चैतन्य प्रेम

आपल्या अंत:करणातील समत्व आणि शांतीनं ते जगात सकारात्मक वृत्तीनं वावरत असतात आणि त्यामुळे जे जे उत्तम त्याची प्राप्ती त्यांना निश्चितपणानं होत असते. आता आंतरिक समत्व आणि शांती कधी प्राप्त होते? तर परिस्थितीचा स्वीकार करण्याची वृत्ती पूर्ण रुजली असते तेव्हा. म्हणजेच कशाबद्दलही तक्रार उरली नसते. बाह्य़ परिस्थितीचा मनावर कोणताही ठसा उमटत नसतो. मग अशाला जे जे उत्तम आहे त्याची प्राप्ती होते. आता सर्वोत्तम असं या चराचरात काय आहे? तर भगवद्जाणीव! भगवंताच्या अस्तित्वाची, संगाची  जाणीव आणि त्याच्या बोधप्रकाशात जगण्याची संधी, हीच या जगात सर्वोत्तम आहे. ज्याला या चराचरातील भौतिक ओढींच्या पूर्तीची लेशमात्र अपेक्षा नाही, अशा निरपेक्षालाच ही परमप्राप्ती होते. असा जो निरपेक्ष असतो तोच खरा भक्त असतो.  राजा जनकाला कवि नारायण जे सांगत आहेत त्याचं विवरण एकनाथ महाराज करीत आहेत. ते म्हणतात, ‘‘निरपेक्ष तो मुख्य ‘भक्त’। निरपेक्ष तो अति ‘विरक्त’। निरपेक्ष तो ‘नित्यमुक्त’। सत्य भगवंत निरपेक्षी।।७४४।।’’ जो निरपेक्ष आहे तोच मुख्य भक्त आहे, जो निरपेक्ष आहे तोच विरक्त आहे, जो निरपेक्ष आहे तोच क्षणोक्षणी मुक्तावस्थेत आहे.. भगवंत हा निरपेक्षापाशीच असतो हे सत्य आहे! ही निरपेक्षता, ही विरक्ती ज्याचा अहंभाव पूर्ण लयाला गेला आहे, जो या चराचरात स्वत:ला अगदी नगण्य मानतो, ज्याचा देहलोभ समूळ नष्ट झाला आहे त्यालाच लाभते. तोच आत्मानुभवाचा अधिकारी असतो. एकनाथ महाराजांनी ही गोष्ट ‘हस्तामलक टीका’ या लघुग्रंथातही अत्यंत मार्मिकपणे सांगितली आहे. ते म्हणतात की, वाळवंटात साखर सांडली तरी ती जशी निवडता येत नाही तसा शब्दपांडित्याच्या वाळवंटात जो हरवला आहे त्याला वेदशास्त्रांचा उहापोह करूनही सूक्ष्म आत्मज्ञान गवसत नाही! नाथ सांगतात, ‘‘वाळुवंटीची साखर। निवडावया मुंगी चतुर। तेवीं नैराश्य विरक्त नर। ब्रह्म परात्पर स्वयें होती।।३२९।।’’(हस्तामलक टीका). वाळवंटात सांडलेली साखर भल्याभल्यांना शोधता येत नाही, पण मुंगी मात्र वाळूकण आणि साखर यातून साखर नेमकी निवडते. तसे ज्यांच्या मनात भौतिक सुखाची आशा उरलेली नाही असे विरक्त नरच आत्मज्ञान प्राप्त करतात, असं नव्हे तर तेच स्वत: ज्ञानरूपात विलीन होतात! आता भौतिक सुखाची आशा उरलेली नाही, याचा अर्थ त्यांचं जीवन अगदी रूक्ष असतं किंवा ते संपूर्ण भौतिक अभावातच जगत असतात, असं नव्हे! तर संपूर्ण वैभवातही ते आशामुक्त, विरक्त असू शकतात. जनक राजा तसा होताच ना? तो वैभवात जगत होता, पण त्या वैभवात त्याचं मन कधीच अडकलं नव्हतं. मग नाथ सांगतात, ‘‘मुंगी लहान जगामाझारीं। ते मुळींहूनि चढें वृक्षपर्णाग्रीं। तेवीं अकिंचन जन संसारी। ब्रह्म साक्षात्कारीं परब्रह्म।।३३०।।’’ मुंगी जगात अगदी लहान असते, पण म्हणूनच ती झाडाच्या मुळापासून सर्वात उंच फांदीवरील टोकाच्या पानाच्या टोकापर्यंत जाऊ शकते! त्याप्रमाणे या जगात अकिंचन असलेले, म्हणजे ज्यांचं मन अकिंचन आहे, या जगातील भौतिक कामनांत आणि वस्तूलोभात अडकलेलं नाही, असे जे भक्त आहेत ते ब्रह्मभावात लीन होतात. मिठाची बाहुली समुद्रात गेली आणि समुद्रच होऊन गेली, असं रामकृष्ण सांगत ना? तसे ब्रह्मभावात लीन झालेले हे भक्तदेखील ब्रह्मापासून अभिन्न होऊन जातात! ही परमप्राप्ती!!