चैतन्य प्रेम

हरिचरणी दृढ निष्ठा निर्माण झाल्यावर जे आत्मसुख गवसतं, त्यापुढे या त्रिभुवनाची संपत्तीही गवताच्या काडीइतकी तुच्छ भासते, असं कवी नारायण राजा जनकाला सांगत आहेत. इथं जो ‘त्रिभुवन’ शब्द आला आहे ना, त्याचा एक वेगळाच अर्थसंकेतही आहे. ‘हरिपाठा’वरील सदरात ‘नामें तिन्हीं लोक उद्धरती’चा एक अर्थ प्रकट झाला होता, तो म्हणजे- नामानं उच्च, मध्यम आणि नीच प्रवृत्तीचे अर्थात सत्त्वगुणप्रधान, रजोगुणप्रधान आणि तमोगुणप्रधान वृत्तीचे लोकही उद्धरतात. नामानं या तिन्ही प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आंतरिक पालट घडल्यावाचून राहात नाही.. आणि माणसाचा जो काही उद्धार आहे ना, तो बाहेरून होत नाही, तो आतच व्हावा लागतो! नाम आत खोलवर जातं आणि नामधारकाची धारणा, त्याचं आकलन, त्याचा अग्रक्रम बदलू लागतो. तर इथंही जी ‘त्रिभुवनाची संपत्ती तुच्छ भासते’ म्हटलं आहे ना, ती कोणती? तर सत्त्वगुणाच्या आधारे, रजोगुणाच्या आधारे वा तमोगुणाच्या आधारे जे ‘सुख’ माणूस स्वीकारतो, प्राप्त करून घेतो वा ओरबाडून घेतो; ते सुखही हरिचरणी प्रेम जडताच तुच्छ भासू लागतं! बघा हं, तिन्ही शब्दयोजना फार सूचक आहेत. सत्त्वगुणी माणसाच्या वाटय़ाला जी परिस्थिती येते, त्यात त्याचं चित्त शांतच राहत असल्यानं आहे त्या परिस्थितीच्या विनातक्रार स्वीकारानं ‘सुख’ही आपसूक अनुभवास येतं. पण ही स्थिती फार मोठय़ा अधिकारी भक्ताचीच होऊ  शकते. रजोगुण हा परिश्रम, उद्यमाला उद्युक्त करणारा आहे. या गुणानुसार माणूस सुखाची साधनं प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घेतो. तमोगुण हा मात्र प्रयत्नांपेक्षा कमी प्रयत्नांत किंवा प्रयत्न न करताच सुख मिळावं, वाटल्यास ते बळानं हिसकावून घ्यावं, ही प्रेरणा देतो. त्यामुळे तमोगुणप्रधान प्रवृत्तीचा माणूस ‘सुख’ ओरबाडत असतो. आपण बहुतांश लोक रजोगुण आणि तमोगुणाच्याच परिघात सुखप्राप्तीसाठी तळमळत असतो. पण रजो आणि तमोगुणानं सुखाची साधनं मिळतीलही; पण सुख मिळेल याची मात्र शाश्वती नाही! उत्तम दर्जाचं एखादं महागडं उपकरण आपण आणतो. वाटतं, आता सुख विनासायास मिळणारच. पण ते वारंवार बिघडू लागतं. मग मन विषादानं कण्हू लागतं की, ‘एवढे हजारो रुपये खर्च केले आणि सगळे पाण्यात गेले!’ कधी कधी जे आज सुखाचं वाटतं, तेच उद्या नीरस किंवा दु:खाचं वाटू लागतं. तेव्हा कवी नारायण सांगतात की, हरिचरणी भाव दृढ झाल्यावर जे आत्मसुख मिळतं ना, त्याची सर या त्रिभुवनांच्या ताब्यातील कोणत्याही सुखाला नाही! का? तर, हरी हा त्रिगुणातीत आहे ना! आता कुणी म्हणेल, सत्त्वगुणी माणसाच्या वाटय़ाला येणारं सुख तरी सुख असेलच ना? तर ऐका! सत्त्वगुणी साधक परिस्थिती स्वीकारतो खरा, पण कधी कधी अशी वेळ येतेच की, ‘मी एवढी साधना करतो, तरी माझ्या बाबतीत असं का व्हावं,’ या प्रश्नाचा विंचू डंख करतोच! तसंच सुखाचा कोणत्या क्षणी आधार वाटू लागेल, याचाही भरवसा नसतो. आणि सुखाचा आधार वाटू लागला, की ते सुख गमावण्याचं दु:खं आश्रयाला आलंच म्हणून समजा! तेव्हा त्रिगुणात बद्ध अशा या त्रिभुवनात जे सुख आहे ना, ते हरिचरणांवरील प्रेमभक्तीतून पाझरणाऱ्या आत्मसुखाच्या पासंगालाही पुरणारं नाही!