03 March 2021

News Flash

२२९. चिद्विलास

एवढंच नव्हे राजा, या एका भगवंतापासूनच समस्त महाभूतं निर्माण झाली.. हीच हरीची माया आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

मायेच्या बळावर अनेकविध रूपांत प्रकटूनही त्या भगवंताचा एकपणा अखंड आहे, असं नवनारायणातला अंतरीक्ष हा राजा जनकाला सांगतो. तो म्हणतो, ‘‘एवं एकपणीं बहुपण। रूपा आणी मूळींची आठवण। परी बहुपणीं एकपण। अखंडत्वें पूर्ण तें कदा न भंगे।। ७९।।’’ हे राजा, एका भगवंताच्या मनात स्वत:च स्वत:तला आनंद दोन होऊन भोगावा, ही एकच इच्छा उद्भवली आणि त्यातून हा द्वैतमय पसारा निर्माण झाला खरा, पण तरी त्या बहुविधतेतलं अखंडत्व आणि पूर्ण एकत्व कधीच भंगलेलं नाही! अनेकविध रूपांत प्रकटूनही मूळचा एकपणा कसा काय टिकतो, हे समजून घेण्यासाठी एक चिरपरिचित उदाहरण घेऊ. जन्मापासून आजवर आपल्यात किती शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल झाले; बाह्य़ रूपात आणि आंतरिक धारणा, कल्पना आणि आकलनात किती बदल झाले, तरी मूळचा ‘मी’ बदलला का? तर नाही. वय कितीही वाढलं तरी या ‘मी’चा निज-बंध कायम आहे. आपली स्वत:ची आपल्याशी जी सहज ओळख आहे, आपला आपल्याशी जो सहज दृढ आत्मिक भाव आहे, सुप्त स्व-भाव आहे; त्यात तसूभरही बदल झालेला नाही. तशी अनेक भिन्न रूपांत प्रकटूनही परमात्म शक्ती अभिन्न आहे! मग अंतरीक्ष एक मधुर रहस्य सांगतो. तो म्हणतो, ‘‘राजन स्वानंदात निमग्न असूनही ‘एकाकी न रमते’ अशीच परमात्म्याची भावना झाली आणि त्यातून द्वैताचं स्फुरण झालं! (राया जाण येचि अर्थी। बोलिलें उपनिषदांप्रती। ‘एकाकी न रमते’ या श्रुती। द्वैताची स्फूर्ति भगवंतीं स्फुरली।। ८१।।) एवढंच नव्हे राजा, या एका भगवंतापासूनच समस्त महाभूतं निर्माण झाली.. हीच हरीची माया आहे. कारण या भूत-भौतिकात आंतरिक स्फूर्तीचं जे ‘सोहम्’ स्फुरण आहे ना, ते मायेच्या आवाक्यातलं काम नव्हे! स्वबळावर ते ती प्रकाशू शकत नाही, तर त्या मायेचा प्रकाशक असलेला चिन्मूर्ती परमात्माच भूतमात्रांमध्ये ‘सोहम्’ भावानं प्रकाशित आहे! (किंबहुना एकपणें समस्तें। रूपा आलीं महाभूतें। तीचि ‘हरीची माया’ येथें। जाण निश्चितें नृपनाथा।। ८२।। भूत-भौतिक स्फुरे जे स्फूर्ती। ते प्रकाशूं न शके माया स्वशक्तीं। मायाप्रकाशकु चिन्मूर्ती। अखंडत्वें भूताकृतीं प्रवेशला भासे।। ८३।।)’’ यानंतर अंतरीक्ष रहस्यकथनात आणखी पुढचं पाऊल टाकत सांगतो की, ‘‘मुख्य मायेचें निजलक्षण। प्रकाशी परमात्मा चिद् घन। तोचि भूतीं भूतात्मा आपण। प्रवेशलेपण नसोनि दावी।। ८४।।’’ म्हणजे- हे राजा, तो चिद् घन परमात्माच मायेचं मुख्य लक्षण प्रकाशित करतो आणि समस्त भूतमात्रांचा तो भूतात्मा समस्त भूतांमध्ये नसलेले प्रवेशलेपण दाखवतो! म्हणजे काय हो? तर, देहात जीव आला आणि देहातून जीव गेला, असं आपण मानतो; प्रत्यक्षात काय येतं आणि नेमकं काय जातं? की मूळचंच जे आहे तेच आल्या-गेल्याचा भास निर्माण करतं? आपण म्हणतो ना, ‘जीवात जीव आला’! हे जीव येणं म्हणजे चैतन्यच ना? मग देहाचा मृत्यू झाल्यानं सृष्टीतील चैतन्यात घट होते का? तर नाही. याचाच अर्थ चैतन्य सतत आहे. देहात त्यानं प्रवेश केला, असं भासतं आणि त्या देहावर ‘जन्म’ आरोपित होतो. ते देहातून गेल्याचं भासतं आणि त्या देहावर ‘मृत्यू’ आरोपित होतो. प्रत्यक्षात चिन्मूर्ती परमात्म्याचा चैतन्यविलास अखंड आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 4:35 am

Web Title: loksatta ekatmyog article 229 zws 70
Next Stories
1 २२८. अद्वैताचा द्वैत पसारा
2 २२७. लीला-जगत्
3 २२६. प्रश्न-जाल
Just Now!
X