चैतन्य प्रेम

मानवी मनावर साकाराचाच प्रभाव आहे आणि त्या साकाराशी जोडलेलं जे प्रेम आहे, जो भाव आहे त्याला आकार नाही! कारण तो सूक्ष्म आहे. उदाहरणार्थ आई! ‘आई’ शब्द उच्चारताच ज्याच्या-त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्याच आईचं सगुण रूप येईल. त्या रूपाच्या स्मरणानं मनात प्रेमही दाटून येईल. ते प्रेम का वाटतं, ते काही प्रमाणात काही प्रसंगांच्या आधारे सांगताही येईल. पण तरीही अंत:करणात जे प्रेम आहे, त्याचं संपूर्ण आणि शब्दश: वर्णन काही करता येणार नाही. तसंच भगवंताबद्दलचं प्रेम भक्ताच्या अंत:करणात व्याप्त असतं. मानवी मनातल्या कल्पना, विचार, भावना आणि वासनांना आकार नसतो. कारण त्या अत्यंत सूक्ष्म असतात. त्यांचाही मनावर खोलवर प्रभाव असतो; पण त्या कल्पना, भावना, वासना सगुणाशी जोडलेल्या किंवा सगुणानं प्रभावित असतात. वात्सल्य ही भावना निराकार आहे; पण ती प्रामुख्यानं आपल्या अपत्याच्या देहरूपाशी जोडलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या सर्व सूक्ष्म भावभावना या प्रपंच चौकटीतील नातेसंबंधांशी जोडल्या गेलेल्या आहेत. मानवी मनावर सगुणाचा मोठा प्रभाव आहे. देहबुद्धीनं जगणारा माणूस प्रिय व्यक्तीचा देह पाहूनच आनंदी होतो आणि अप्रिय व्यक्तीचा देह पाहूनच दु:खी होतो. देहच देहाला भेटतो आणि देहच देहाशी वैर करतो! तेव्हा या मनाला विसंबण्यासाठी सगुण आकाराचीच गरज भासते. सगुण प्रभावात गुंतून सूक्ष्म कल्पना, भावना, वासनांचं जाळं स्वत:भोवती स्वत:च निर्माण करून त्यात अडकलेल्या माणसाला त्यातून सुटण्याकरिताही सगुण आकाराचीच गरज भासते. म्हणूनच निराकार परमात्मा युगानुयुगं सगुण रूपात साकार होत आला आहे. कधी अवतार रूपात, कधी साक्षात्कारी संताच्या रूपात, तर कधी सद्गुरू स्वरूपात! राम, कृष्ण हे अवतार प्रसिद्ध आहेतच. तसंच सर्वच धर्मपंथांत साक्षात्कारी संत आणि खरे सद्गुरू अवतरले आहेतच. निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास, साईबाबा, गजानन महाराज, अक्कलकोट महाराज, गोंदवलेकर महाराज, श्रीवासुदेवानंद सरस्वती..  सद्गुरूंची अनंत रूपं आपण जाणतो. एकनाथ महाराज, नामदेव, जनाबाई असे अगणित साक्षात्कारी संतही या भूमीत होऊन गेले. आता संत आणि सद्गुरू यांच्यात अत्यंत सूक्ष्म अंतर आहे. संत हा केवळ भगवंताच्या प्रेमात आकंठ बुडून असतो. त्यांच्या सहवासात त्या भगवंतप्रेमाचे संस्कारही होतात. त्यांच्या मुखावाटे बाहेर पडणारा सहज बोध जो चित्तात धारण करील, त्याचंही जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. या अर्थानं त्यांच्याकडेही गुरुपद आपोआप येतं. पण जो खरा सद्गुरू असतो, तो जनांना मोह आणि भ्रमाच्या पकडीतून सोडविण्यासाठी, त्यांना शाश्वत भक्तीच्या मार्गावर कधी प्रेमानं, तर कधी कठोर होऊन चालविण्यासाठीच अवतरित झालेला असतो. अध्यात्माचा बाजार मांडलेले बाबा-बुवा इथं अभिप्रेत नाहीत, एवढंच लक्षात ठेवा. हा सद्गुरू प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा, ही कला शिकवायला आलेला असतो. भ्रमाच्या, मोहाच्या आसक्तीच्या पकडीतून कसं सुटायचं, हे शिकवायला आणि तसं करवून घ्यायला आलेला असतो. भ्रम आणि मोहात अडकल्यामुळेच माणसानं जीवनातलं दु:ख वाढवलं आहे. केवळ सद्गुरू बोधानुरूप जीवन घडविल्यानंच त्या भवदु:खाचं हरण होतं आणि म्हणून खरा सद्गुरू हाच ‘हरी’ आहे!