27 October 2020

News Flash

१८६. निजस्वार्थ- निजनिष्ठा

चैतन्य प्रेम जो निरपेक्ष तोच खरा भक्त, हे आपण पाहिलं. आता त्याची आंतरिक घडण कशी असते, हे राजा जनकाला कवि नारायण सांगत आहे. नाथांच्या ओव्यांतून

चैतन्य प्रेम

जो निरपेक्ष तोच खरा भक्त, हे आपण पाहिलं. आता त्याची आंतरिक घडण कशी असते, हे राजा जनकाला कवि नारायण सांगत आहे. नाथांच्या ओव्यांतून ते आपण जाणून घेणार आहोत. नाथ म्हणतात, ‘‘सप्रेमभावें करितां भक्ती। हरिचरणीं ठेविली चित्तवृत्ती। निजस्वार्थाचिये स्थितीं। अतिप्रीतीं निजनिष्ठा।।७४५।।’’ ही ओवी एका दमात वाचताना फार सहजसोपी वाटते, पण त्यात भक्ताच्या तपश्चर्येचं प्रतिबिंबच आहे. यातला ‘निजस्वार्थ’ आणि ‘निजनिष्ठा’ हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. मुळात निजस्वार्थ म्हणजे काय आणि निजनिष्ठा म्हणजे काय? स्वार्थ सगळ्यांनाच माहीत आहे आणि स्वार्थ हाच भक्तीमार्गाच्या वाटचालीतला अडसर आहे, माणसानं नि:स्वार्थ व्हायला हवं, हे आपण अनेकदा ऐकलंही असतं. मग हा निजस्वार्थ काय आहे? तर तो खऱ्या ‘स्व’शी जोडलेला आहे. आपल्या परिचयाचा जो स्वार्थ आहे तो देहभावनेशी जखडलेला असतो. त्या देहासाठी जे जे सुखाचं ते ते मिळवण्याच्या ईष्र्येनं तो स्वार्थ जोपासला गेला असतो. पण हा देह ज्या चैतन्यतत्त्वाच्या आधारानं चालतो, त्या चैतन्य तत्त्वाचाच अंश माझ्यात आहे, ते माझं खरं स्व-रूप आहे, त्या ‘स्व’च्या हिताचं जे जे आहे ते ते करणं, त्याला त्याला अग्रक्रम देणं, म्हणजे खऱ्या स्वार्थाच्या पूर्तीला अग्रक्रम देणं! आता ही ‘निजनिष्ठा’ म्हणजे देखील हा ‘स्व’ ज्या चैतन्य तत्त्वाचा अंश आहे, ज्या परम तत्त्वाचा अंश आहे त्या व्यापक, परम तत्त्वाशी एकनिष्ठ होणं, अनन्य होणं ही निजनिष्ठा आहे! आपली निष्ठा जगात जखडलेली आणि विखुरलेली असते. तीदेखील भौतिक अनुकूलता, सुख यासाठी असते आणि संत उच्चरवानं सांगतात, ‘अंतर्निष्ठ ते ते तरले!’’ जे अंतर्निष्ठ आहेत, अशा परम व्यापक सूक्ष्म तत्त्वाशी एकनिष्ठ आहेत, तेच या भवसागरातून तरून जातात. ज्यांची ज्यांची बहिर्निष्ठा आहे, दृश्यावर जे विसंबून जगत आहेत ते ते या भवसागरात गटांगळ्याच खात राहातात. हा ‘भवसागर’ही आपल्याच भावना कल्लोळांचा आहे. भ्रम, मोह, अज्ञान, आसक्ती यानं तो भरला आहे. त्यामुळे जो बहिर्निष्ठ आहे तो आसक्तीच्या लाटांच्या तडाख्यात गटांगळ्या खाणारच. जो मनुष्य जन्माचा खरा हेतू काय, खरं उद्दिष्ट काय, या शोधानं अंतर्मुख झाला आहे, तोच अंतर्निष्ठ होणार! अशी ज्याची आंतरिक स्थिती आणि गती आहे तोच खऱ्या सप्रेम भावानं भक्ती करू शकतो. कारण त्याच्या मनातून जगाची भक्ती सुटली असते. जगापासून तो मनानं विभक्त झाला असतो. नीट लक्षात घ्या, मनानं तो विभक्त असतो, कर्तव्यविन्मुख झाला नसतो. मग जो जगापासून खऱ्या अर्थानं विभक्त आहे, तोच भगवंताचा भक्त होऊ शकतो. जो खरी भक्ती करीत आहे, तोच हरिचरणांवर समस्त चित्तवृत्ती गोळा करू शकतो, केंद्रित करू शकतो, समर्पित करू शकतो. हा हरी म्हणजे समस्त भवदु:खांचं हरण करणारा सद्गुरूच! आणि ही भवदु:खंही आमच्याच आसक्तीयुक्त, भ्रमयुक्त, मोहयुक्त भावनांनी निर्माण झाली असतात. तेव्हा या दु:खांची निर्मिती आमच्याच चुकीच्या धारणेनं, चुकीच्या आकलनानं आणि अपेक्षांनी झाली आहे. त्या अपेक्षांच्या खोडय़ातून सुटण्याची कला सद्गुरू शिकवत असतो आणि म्हणूनच तो खऱ्या अर्थानं हरी असतो. त्याच्या चरणांवर चित्तवृत्ती केंद्रित होणं म्हणजे काय? त्याच्या पावलांवर मन जडणं का? नव्हे! ती पावलं ज्या मार्गानं जातात त्या मार्गावर चित्तवृत्ती जडणं हा त्याचा आशय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2019 12:07 am

Web Title: loksatta ekatmyog article 186 abn 97
Next Stories
1 १८५. बद्ध आणि मुक्त
2 १८४. निरपेक्ष तो मुख्य भक्त
3 १८३. आनंदरूप
Just Now!
X