चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

मायेच्या उगमाचं मुख्य कारण कल्पना आहे, असं अंतरीक्ष राजा जनकाला सांगत आहे. कल्पना ही मोठी शक्ती आहे, हे खरंच आहे. अनेकानेक शोध, सर्जक कलाकृती, अभिजात साहित्य, इतकंच काय समाज-संस्कृतीच्या उगमाचं कारणही माणसाच्या याच कल्पना क्षमतेत आहे. पण इथं मायेचा जन्म ज्या कल्पनेतून होतो असं अंतरीक्ष सांगतो, त्याचा रोख देहबुद्धीजन्य अवास्तव कल्पनांकडेच आहे. तो म्हणतो, ‘‘निजहृदयींची निजआशा। तेचि माया गा मुख्य क्षितीशा। जो सर्वथा नित्य निराशा। तों पूज्य जगदीशा पूर्णत्वें।।६८।।’’ तो म्हणतो की, ‘हे राजा, आपल्या हृदयातील आशा हीच मुख्य माया आहे. ज्याच्या मनातून या आशेचं पूर्णपणे निरसन झालं आहे, तोच भगवंताला पूज्य वाटतो!’ हृदयात कोणती आशा आहे? तर, देहबुद्धीतून प्रसवत असलेल्या अनंत इच्छांच्या पूर्तीचीच ती आशा आहे! या अपूर्त इच्छांच्या पूर्तीच्या काळजीनंच काळीज सदैव व्याप्त आहे. ही कसली काळजी आहे? कशाची आशा आहे? उत्तर अगदी सरळ आहे : आपल्याला अखंड सुखी होण्याची आशा आहे! आणि त्याचं कारण आपलं खरं स्वरूप आनंदच आहे, हे आहे. कारण सनातन तत्त्वज्ञानानुसार, आपण सच्चिदानंद स्वरूप भगवंताचाच अंश आहोत! त्या आनंदस्वरूपापासून दुरावल्यानंच आपण आनंदाला मुकलो आहोत. आता पुन्हा आनंदस्वरूपात विलीन झाल्याशिवाय जीवनातली अपूर्णता, अतृप्ती संपणार नाही! आपल्या मनातील आनंदप्राप्तीची इच्छा म्हणूनच स्वाभाविक असली, तरी त्या आनंदाच्या प्राप्तीचे आपले प्रयत्न मात्र चुकीच्या दिशेनं सुरू आहेत. त्या प्रयत्नांवर मायेचा पगडा आहे. मुळात पूर्ण असूनही स्वत:तील आनंदाला विन्मुख होऊन द्वैतात सुख शोधण्याची जी आस मनात आहे, तिचा उगम मूळमायेत आहे! ही ‘मूळमाया’ कोणती? जिथं ‘मीपणा’चा संभवही नाही त्या भगवंताच्या अंत:करणात आनंद भोगण्यासाठी दोन होण्याची इच्छा निर्माण झाली हीच मूळमाया आहे! अंतरीक्ष सांगतो, ‘‘स्वरूप निर्विकल्प पूर्ण। तेथ ‘मी’ म्हणावया म्हणतें कोण। ऐसेही ठायीं स्फुरे मीपण। ते मुख्यत्वें जाण ‘मूळमाया’।।७२।। तया मीपणाच्या पोटीं। म्हणे मजचि म्यां पहावें दिठीं। मजसीं म्यां सांगाव्या गोठी। अत्यादरें भेटी माझी मज होआवी।।७३।।’’ मनातीत भगवंताच्या मनात ‘मी’ भावनेचं स्फुरण झालं आणि दोन होऊन आनंद भोगण्याची इच्छा निर्माण झाली! मीच मला पाहावं, मीच माझ्याशी बोलावं, माझं मलाच मोठय़ा प्रेमानं भेटता यावं, हा भाव त्यातून निर्माण झाला.. लक्षात घ्या, आपली आंतरिक वृत्ती आजही स्वत:शी अशीच एकरूप आहे! आपलं स्वत:चं म्हणून एक कल्पनारम्य भावविश्व असतं आणि त्यात आपणच केवळ प्रवेश करतो आणि रममाण असतो!