अचेतन आणि सचेतन अशा पंचधा सृष्टीची निर्मिती परम तत्त्वातून कशी झाली, हे नवनारायणातील अंतरिक्ष हा राजा जनकाला सांगत आहे. पृथ्वीत गंध, जलात स्वाद, तेजात रूप, वायूत स्पर्श आणि आकाशात शब्द रूपानं हा परमात्मा प्रकटला आणि त्यामुळे ही पंचमहाभूतं परस्परपूरक होऊन सृष्टीचा डोलारा उभा राहिला. पृथ्वीत हा परमात्मा गंध रूपानं प्रवेशला आणि त्यातून या पृथ्वीचा एक फार मोठा विशेष गुण प्रकटला तो म्हणजे क्षमा! बघा, जो अनंत आहे ना त्यानं या मर्यादित आकारमानाच्या पृथ्वीत प्रवेश केला आणि तिच्यात क्षमा हा गुण भरवला. त्यामुळे तिनं सर्व प्राणिमात्रांना त्यांच्या चुकांसकट थारा दिला! थोडा विचार केला तर लक्षात येईल की, आपल्या भवतालच्या सर्व यच्चयावत वस्तू या पृथ्वीचंच रूप आहेत! त्या धातूच्या वस्तू असोत, लाकडाच्या असोत, मातीच्या असोत, दगडाच्या असोत, द्रवरूप असोत की मिश्रित वा प्रक्रिया केलेल्या असोत; त्यांचं मूळ रूप म्हणजेच धातू, लाकूड, माती आदी ही पृथ्वीतच समाहित असतात, पृथ्वीच्या थरांतूनच गवसली असतात वा पृथ्वीतूनच जीवनरस शोषून विकसित झालेली असतात. या यच्चयावत वस्तूंचा आणि प्राणिमात्रांचा आधार पृथ्वी हीच असते. क्षमा हा गुणधर्म असल्याशिवाय या समस्त चराचराचा भार वाहणं शक्यच नाही! मग अंतरिक्ष सांगतो, ‘‘स्वाद रूपें उदकांतें। प्रवेशोनि श्रीअनंतें। द्रवत्वें राहोनियां तेथें। जीवनें भूतें जीववी सदा॥९०॥’’ पाणी हाच जगण्याचा मुख्य आधार असल्यानं पाण्याला जीवन म्हणतात, हे वाक्य आपण प्रत्येकानं आपल्या शालेय आयुष्यात एकदा तरी उच्चारलं वा लिहिलं आहे! तर या पाण्यात स्वाद आहे आणि द्रवत्वही आहे. स्वाद असल्यानं जीवमात्रांना हे जल तत्त्व तृप्त करतं, शुद्ध करतं आणि स्नानयोगानं देहालाही ताजेपणा देतं. या जल तत्त्वात परमात्मा असल्यानं पृथ्वी तत्त्व या पाण्याला पूर्ण शोषून टाकत नाही की तेज तत्त्व विरून टाकत नाही. मग अंतरिक्ष सांगतो, ‘‘तेजाचे ठायीं होऊनि ‘रूप’। प्रवेशला हरि सद्रूप। यालागीं नयनीं तेज अमूप। जठरीं देदीप्य जठराग्नि जाहला॥९२॥’’ तेजात हरी ‘रूप’रूपानंच समाविष्ट झाला त्यामुळे डोळ्यांतही तेज उत्पन्न होऊन दृष्टीक्षमता निर्माण झाली तसंच हे तेज जठरात अग्नी रूपात प्रज्ज्वलित होऊन अन्नपचनाची प्रक्रिया गतिमान झाली. या तेज तत्त्वात भगवंत असल्यानं वायू तत्त्वात हे तेज मावळत नाही. हा वायू प्राणयोगानं देहात वावरत असल्यानं त्या बळावर अनेक जीव नांदत असतात. (वायूमाजीं ‘स्पर्श’ योगें। प्रवेशु कीजे श्रीरंगें। यालागीं प्राणयोगें। वर्तती अंगें अनेक जीव॥९४॥). या वायू तत्त्वात परमात्मा असल्यानं आकाश या वायूला गिळून टाकत नाही, त्याचा ग्रास घेत नाही. मग अंतरिक्ष सांगतो की, ‘‘शब्द रूपानं हृषिकेश आकाश तत्त्वात व्याप्त असल्यानं भूतमात्रांना अवकाश अर्थात जीवन जगण्यास वाव मिळाला आहे.’’ (‘शब्द’ गुणें हृषिकेश। स्पर्शरूपें करी प्रवेश। यालागीं भूतांसी अवकाश। सावकाश वर्तावया॥९६॥). या आकाश तत्त्वात परमात्मा व्याप्त असल्यानं ते आकाश स्वत:मध्ये विरून जात नष्ट होत नाही! (शब्दगुणें गगनीं। प्रवेशला चक्रपाणी। यालागीं तें निजकारणीं। लीन होऊनि जाऊं न शके॥९७॥). ‘शब्द’ हा शब्दच मोठा गूढ आहे. दोन पातळ्यांवर या शब्दाची व्यापकता उघड होते आणि म्हणूनच या शब्दगुणानं आकाशाला असीम सर्वव्यापकत्व लाभलं आहे, यात काय नवल? या दोन पातळ्यांचा विचार करू.

– चैतन्य प्रेम