चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

मुक्ती हा ज्ञानाचा नव्हे, अनुभवाचा विषय आहे. मुक्तीचं शाब्दिक ज्ञान पाठ असल्यानं काही कोणी मुक्त होत नाही, की मुक्तावस्था अनुभवत नाही. उलट प्रचीतीशिवायच्या ज्ञानानं गर्वाचं ओझं तेवढं वाहावं लागतं. नाथही म्हणतात, ‘‘ज्ञानाभिमानियां पतन। भक्तां भवबंधन कदा न बाधी॥’’ म्हणजे ज्ञानाचा अभिमान हा पतनाला कारणीभूत होतो, पण भक्ताला भवाचं बंधन काही बाधत नाही. पतन म्हणजे अंत:करण पुन्हा अशाश्वत गोष्टींत अडकत जाणं. म्हणजेच अज्ञानाची जी स्थिती होती, तिथवरच पुन्हा घसरून तिथंच रुतणं. जो भक्त असतो, तो शाश्वत बोधापासून कधीच विभक्त होत नाही. त्यामुळे मोहासक्तीच्या दलदलीतून तो अभ्यासाच्या आधारानं जपून चालत जाऊ  शकतो. ते भवबंधन त्याला अडकवत नाही. भक्ताला चराचरातील प्रत्येक गोष्टीत भगवंताचाच हात दिसतो. त्यामुळे जगण्यातील अडचणींना तो सामान्य माणसाप्रमाणे विघ्न मानत नाही. तर या अडचणींतूनही सद्गुरू काही शिकवत आहेत, हा भाव त्याच्या मनात असतो. या शुद्ध भावामुळे जो अपाय भासतो, तोच उपायात परिवर्तित होतो! याप्रमाणे ज्याचा भाव शुद्ध होतो, त्याचा सांभाळ देव करतो. (भक्तां सर्वभूतीं भगवद्भावो। तेथ विघ्नांसी नाहीं ठावो। तयां अपावचि होय उपावो। भावार्थ देवो सदा साह्य़॥१८८॥ अध्याय ३). एकनाथही सांगतात, ‘‘न करितां भगवद्भक्ती। सज्ञानाही नातुडे मुक्ती।’’ भगवंताची भक्ती जोवर होत नाही, तोवर सज्ञानी जीवाला मुक्ती मिळत नाही. आता या बंधनाची सुरुवात कधी होते? एकनाथ महाराज सांगतात, ‘‘ज्यासी जेथ पदाभिमान। त्यासी तेंचि दृढ बंधन। यालागीं दुर्लभपण। मोक्षासी जाण तिहीं लोकीं॥१८१॥’’ पदाचा अभिमान हाच त्याला बांधून टाकतो आणि त्रलोकात हा पदाभिमान सर्वत्र असल्यानं तिन्ही लोकांत मोक्ष दुर्लभच आहे. आता हा पदाभिमान म्हणजे काय? तर, स्वत:ची जी ओळख आपण मानतो ती ओळख हेच पद आहे. ‘मी ज्ञानी’, ‘मी तपस्वी’, ‘मी योगी’, ‘मी साधक’, ‘मी सिद्ध’ असा जो अभिमान मनात जागा असतो, तोच दृढ बंधन निर्माण करतो. सामान्य जीवापासून देवराज इंद्रापर्यंत हा अभिमान कुणाला सुटलेला नाही. केवळ महादेवानं आपल्या पदाचा अभिमान त्यागला आणि म्हणूनच तर तो जगाचा आदिगुरू ठरला! नाथ महाराज म्हणतात, ‘‘सांडोनियां पदाभिमान। अंगें सदाशिवु आपण। नित्य वसवी महाश्मशान। भगवद्भजनीं निजनिष्ठा॥१८२॥’’ पदाभिमान सोडून सदाशिवानं भगवद् भजनात निजनिष्ठेनं झोकून दिलं. स्वत:च्या हृदयात स्वत:हून स्मशान वसवलं! अर्थात, पूर्ण वैराग्य हेच त्याचं अंत:करण झालं. जोवर हृदयात आसक्तीची सूक्ष्मशी का होईना, पण ओढ शिल्लक आहे तोवर विरक्ती अशक्य आहे. सर्व प्रवृत्तींतून मनानं निवृत्त होता येत नाही, तोवर जन्म-मृत्यूची पुनरावृत्ती टळत नाही!