चैतन्य प्रेम

शब्दाची व्यापकता आपण जाणली आणि म्हणूनच अशा व्यापक शब्दगुणानं व्याप्त ‘आकाश’ तत्त्वही सर्वव्यापक आहे. राजा जनकाला मग अंतरिक्ष सांगतो की, ‘‘हे राजा, या पाचही महाभूतांमध्ये प्रत्यक्षात परस्परविरोध आहे, परस्परांशी वैर आहे, त्यांच्यात परस्परपूरकतेचा लवलेशही नाही, ती एकमेकांना तत्परतेनं ग्रासू पाहतात, नष्ट करू पाहतात (महाभूतीं निरंतर। स्वाभाविक नित्य वैर। येरांतें ग्रासावया येर। अतितत्पर सर्वदा॥ ९८॥).’’ म्हणजे काय? तर, पाणी हे भूमीला जिरवू पाहतं, तेज हे जळाला शोषू पाहतं, वायू हा तेजाचं प्राशन करू पाहतो आणि आकाश हे वायूला गिळू पाहतं (जळ विरवूं पाहे पृथ्वीतें। तेज शोषूं पाहे जळातें। वायू प्राशूं धांवे तेजातें। आकाश वायुतें गिळूं पाहे॥ ९९॥). मात्र या पंचतत्त्वात परमात्म तत्त्व व्याप्त झाल्यानं ही तत्त्वं निर्वैर झाली, एकत्र नांदती झाली (तेथ प्रवेशोनि श्रीधर। त्यांतें करोनियां निर्वैर। तेचि येरामाजीं येर। उल्हासें थोर नांदवी॥ १००॥). या ओवीत ‘उल्हासें थोर’चा अर्थ ‘मोठय़ा आनंदानं’ असा प्रचलित आहे. पण तो- ‘थोर अर्थात शक्तीबळानं तोडीस तोड असलेली महत् तत्त्वंही परमात्म्यामुळे एकत्रितपणे उल्हासानं नांदू लागली,’ असाही आहे. सद्गुरूंपाशी जमत असलेल्या साधकांचीही हीच स्थिती असते बरं! अहंमान्यतेमुळे त्यांच्यात स्वयंघोषित ‘थोर’पणाचा ताठा असतो आणि त्यातून एकमेकांशी सुप्त संघर्षभावही असू शकतो. पण केवळ सद्गुरूच त्यांना एकत्रितपणे आनंदानं नांदवू शकतात! मग अंतरिक्ष म्हणतो की, ‘‘एवं पंचभूतां साकारता। आकारली भूताकारता। तेथें जीवरूपें वर्तविता। जाहला पैं तत्त्वतां प्रकृतियोगें॥ १०१॥’’ ही पंचमहाभूतं साकारत असतानाच भूतमात्रंही आकारत गेली आणि प्रकृती अर्थात मायाशक्तीयोगानं त्यात हाच परमात्मा जीवरूपानं वर्तू लागला. ब्रह्माण्डी तो ‘पुरुष’ होता, तोच पिंडामध्ये ‘जीव’ झाला. अंतरिक्ष म्हणतो, ‘‘त्यासी ब्रह्माण्डीं ‘पुरुष’ हे नांव। पिंडीं त्यातें म्हणती ‘जीव’। हा मायेचा निजस्वभाव। प्रतििबबला देव जीवशिवरूपें॥ १०२॥’’ जीव हा मायेचा निजस्वभाव आहे! आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे आणि त्या आत्मशक्तीच्याच बळावर या देहात जीव नांदत आहे. अर्थातच जीव अनेक मर्यादांनी बद्ध आहे. त्यातली सर्वात मोठी मर्यादा आहे ती काळाची! म्हणजेच या जीवाचं जगणं हे काळानं मर्यादित आहे. एवढंच नव्हे, तर काळाचा हा अवधी कधी संपेल, याचाही भरवसा नाही. त्यामुळेच माणसाच्या मनात आजाराची आणि मृत्यूची भीती आहे. आवडत्या व्यक्तींच्या वियोगाची भीती आहे. त्याला दुसरी मोठी मर्यादा आहे ती परिस्थितीची. परिस्थिती अनुकूल करण्यासाठी आणि राखण्यासाठी तो सतत प्रयत्न करतो; पण परिस्थिती मनासारखी राखण्याच्या प्रयत्नांना यश येणं, ही गोष्ट आपल्या हातात नाही, हेदेखील त्याला उमजत असतं. म्हणूनच त्याच्या मनात परिस्थिती प्रतिकूल होण्याची, अपयश वाटय़ाला येण्याची, मानहानी ओढवण्याची आणि आर्थिक हानीला सामोरं जावं लागण्याची भीतीही सुप्तपणे विलसत असते. बाह्य़ परिस्थितीचा आणि दृश्य जगाचा हा पगडा त्याच्या मनावर परिणाम करीत असतो आणि त्यातूनच मायेचा प्रभाव वाढत असतो. त्यामुळे जीव हा मायेचा निजस्वभाव आहे, अंतरंग स्वभाव आहे! जीवाची बुद्धी अर्थात देहबुद्धीच या मायेचा पाया पक्का करीत असते. याच पिण्डात देव हा जीव-शिव रूपानं प्रतििबबित असतो!