिमानी असतो, जसं लेकरात अहंभाव नसतो. आईनं मारलं तरी ते आईलाच बिलगतं. उच्च-नीच, आप-पर ही जाणीवच त्याला नसते. तसा हा भक्त असतो. त्यामुळे तान्ह्य़ा मुलाला जीवाभावानं जननी जसं जपते तसा देव या भक्ताला सांभाळू लागतो. मग, ‘‘एवं राखतां निजभक्तांसी। तरी देव धाके निजमानसीं। जरी हा मजसीं आला ऐक्यासी। तरी हे प्रीति कोणासीं मग करावी।।७२७।। कोणासी पाहों कृपादृष्टीं। कोणापें सांगों निजगोष्टी। कोणासी खेवें देवों मिठी। ऐशी आवडी मोठी प्रेमाची।।७२८।। या काकुळतीं श्रीअनंतु। ऐक्यभावें करी निजभक्तु। मग देवो भक्त दोहींआंतु। देवोचि नांदतु स्वानंदें।।७२९।। एवं आपुली आपण भक्ती। करीतसे अनन्यप्रीतीं। हेंचि निरूपण वेदांतीं। ‘अद्वैतभक्ति’ या नांव।।७३०।।’’ भक्तांचं देव रक्षण करीत असतो, पण त्याचवेळी त्याच्या मनात एक धाक उत्पन्न होतो! आता साक्षात देवाच्या मनात धाक? तो कोणता? तर, भक्त आपल्याशी एकरूप होईल, याचा! सगळं अध्यात्म तत्त्वज्ञान हे परम तत्त्वाशी एकरूप होण्याचंच ध्येय मांडत असताना अखेरीस जर त्या ऐक्यतेचा भगवंतालाच धाक वाटत असेल, तर काय करावं, असं कुणाच्याही मनात येईल. पण म्हणूनच त्यातलं गूढ थोडं जाणून घेतलं पाहिजे. परम तत्त्वाशी एकरूप होण्याचं ध्येय कोणासमोर ठेवलं आहे? तर ज्याचं मन जगात विखुरलं आहे आणि जगाशीदेखील ते कुठेच एकरूप नाही, अशा मनासाठी हे ध्येय आहे. कारण एका परम तत्त्वाशी एकरूप होण्यासाठी त्याचं जगातलं विखुरलेपण थांबावं. त्याचं मन गोळा व्हावं. जेव्हा अध्यात्माचा प्रामाणिक अभ्यास सुरू होतो तेव्हा अनन्य भक्तीच्या वाटेवरच साधकाची पावलं पडू लागतात. जगाची आसक्ती पूर्ण लोपलेला, एका भगवद् प्रेमावाचून अन्य कशातच गोडी न वाटणारा जो भक्त असतो त्याचं पाहणं, बोलणं, तळमळणं हे सारं भगवद्प्रेमानं भरून गेलं असतं. मग भगवंतालाच त्याच्या सहवासाची ओढ लागते. पण जसजसा हा भक्त एकरूप होऊ लागतो तेव्हा त्याला ते ऐक्य नकोसं वाटतं! कारण ‘एकोहं’ असा जरी त्याचा घोषा असला, तरी विशुद्ध भक्तीप्रेमाचा आनंद भोगण्यासाठी त्याला भक्ताचीच गरज लागते! मग हा भक्त जर माझ्याशी ऐक्य पावला, तर मग कुणाशी प्रेम करावं? कृपादृष्टीनं कोणाकडे पहावं? कोणाशी गुजगोष्टी कराव्यात? कुणाला हृदयाशी कवटाळावं, असा प्रश्न त्याला पडतो. भक्ताच्या प्रेमाची भगवंताच्या मनातली आवड मोठी विलक्षण असते. मग मोठय़ा काकुळतीनं हा श्रीअनंत भक्ताला आपल्यात विलीन न करता त्याला आपला भक्त म्हणूनच  जगवतो. पण भगवंतमय झालेला भक्त वेगळेपणानं उरतो थोडाच? मग देव आणि भक्त यांच्यात देवच स्वानंदानं नांदू लागतो. अनन्य प्रीतीनं तो आपणच आपली भक्ती करू लागतो. ‘मी’ आणि ‘तू’मध्ये द्वैत उरलेलंच नसतं. ‘तू’च ‘मी’च्या आकारात वावरत असतो आणि ‘मी’च्या माध्यमातून ‘तू’चीच भक्ती करीत असतो! ‘मी’ नाहीच, केवळ ‘तू’च, हेच तर अद्वैत!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 12:03 am

Web Title: loksatta ekatmyog article 180 abn 97
Next Stories
1 १७९. आहाराभ्यास
2 १७८. कामनाश्रय
3 १७७. वैराग्याभ्यास
Just Now!
X