चैतन्य प्रेम

गीतेत एका श्लोकात भगवंत म्हणतात, ‘‘भक्तांचे चार प्रकार आहेत, त्यातील जो ज्ञानी भक्त आहे ना, तो माझा आत्मा आहे. तो माझंच स्वरूप आहे!’’ आता हे भक्तांचे चार प्रकार कोणते? तर आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे भक्तांचे हे चार प्रकार भगवंतानं सांगितले आहेत. (चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन। आर्तो जिज्ञासु: अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।। गीता : अध्याय ७). हा ज्ञानी भक्त माझा आत्मा आहे, माझं स्वरूप आहे, असं भगवंतानं सांगितलं आहे. इथं ‘ज्ञानी’ शब्दानं थोडा गोंधळ होऊ  शकतो. ‘ज्ञानी’चा अर्थ ज्ञानमार्गीही नव्हे की शाब्दिक पांडित्य असलेला असाही नव्हेच. इथं ‘ज्ञानी’ शब्दाचा अर्थ आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थीच्या संबंधात लक्षात घेतला पाहिजे. अर्थार्थी ही भक्ताची सर्वात निम्न श्रेणी आहे. अर्थार्थी म्हणजे काय? तर, जो केवळ भौतिक संपन्नतेसाठी भगवंताची भक्ती करीत असतो तो! त्याचं व्रत, जप, पूजा, पारायण हे सारं काही कोणत्या ना कोणत्या तरी भौतिक लाभासाठी किंवा संकट निवारणासाठी असतं. त्या पूजेत, पारायणात भगवंताचं प्रेम नसतं, तर भौतिकाचंच प्रेम आणि भौतिकाचीच ओढ असते. भौतिक अडचण दूर व्हावी यासाठी जशी ही सकाम भक्ती केली जाते, त्याचप्रमाणे भौतिकाच्या प्राप्तीनंतरही ती प्राप्ती टिकावी आणि सगळं काही सुरळीत पार पडावं यासाठीही अशी पूजाअर्चा, पारायण किंवा जपानुष्ठान केलं जातं. म्हणजे नवं घर घेतलंय, तर घाला सत्यनारायणाची पूजा! मुलाचं लग्न झालं, करा सत्यनारायण! पण माणसातील चैतन्यतत्त्वच केवळ सत्य आणि शाश्वत आहे; त्या सत्याची अंतरंगात स्थापना व्हावी, या हेतूनं ‘सत्यनारायणा’कडे कोण पाहतो? यानंतरचा भक्त म्हणजे ‘आर्त’ भक्त. आता हा सुखप्राप्तीसाठी आर्त नसतो, पण दु:ख येताच आर्त होतो! एक वेळ वाटय़ाला अधिक सुख आलं नाही तरी चालेल; पण आहे त्या सुखात काही घट होऊ  नये, अशी त्याची तीव्र भावना असते. तिसरा प्रकार आहे तो ‘जिज्ञासू’! त्याला सुख-दु:खाच्या खेळाचाच कंटाळा आलेला असतो. दु:खाच्या अभावालाच माणूस सुख मानतो, हे त्याला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे खरं सुख काही आहे का, त्या सुखाचा आधार अशा भगवंताची प्राप्ती या जीवनात होईल का, या विचारानं तो तळमळत असतो. भगवंताच्या शोधाच्या इच्छेनं तो प्रेरित असतो. हा सकाम भक्तीच्या परिघातून बाहेर पडलेला असतो; पण भौतिक त्याला वारंवार मागे खेचण्याचा प्रयत्न करीत असतं. त्यामुळे भौतिकाची जखडण सुटत चालली आहे; पण ज्यासाठी भौतिक जगाला सोडत चाललो आहोत, त्या सत्याची अनुभवसिद्ध प्राप्ती काही झालेली नाही, अशा संघर्षमय स्थितीत त्याचा शोध सुरू असतो. समर्थ रामदासांनी याचंच वर्णन ‘पुढे पाहता सर्वही कोंदलेसे’ असं केलं आहे. यानंतर येतो तो ‘ज्ञानी’ भक्त! हे ज्ञान कोणतं हो? तर, एका भगवंतावाचून या भक्ताला कशाचंही ज्ञान नाही. भगवंत हाच केवळ सत्य आहे, शाश्वत आहे; जो समस्त ज्ञानाचा स्रोत आहे, त्याला जाणणं हेच समग्र जाणणं आहे, हे ज्ञान या भक्ताला झालेलं असतं आणि हेच या भक्ताचं मुख्य लक्षण आहे. त्यांची थोरवी गाताना हरी नारायण म्हणतो, ‘‘ऐसे जे हरिचरणीं अनन्य। तेचि भक्तांमाजीं प्रधान। वैष्णवांत ते अग्रगण। राया ते जाण ‘भागवतोत्तम’।।७८९।।’’