चैतन्य प्रेम

आपलं सगळं जगणं कसं आहे? तर शब्दमय आहे. शब्दांवर विसंबून सुरू आहे. आपण विचार करतो तो शब्दांनी, कल्पना रंगवतो त्या शब्दांनी, चिंता करतो तीही शब्दांनीच. त्यामुळे शब्दच मनाला दिलासा देतात, तसे शब्दच मनात थरकाप निर्माण करू शकतात. त्यामुळे कधी शब्दच आधार वाटतात, तर कधी शब्दच निराधार करतात. अनुकूल शब्दांनी सुख आणि प्रतिकूल शब्दांनी दु:ख अशा द्वैतात जन्मभर आम्ही अडकून आहोत. ते अनुकूल शब्द स्तुतीचे असतात आणि प्रतिकूल शब्द निंदेचे असतात. स्तुतीनं आम्ही हुरळून जातो आणि निंदेनं क्रोधायमान होतो. दोन्हींत वास्तवाचं भान सुटलेलंच असतं. तर अशा जगण्यात शब्दरूपच भासणारं ‘नाम’ प्रवेश करतं. सत्पुरुषाचा बोध हादेखील शब्दांतूनच पोहोचत असतो. शब्दांनीच भरलेल्या या अज्ञानप्रधान जगण्यात-परम तत्त्वाशी जोडलेलं नाम आणि व्यापक होण्याचा बोध या मार्गानं शब्दच आंतरिक जागृती आणि पालटाची दीर्घ प्रक्रिया सुरू करतात. हे नाम आणि हा परमबोध मग जगण्यातला शब्दांचा गोंधळ शोषू लागतो. संत एकनाथ महाराज एका अभंगात सांगतात, ‘‘घेईं नाम सदा। तेणें तुटेल आपदा। निवारेल बाधा। पंचभूतांची निश्चयें।।’’ माझ्या शब्दमय जगण्यात मोहासक्तीनं, माझ्याच अहंकेंद्रित वृत्तीनं, तसंच अनंत जन्मांतील चुकीच्या कर्मानी अनंत आपदा म्हणजे संकटं मीच माझ्या जगण्यात निर्माण केली आहेत. पंचेंद्रियांनी अर्थात पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियांनी घडलेल्या या देहातील मला देहबुद्धीची बाधा झाली आहे. त्यामुळे त्या  कर्मसंस्कारांत घट होण्याऐवजी क्षणोक्षणी भरच पडत आहे. तेव्हा जर क्षणोक्षणी वाचेनं नाम घ्यायचा प्रयत्न जर मी केला, तर जगण्यातली मोहासक्ती कमी होत जाईल. अनवधानानं सुरू असलेल्या जगण्यात अवधान येईल. त्यानंच देहबुद्धीच्या बाधेचं निवारण होऊ  लागेल. संकटांची साखळी तुटेल. तेव्हा हरी नारायण सांगतो त्याप्रमाणे, जसजसं नाम घेतलं जाईल, तसतसं ते नाम ज्या व्यापक परमात्म्याचं आहे तो परमात्माच हृदयात प्रकट होऊ  लागेल. आणि एकदा का परम तत्त्वानं हृदयात प्रवेश केला, की हृदयाची शुद्धी सुरू झालीच म्हणून समजा. मग अंत:करणातली मोहासक्ती विरू लागेल. मग काय प्रक्रिया घडू लागते? हरी नारायण सांगतो, ‘‘तेव्हां प्रपंच सांडोनि ‘वासना’। जडोनि ठाके जनार्दना। ‘अहं’कारू सांडोनि अहंपणा। ‘सोहं’ सदनामाजीं रिघें।। ७७७।।’’ वासना म्हणजे मनातली सूक्ष्म वासना. ही प्रपंच सोडून जनार्दनालाच म्हणजे परमात्म्याशी एकरूप सद्गुरूलाच चिकटू लागते. प्रपंच म्हणजे काय हो? तर, पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांद्वारे जगाकडे असलेली ओढ म्हणजेच प्रपंच! तो वासनेचाच असतो. या वासना देहबुद्धीतून स्फुरण पावत असतात आणि देहसुखाशीच जखडलेल्या असतात. त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला नाचवत असतात. स्वामी नित्यबोधानंद तीर्थ म्हणत, ‘‘संसार हा संसारी माणसाला संपवतो, पण स्वत: कधीच संपत नाही!’’ त्याप्रमाणे या वासना माणसाला जन्मभर नाचवत संपवतात, पण स्वत: संपत नाहीत. अशा या चिवट वासना परमात्म्याला चिकटतात! म्हणजेच सर्व इच्छा भगवंतकेंद्रित होऊ  लागतात. आता इच्छा भगवंतकेंद्रित होणं म्हणजे काय?