27 October 2020

News Flash

१८१. ‘मी’ आणि ‘तू’

अनंत मोहग्रस्त कर्मानीच आपलं प्रारब्ध घडलं आहे, हे जाणवतं

चैतन्य प्रेम

देव आणि भक्त या दोन्ही रुपांत देवच स्वानंदानं नांदू लागतो. अनन्य प्रीतीनं तो आपणच आपली भक्ती करू लागतो, हे मोठं रहस्यमय आहे! खरं पाहता माणूस कर्ता असल्याचं मानतो आणि मग तो स्वत:च्या क्षमता, मर्यादा, परिस्थितीची चौकट, कर्तव्यांची चौकट लक्षात न घेता आपल्या मनाच्या ओढींनुसार कर्मरत होतो. म्हणजेच जे कर्म अयोग्य आहे तेसुद्धा तो मोठय़ा ओढीनं करू जातो. त्यातून अमुकच साध्य होईल, असंही तो मानत असतो. प्रत्यक्षात चुकीच्या कर्माचं फळ कधीही चुकत नाही! त्यामुळे जे दु:ख वाटय़ाला येतं त्यानं खचून न जाता तो एकतर नव्या उमेदीनं तीच अयोग्य र्कम त्याच रीतीनं करू लागतो किंवा कर्तव्यविन्मुखही होऊन चुकीच्या दिशेनं वाहवत जातो. पण भक्तीपंथावर जसजशी प्रामाणिक वाटचाल होऊ लागते तेव्हा आपली कर्तव्यं आणि आपलं प्रारब्ध यांची जाण येऊ लागते. अनंत मोहग्रस्त कर्मानीच आपलं प्रारब्ध घडलं आहे, हे जाणवतं. त्यामुळे अनंत जन्मांत मी ज्या चुका केल्या त्या दु:खभोगाच्या रूपात वाटय़ाला येतात आणि अनंत जन्मांत मी जी सत्कृत्ये केली ती सुखभोगाच्या रूपात वाटय़ाला येतात, हे आकळू लागतं. पण एखाद्यानं जुगार जिंकावा आणि नव्या उमेदीनं जुगारच खेळत राहावा किंवा जुगारात हरावं आणि आशेनं तरीही जुगारच खेळत राहावं, यातील कोणती गोष्ट चांगली? निवड करता येते का? अगदी त्याचप्रमाणे दु:खाइतकंच सुखही तर गुंतवतं. म्हणजेच पापकर्माइतकीच पुण्यकर्मेही गुंतवतात. उलट पुण्यकर्मे ही मनात सात्त्विक अहंकारही जोपासण्याचा धोका असतो. आता याचा अर्थ माणसानं पाप-पुण्य काहीही बेलाशक करावं, असा नव्हे. त्यानं सत्कर्मच करावीत, पण त्या कर्माचंही कर्तेपण स्वत:कडे घेऊ नये. मी निमित्त आहे, माझ्याकरवी हे कार्य भगवंतच घडवीत आहे, हा भाव जोपासण्याचाच प्रयत्न करावा. तर मग ती सत्र्कमदेखील बाधक होणार नाहीत. तर जेव्हा भक्तीपंथावर खरी प्रामाणिक वाटचाल सुरू होते आणि जीव केवळ सत्कर्मरतच असतो तेव्हा आपण कर्ते नाही, तर भगवंतच कर्ता आहे, हे ठामपणे जाणवू लागतं. इतकंच नव्हे, तर भगवंताची भक्तीदेखील आपण करीत नाही, हे त्याला उमगतं. भगवंतानं गीतेत सांगितलंय की, मला पुष्प, पत्र, फळ आणि तोय अर्थात पाणी काहीही अर्पण केलं तरी मी प्रसन्न होतो. आपणही पूजेत तेच तर अर्पण करीत असतो. पण ती फुलं, ते पाणी काय आपण निर्माण केलं आहे का? तर नाही. त्यामुळे साधी पूजाही आपण करू शकत नाही. ती साध्य होते कारण त्या पूजेसाठीची साधनं भगवंतानंच निर्माण करून दिली आहेत म्हणून! भगवंताचं नाम ज्या मुखानं आपण घेतो, भगवंताचं दर्शन ज्या डोळ्यांनी घेतो, भगवंताची सेवा ज्या हातांनी करतो, भगवंताच्या तीर्थक्षेत्रीं ज्या पायांनी जातो, त्या हाता-पायात, डोळ्यांत, मुखात भगवंतानंच तर त्या क्षमता निर्माण केल्या आहेत. म्हणूनच तर भक्ती करतो ना? तेव्हा ‘मी करतो’ हे सर्वार्थानं फोल आहे, हे खरी प्रामाणिक साधना करणाऱ्याला उमगू लागतं. मग जसजसा हा अभ्यास तीव्र होत जातो तसतसा ‘मी’ म्हणून काही उरत नाही. जगासाठी तो टिकून राहतो, पण आंतरिक धारणेत ‘मी’ची जागा ‘तू’नं अर्थात सद्गुरूमय भगवंतानं आणि भगवंतमय सद्गुरूनंच घेतली असते! त्यामुळे  ‘मी’ आणि ‘तू’ हे द्वैत उरलेलंच नसतं. ‘तू’च ‘मी’च्या आकारात वावरत असतो आणि ‘मी’च्या माध्यमातून ‘तू’चीच भक्ती करीत असतो! ङ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 12:08 am

Web Title: loksatta ekatmyog article 181 abn 97
Next Stories
1 १८०. अद्वैत
2 १७९. आहाराभ्यास
3 १७८. कामनाश्रय
Just Now!
X